Ticker

10/recent/ticker-posts

अंधश्रद्धा: देशव्यापी कायद्याची गरज

अंधश्रद्धा: देशव्यापी कायद्याची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

 महाराष्ट्र हे अंधश्रद्धाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर शेजारी कर्नाटक राज्यातही हा कायदा लागू झाला आहे. आता गरज आहे ती अंधश्रद्धाविरोधी कायद्याची देशपातळीवर अमलबजावणीची. आजही भारतामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात दिसून येते. त्यामागे पारंपरिक बुरसटलेल्या मनोधारणा तसेच भोंदू बाबा-बुवांचा स्वार्थीपणादेखील तितकाच कारणीभूत ठरतो. अंधश्रद्धेमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक, बौध्दिक, शारीरिक तसेच मानसिक पिळवणूक मोठया प्रमाणात होत असते. धार्मिक बाबींच्या नावावर अनेक अंधश्रद्धा आपल्याकडे प्रतिष्टा मिळवून आहेत. त्यालादेखील कडाडून विरोध व्हायला हवा. भारताचे संविधानच देशाच्या नागरिकांना विज्ञान आणि विवेकवादाचा पुरस्कार शिकविते. तसेच राज्यकर्त्यांकडून त्याच दृष्टिकोनातून जनतेवर शिक्षण आणि संस्काराची अपेक्षा करते. म्हणूनच आता थेट केंद्र सरकारनेच अंधश्रद्धाविरोधी कायदा अमलात आणण्याची वेळ आली आहे. 


पारंपरिक लोकधारणा एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीने संपुष्टात येत नसतात. मात्र, ज्या परंपरांच्या पालनामुळे इतर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत नसेल किंवा त्यांची फसवणूक केली जात नसेल त्याचबरोबर व्यक्तींची कुठल्याही तऱ्हेने पिळवणूक घडत नसेल तर त्या परंपरेला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, परंपरेच्या नावाखाली स्वतःच्या तुंबडया भरणाऱ्या प्रवृत्तीला अंधश्रद्धाविरोधी कायद्याने अद्दल घडवता येऊ शकते.



आजच्या विज्ञान युगातही पैशांचा पाऊस पडतो अशा भूलथापा मारणारे आणि त्यांच्या खोटेपणाला बळी पडणारे लोक आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मांत्रिकाने सांगितले म्हणून लहान मुले बळी देण्याचे अघोरी प्रकारही गुप्तधनाच्या लालसेपोटी आजही घडत आहेत. अशा विकृत मनोवृत्तीच्या मागे डोळे बंद करून तसेच बुद्धी गहाण ठेवून जाणाऱ्या लोकांच्या डोक्यांमधील अंधश्रद्धेची जळमटे वेळीच काढणे अतिशय गरजेचे आहे. सामाजिक उत्थानासाठी ते महत्त्वाचे ठरते.



अंधश्रद्धेमुळे एक व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि पर्यायाने अवघा समाजच मानसिकदृष्टया गुलाम होत असतो. मुळात आजचे शिक्षण हे नव्या पिढीला विवेकवादी बनवण्यास सक्षम आहे, असे वाटत नाही. कारण पुढची पिढी घडवणारे शिक्षकच आज प्रचंड अंधश्रद्धाळू असल्याचे दिसते. हे चित्र बदलून भारत विज्ञानवादाचा पुरस्कर्ता ठरण्यासाठी अंधश्रद्धाविरोधी कायद्याची देषव्यापी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.