४/४/१९

नवचैतन्य आलं दारी...

नवचैतन्य आलं दारी...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचं, उत्सवाचं वैशिष्ट्य  आहे. प्रत्येक उत्सवाचं, साजरीकरण काही सांगणं असतं. या साजरीकरणातून काही ना काही घेण्यासारखं असतं. मुख्य म्हणजे हे उत्सव निसर्गपूजेचा, पर्यायानं निसर्ग संवर्धनाचा. आता तर पर्यावरणरक्षणाचा प्रश्न कळीचा ठरू लागलाय. पर्यावरणाचा ऱ्हास आपल्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरू शकतो हे एव्हाना आपल्याला उमगलं आहे. त्यामुळेच निसर्गपूजेचा संदेश देणाऱ्या उत्सवांचं महत्त्व कित्येक पटींनी वाढलं आहे. गुढीपाडवा अर्थात नववर्षाचा पहिला दिवसही निसर्गाचं महत्त्व पटवून देणारा आहे.
हिरवाईनं नटलेल्या झाडाझाडांच्या फांद्या आनंदाने डोलत असतात. फुलांचे बहरलेले ताटवे साऱ्यांना आकर्षित करत असतात. आंब्यांच्या, लिंबाच्या आणि यासारख्या अन्य वनस्पतींवर उमलणाऱ्या  मोहराचा सुगंध मोहवून टाकत असतो. निसर्गाच्या अशा विविध रंगी दर्शनानं तृप्त होत नव्या वर्षांचं  स्वागत करण्यातील आंनद काही औरच असतो. त्यातील एक सण म्हणजे गुढीपाडवा...  
शालिवाहन शक म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलानं मातीचं सैन्य तयार केलं. पाणी शिंपडून त्यांना सजीव केले. या सैन्याच्या मदतीनं राजानं शत्रूचा पराभव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झालं. चेतनाहीन, पौरूषहीन, निद्रिस्त, सुस्त समाजानं या दिवसापासून जागृत होऊन पराक्रमाच्या दिशेनं वाटचाल करायचा संदेश आपल्याला या सणापासून मिळतो. तसंच या दिवशी श्रीरामचंद्रंानी वालीच्या जुलुमातून प्रजेची सोडवणूक केली होती, अशीही कथा आहे. वालीच्या जाचातून मुक्त झालेल्या प्रजेनं घरोघरी गुढया उभारून आनंदोत्सव साजरा केला गुढी ही नेहमीच विजयाचा संदेश देत असते. विजय, मांगल्य आणि पावित्र्य या सद्भावनांचा एक प्रवाह गुढी प्रसृत करत असते. नवीन स्वागतसुद्धा गुढी उभारून केलं जातं. 
गुढीपाडव्याच्या दिवषी कडुनिंबाची कोवळी पालवी तोडून त्यात मिरे, ओवा आणि चवीला किंचित गूळ किंवा साखर घालून चटणीसारखं मिश्रण केलं जातं आणि प्रसाद म्हणून खाल्लं जातं. कारण या ऋतूत शरीरात कफ धातूचे आजार जास्त प्रमाणात होतात. या आजारांवर कडू, तिखट, तुरट रसाचं औषध परिणामकारक असतं. कडुनिंबाचं नित्य सेवन केल्यास माणूस निरोगी राहतो, हे सिद्ध झालं आहे. वर्षारंभापासून हे कडू औषध नेहमी घ्यावं, असं शास्त्र सांगतं. त्याचप्रमाणे हा कडू घोट प्रतिकात्मकसुद्धा आहे. सत्य हे नेहमीच कटू असतं; पण हेच सत्य जीवनाला उदात्तता, सात्विकता प्रदान करत असतं. जीवन जगताना, वाटचाल करताना काही कटू प्रसंग अपरिहार्य असतात, हा संदेशदेखील याद्वारे आपल्याला मिळतो.
दारासमोर काढलेली गुढीची सुबक रांगोळी

लालबाग, मुंबई येथे शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणी
गुढी उभारणं म्हणजे विजयपताका फडकावणं! मग ही विजयपताका माणसानं शत्रुवर मिळवलेल्या विजयाची असेल किंवा माणसानं आपल्यातच अंतर्भूत असलेल्या रिपुंवर मिळवलेल्या विजयाची असेल...प्रत्येक माणसात बऱ्या वाईट दोन्ही प्रवृत्तींचा योग्य तो तोल राखणं हे प्रत्येकाच्या हातात असेल. ज्या त्या व्यक्तीच्या विचारशक्तीनुसार तो आपलं हे सामर्थ्य वाढवतो. म्हणून गुढीपाडव्याच्या निमित्तानं घरावर गुढया उभारताना आपण मनातील दृष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून स्वतःला सत्यप्रवृत्तीच्या मार्गानं जाण्याचा आदेश  देत आहोत का, याचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. श्रीरामचंद्रांनी जुलमी वालीचा पराभव केला तसाच आपणही आजूबाजूला वावरणाऱ्या जुलमी शक्तींचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडून घरी-दारी कोठेही कोणावरही अगर अन्य कुणाकडून अन्याय होत नाही ना याचाही समतोलपणे विचार झाला पाहिजे. आज अनेक सामाजिक समस्या पहायला मिळतात. अशा परिस्थितीत बंधूभाव जपणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्यादृष्टीनं इतरांप्रती आदरभाव जपण्याचा निर्धार या उत्सवाच्या निमित्तानं करायला हवा. 
पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा आणि कथा खूप काही सांगत असतात. सारासार विचारबुद्धीनं कालमानानुसार आपल्याला त्याचे अर्थ निवडावे लागतात. त्यातील योग्य छटा निवडाव्या लागतात. गुढया-तोरणं उभारण्यातही अर्थघनता लाभली आणि निसर्गातून टिपता येणारं रंग-गंध वैभव आपणही आपल्यात कोवळिकता लेवून जपायचं म्हटलं तर चैत्रप्रतिपदेला होणारी नववर्षाची सुरूवात करायलाच हवी.

1 टिप्पणी:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...