५/१/१९

अपयशावर मात करा

अपयशावर मात करा
-दादासाहेब येंधे
(dyendhe@rediffmail.com)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचशा घरांतून मानसिकदृष्ट्या विचलित झालेली, खचलेली मुले आपल्याला दिसत आहेत. काही मुले व्यसनांच्या आहारी जातात. कोणी दहावी-बारावीला नापास झाला म्हणून आत्महत्या करतोय, तर कुणाला मनासारखा मोबाइल मिळाला नाही म्हणून स्वतःचे जीवन संपवून टाकत आहे. कोणी रेल्वेच्या रुळांवर, कोणी समुद्रात उडी मारून, तर कोणी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. परिणामी, तरुण पिढी विस्कटत चालली आहे.
हल्ली कुटुंबातील संवाद गायब होत चालला आहे. सध्याचे पालक दोघेही नोकरी करीत असल्यामुळे दमून संध्याकाळी घरी येतात. मुले आजी-आजोबा किंवा इतर नातेवाइकांकडे अथवा पाळणा घरात असतात. त्यांना आपल्या आई-वडिलांबरोबर बोलायचे असते. परंतु आई-वडिलांना घरातही वेळ नसतो. मुले काही बोलायला गेली तर नेहमी त्यांना एकाच प्रकारचे उत्तर मिळते मी फार दमली/दमलो आहे. मला त्रास देऊ नको. तू जाऊन टीव्ही बघ. एव्हढेच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवतही नाहीत. मुले आई-वडिलांची वाट पाहून कंटाळून झोपून जातात किंवा मित्रांकडे जाऊन गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर तासनतास बसल्याने एकलकोंडी बनतात आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
खरेतर जीवनाचा लढा उभारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते तुमच्या वाटयाला आलेली परिस्थिती अन जाणीव या दोनच गोष्टी मानवाच्या जीवनाच्या खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरतात. कारण परिस्थिती माणसाला जगण्याबरोबर वागणंही शिकविते. मुंग्या आपल्यापेक्षा दसपट प्राण्यांची शिकार करतात. त्यांच संघटन, जिद्द आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा कल वाखाणण्याजोगा आहे. एखाद्या बिळात राहून पोट भरता येणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. तसेच आपल्या वाटयाला आलेलं कुठलंही काम हे ना आपल्या नशिबाचा भाग असतो, ना कर्माचे फळ. तर तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात वाटयास आलेला अनिवार्य लढा असतो. ज्यांना ज्यांना वेदनांची जाण अन भान आहे त्यांना कळतोय जीवनाचा मथितार्थ. सुख हे आपल्या जीवनाचे सोबती नाहीत अन पुढेही नसणार. वेळ आलीच तर दुःखालाही कवटाळणं, शिकणं म्हणजे जीवनाचे विविध पैलू शिकणे होय. पायाला ठेच लागेल म्हणून वाटेवरचे दगड उचलत चालणे हा मूर्खपणा होय. तुम्हाला हे चांगलं माहीत आहे. आज ना उद्या पायाला ठेच लागेलच, कारण चालणं अनिवार्य आहे. म्हणून आयुष्य दगड उचलत चालायचं की जीवनात जे जे कडू-गोड प्रसंग येतील यांचा सामना करीत चालायचं हे आपणच ठरवायचं आहे. भूतकाळात जी जी माणसं मोठी झाली ती सर्वच या निखाऱ्यातून बाहेर पडली आहेत. जखमांना कुरवाळत बसल्याने जीवनाचे प्रश्न सुटत नसतात. रक्तारक्तात आशावाद पेरला की उगवणारी रोपं सुद्धा आशावादीच उगवतात. त्यासाठी आपल्याकडे हवा सकारात्मक जीवनाचा लढा.
तरुण वयातील या आत्महत्या थांबवायच्या असतील तर संवादाची पातळी घराघरातून वाढली पाहिजे. आई-वडिलांसोबत मुला-मुलींनीही व्हाट्सअप, फेसबूक सारख्या आभासी दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष संवाद साधावा. मुलांनो आई-वडीलांबरोबर बोला, तुम्ही बोललात तर तुमच्या मनातील खलबते त्यांना कळेल. त्याच्यावर कुटुंबातून सकारात्मक प्रतिक्रिया येतील. घरातील आई-वडील तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील.
मुलांनो नकार पचवायला शिका, आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला येत असतो. आपण कोणाची तरी मदत घेताना कधी नकार येतो तर कधी भरभरून मदत मिळते. जीवनातले सगळेच प्रसंग आनंदाचे नसतात. तसेच ते दुःखाचेही नसतात. परंतु आपण दुःखाच्या प्रसंगात खचून जातो आणि नकळतपणे अयशस्वी होतो. म्हणून दुःख, अपयश , नकार या गोष्टी पचवायला शिकले पाहिजे. तरच आयुष्याची वाटचाल यशस्वी आणि सार्थक होणे सहज शक्य होऊ शकते. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी आत्महत्या हे त्यावरचं उत्तर असू शकत नाही. प्रत्येकाने आपल्या अंगभूत गुणांचा उपयोग करून अधिक खंबीरपणे वागल्यास आपल्या समस्यांवर उपाय शोधता येतील.
मला मरायचं आहे, मी मेल्यानंतरच प्रश्न सुटतील असे विचार मनात येतात तेव्हा मला माझा प्रश्न सोडवायचा आहे, मी आहे त्या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे, जगायचं आहे हे विचारदेखील जोरकसपणे मनात आले तर हा प्रश्न सुटेल, सुटू शकतो. गरज आहे ती मनावरचा ताण हलका करण्याची. आत्महत्या हे कुठल्याही समस्येवरच उत्तर असू शकत नाही.


२ टिप्पण्या:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...