Ticker

10/recent/ticker-posts

चला, लेण्याद्रीला...

चला, लेण्याद्रीला...
- दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात बऱ्याच  लेण्यांचे समूह असून त्यांना विविध नावांनी ओळखले जाते. तुळजाबाई टेकडीवरच्या तुळजालेण्या, मनमोदी टेकडीवरच्या मनमोदी लेण्या, मनमोदी टेकडीवरच असलेल्या दक्षिणेकडील भीमाशंकर लेण्या, उत्तरेला अंबा अंबिका लेण्या, भूतलिंगा लेण्या, शिवनेरी लेण्या आणि नंतर लेण्याद्रीचा लेणी समूह. येवढं सगळया लेण्या इथं असल्या तरी लेण्याद्री म्हटलं की पटकन डोळयांसमोर येतो तो तिथला मिरीजात्मज गणपती. 



अष्टविनायक गणपतींमधील आठवा गणपती म्हणून लेण्याद्रीच्या गिरीजात्मकाला ओळखले जाते. अष्टविनायक गणपतींमधील डोंगरामधील हा एकमेव असा गणपती आहे. या गणपतीच्या डोंगरात जवळजवळ २८ गुहा आहेत. कुकडी नदिजवळ असलेल्या डोंगरात या गुहा आहेत. हा डोंगर गणेश पहाड म्हणून ओळखला जातो. त्यातील सातव्या गुहेत गिरीजात्मजाचे मंदिर आहे. म्हणूनच या लेणीला गणेश लेणी असंही म्हणतात. या लेण्या अतिशय स्वच्छ असून हा २८ लेण्यांचा समूह आहे. या पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरल्या आहेत. सहा आणि चौदा नंबरच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह आहे आणि बाकी सर्व लेण्यांची रचना ही विहाराप्रमाणे आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या  चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाची लेणी लागते. त्यानंतरच्या म्हणचे सातव्या गुहेत गणपती आहे. ही लेणी मोठी आहे. बाकीच्या लेण्या लहान असून त्यांना दोन ते तीन कक्ष आहेत. बहुतेक लेण्यांसमोर ओसरीही आहे. या समूहातील सहाव्या नंबरची लेणी ही मुख्य चैत्यगृह म्हणून ओळखली जाते. 



चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ आहे. व्हरांडयाला सहा खांब असून दोन अर्धखांब आहेत. या खांबावर नक्षीकाम आहे. त्यात वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पकृती आहेत. गुहेच्या मध्यावरती प्रार्थनास्थळ  कोरण्यात आले आहे. ते घुमटाकार असे आहे. काही ठिकाणी अष्टकोनी खांब आहेत. तळाशी  वरच्या टोकाला जलकुंभाची प्रतिकृती आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार लाकडासारख्या कमानी कोरल्या आहेत. 

सातव्या क्रमांकाच्या लेणीत मोठे विहार असून ही सगळयात मोठी लेणी समजली जाते. ही सगळयात मोठी लेणी असून याच लेणीमध्ये गणराज गिरीजात्मज विराजमान झालेले आहेत. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर यापैकी कुठल्याही गोष्टी  त्या ठिकाणी सापडत नाहीत. खांबविरहीत ५७ फूट लांब, ५२ फूट रूंद, असं गुहेप्रमाणे हे मंदिर आहे. ही मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव-रेखीव नाही. केवळ दगडात कोरलेली बालगणेशाची मूर्तीच तिथे पहावयास मिळते. बाहेरच्या सभामंडपात केवळ खिडक्या आहेत. या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य असेल तोपर्यंतच या गुहेत प्रकाष असतो. सूर्य मावळला की गुहेत केवळ अंधार पसरतो. थोडक्यात गुहेत एकही बल्ब नाही. मात्र ही गुहा कोणी आणि कधी तयार केली याचा संदर्भ सापडत नाही. मात्र, हिच्या आजूबाजूला असलेल्या काही लेण्यांमध्ये त्या लेण्याच्या रचनेचे काही तुटक तपशील सापडतात. 



चौदाव्या क्रमांकाच्या लेणीतही चैत्यगृह असून त्यात खाबं पहायला मिळतात. येथे स्तुपावर दंडाकृती गोलाकार नक्षी तसेच चौकोनी  हर्मिका असून छतापर्यंत जाणाऱ्या  पायऱ्यांची  रचना ही पिरॅमिडप्रमाणे केलेली दिसते. छतात छत्री कोरलेली आहे. दालनातील खांब अष्टकोनी असून वरच्या बाजूला घटाप्रमाणे आकार आहे. तसेच वरच्या बाजूला छानसा कळसही आहे.
या समूहातील बाकीच्या लेण्या या लहान स्वरूपाच्या आहेत. डोंगर पोखरून त्या तयार केलेल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.