Ticker

10/recent/ticker-posts

वन्यजीव वाचलेच पाहिजेत!

वन्यजीव वाचलेच पाहिजेत
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा शिरकाव, मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा झपाट्याने होत असलेला -हास आणि महामार्ग बांधणीमुळे धोक्यात आलेले कॉरिडॉर, या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्यजीवांच्या नैसगिर्क अधिवासावर झाला आहे आणि परिणामी वन्यजीवनच धोक्यात आले आहे. असे एकूण सध्याचे चित्र आहे.


अलीकडे शिकारीचे प्रमाण वाढत असले तरी या कारणांना दुर्लक्षित करून चालणारे नाही. कारण वन्यजीवन धोक्यात येण्यामागे शिकार हेच एक कारण नसून त्यापेक्षाही राष्ट्रीय महामार्ग, कोळसा खाणी, विद्युत प्रकल्प, वाढते पर्यटन, शहरीकरण या माध्यमातून आपणही कुठेतरी वन्यजीवांच्या असुरक्षिततेला कारणीभूत ठरत आहोत. कदाचित या सर्व मुद्यांवर गांभिर्याने विचार झाला तर धोक्यात आलेले वन्यजीवांना कुठेतरी सुरक्षितता मिळेल.


जंगलातील वाढते पर्यटन आता वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. जंगल पर्यटन आणि त्या अनुषंगाने जंगलाच्या आजूबाजूला झालेले रिसॉर्ट वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. पर्यटक येतात आणि त्यांच्याजवळचे प्लॅस्टिक बाहेर फेकतात. काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक वाघ प्लॅस्टिक चघळत असलेला फोटो प्रसिद्ध झाला होता. व्यस्थित नियोजन न करता होणारे पर्यटन वन्यजीवांच्या मुळावर उठले आहे. कान्हा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, सारिस्काप्रमाणेच महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प धोक्यात आल्याची ही घंटा आहे.


पूर्वी सहय़ाद्रीच्या पट्टय़ात विपुल जैवसंपदा टिकून होती. या जैवसंपदेत एकप्रकारची सलगता होती. त्यामुळे वन्यजीवासाठी अधिवास सहय़ाद्रीच्या पट्टय़ात होती. वन्यजीवांना सहजपणे अन्न उपलब्ध होत होते. त्यामुळे जैवसाखळी सुरळीतपणे चालू होती. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून सहय़ाद्रीच्या पट्टय़ातील जंगलांचा विविध कारणांनी ऱ्हास होत आहे. वणवे, जंगलतोड, मानवी वस्ती, शेती आदी विविध कारणामुळे सहय़ाद्रीतील जंगलांचा नाश होत आहे. साहजिकच वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहे. त्यांना अन्न सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. तेथे त्यांना सहज अन्न वा भक्ष्य उपलब्ध होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातून गंभीर असा मानव-वन्यजीव संघर्ष उभा ठाकला आहे. स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात वन्यजीवांच्या मानवी वस्तीववरील अतिक्रमणात वाढ होणार आहे. मानवाप्रमाणे वन्यजीवांनाही जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे. वन्यजीवांसाठी कायदे आहेत. जंगल हे त्यांचं घर आहे. त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. जंगलं टिकल्यास जैवसाखळी सुरळीत चालेल. मग वन्यजीवांच्या मानवी वस्तीवरील अतिक्रमणाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.


जंगलात अन्न मिळाले नसल्यानेच, जवळच्या खेड्यात घुसलेले वाघ भुकेने मरण पावल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. वन संरक्षण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी, जंगलांचे पुनरुज्जीवन, जंगलात पाण्याचे साठे निर्माण करणे, अन्य प्राण्यांनाही संरक्षण देणे, जंगलावरची अतिक्रमणे हटवून जंगलांचे रक्षण करणे अशी व्यापक उपापयोजना अंमलात आणल्या शिवाय भारत आणि आशिया खंडातल्या वाघांचे अस्तित्व अबाधित  राहणार नाही. अन्यथा पुढच्या पिढ्यातल्या मुलांना वाघ फक्त चित्रातच दाखवावा लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.