Ticker

10/recent/ticker-posts

बालकामगार : एक गंभीर समस्या

भारतातील एकूण बालकामगारांच्या ६ ते ८ टक्‍के बालमजूर ग्रामीण भागात व उरलेले शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात शेतात मजुरी करणे, शेळ्या वळणे, गुरे चरावयास नेणे, वीटभट्ट्या तर शहरात चहावाल्यांच्या टपऱ्यांवर चहा विकणे, हॉटेलात काम करणे, कचरा गोळा करणे, घरकामगार याव्यतिरिक्त विणकाम इत्यादी ठिकाणी  बालकामगार अल्पवेतनावर राबताना व भविष्यहीन आयुष्य जगताना दिसून येतात. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतातील बालमजुरांची संख्या जवळजवळ १ कोटी २० लाख (सरकारी आकडेवारी) इतकी आहे, ही चिंताजनक बाब आहे. असेच म्हणावे लागेल. कारण बालकामगार कामावर ठेवण्यास प्रतिबंध  व नियमन करणारा कायदा असूनही, त्याची म्हणावी तेवढी अंमलबजावणी न झाल्याने कोट्यावधी बालकामगारांचे आयुष्य देशोधडीला लागत आहे. 


आज कायदा करूनही बालकामगार नाहीत असे सरकार ठामपणे सांगू शकत हाही, कारण रोज वर्तमानपत्र  उघडले की, आज बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्या मालकास अटक, १० ते १२ बालकामगारांची सुटका तर काही चहाच्या टपऱ्यांवर चहा विक्री करीत असलेल्या जवळजवळ १५० मुलांची सुटका. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी कल्याण येथे काही कारखान्यांत माळेत मणी ओवण्यासाठी व टिकल्यांची पाकिटे भरण्यासाठी काही मुलींनादेखील  बालकामगार म्हणून भरती केल्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उजेडात आली आहे. हसण्या-खोळण्याच्या, बागडण्याच्या व शाळेत जाण्याच्या वयात ही मुले कामाला जातात. त्यांच्यावर घरची जबाबदारी टाकली जाते. पैसे कमविण्यासाठी वेठबिगारीवर पाठविले जाते. त्यांच्याकडून काबाडकष्ट करून घेतले जात असताना मात्र त्या कोवळ्या जयात केल्या जाणाऱ्या अतिश्रमाने त्यांच्या बुद्धीचा ऱ्हास होतानाचा कुणीही विचार करीत नाही. पालकांचे दारिद्रय, शिक्षणाविषयीची अनास्था, संघटनांचा अभाव ही बालकामगारांच्या समस्येची मूळ कारणे आहेत.


सध्या भारतात बरालकामगारांविषयी बालकायदा (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ अस्तित्वात आहे. या कायद्याची दोन विभागांत विभागणी केली आहे. 'अ' या विभागात धोकादायक उद्योगात प्रतिबंधित उद्योगांची यादी असून 'ब' मध्ये दिलेल्या यादीत बालकामगार ठेवण्यास मनाई केली आहे. 


'अ' व 'ब' यादी खालीलप्रमाणे :-

अ' यादी

१) हॉटेल, सिनेमागृहे, दुकाने इ. ठिकाणी जास्त काम न देणे.

२) ओव्हरटाईम करण्यास प्रतिबंध तसेच साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक आहे. 

 'ब' यादी

 १) रेल्वे आवारात खाद्ययदार्थांची ने-आण करण्यास मनाई.

२) बांधकाम व स्फोटक पदार्थ विक्री करण्यास मनाई. 

३) कत्तलखाना, विड्या वळणे, हातमाग, विणकाम इ. ठिकाणी बालमजूर ठेवण्यास मनाई.

४) बांधकाम, वीटभट्टया, . दरूभट्टी, काचकाम, तेल गाळणे इत्यादी ५१ प्रक्रियांच्या कामांमध्ये बालमजूर ठेवण्यास प्रतिबंध. 


बालमजूर ठेवणे हा गुन्हा तर आहेच, पण त्यापेक्षाही अधिक म्हणजे बालमजुरी करवून घेणे व इतरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा सामाजिक गुन्हा आहे. उद्या ज्यांच्या हातात भारत देशाचे भवितव्य जाणार आहे असे कोवळे हात आज चहाच्या टपऱ्यांवर, हॉटेलात उष्ट्या कपबश्या धुतात, तर ग्रामीण भागात वीटभट्टी, दारूभट्टी यांसारख्या धोकादायक व्यवसायात जीवनाचा आधार शोधत चाचपडत आपलं आयुष्य ढकलत आहेत. यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट या देशात नसावी. त्याकरिता केंद्र सरकारने कमीत कमी त्यांचे पुनर्वसन करणे प्राथमिक गरजेचे आहे. कारण आजचा बालकामगार हा उद्याचा बालगुन्हेगार म्हणून जन्माला येतो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सरकारने प्रथमतः अशा मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे व प्रत्येक नागरिकाने बालमजुरी रोखण्याकरिता आवाज उठविणे गरजेचे असून, बालकामगार प्रथा कायद्यापेक्षा ती प्रथा मनापासून घालविण्याची शपथ घ्यावी.  घरकामासाठी, कारखान्यांत, हॉटेलात, चहाच्या टपऱ्यांवर किंवा इतर ठिकाणी १४ वर्षांच्या आतील मुलं डांबलेली असतात. त्यांच्याकडे आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून पाहणे गरजेचे आहे. मला काय त्यांचे करायचेय? अशा प्रवृत्तीमुळे आपण माणुसकीपासून दूर जात आहोत याचे भान ठेवून त्या चिमण्या जिवांचे बालपण व हास्य परत मिळवून देण्यास आपणही स्वत:हून हातभार लावला पाहिजे तरच बालमजुरी नष्ट होण्यास खरी मदत होईल.


  


   

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या