२६/३/१९

प्रत्येक पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट महत्त्वाचे

प्रत्येक पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट महत्त्वाचे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
२ जुलै २०१८ रोजी अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर धोकादायक रेल्वे पादचारी पूलांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील हिमालय हा पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. संध्याकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या भीषण दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले असून मृतांमध्ये जीटी रुग्णालयाच्या नर्सचा देखील यात समावेश आहे. पुलाच्या सिमेंटचा संपूर्ण ढाचा खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजुमन इस्लाम शाळेच्या दिशेने बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर सायंकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये-जा सुरू होती. लोकल पकडण्यासाठी पुलावर प्रवाशांची तर पुलाखालील दादाभाई नवरोजी मार्गावर वाहनांची गर्दी होती. इतक्यातच एक लोखंडी अँगल पडला आणि कॉंक्रीटचे ठोकळे असलेल्या भागावरून प्रवास करणारे प्रवासी खाली पडले आणि काही क्षणांतच भयावह परिस्थिती निर्माण झाली.
हार्बर फलाट क्रमांक १ ते मेल-एक्सप्रेस फलाट क्रमांक १८ यांना जोडणाऱ्या पादचारी पूल सीएसएमटी (कल्याण दिशेला) येथे आहे. यापैकी हार्बर फलाट क्रमांक १, २, ३ आणि मध्य रेल्वे फलाट क्रमांक ४, ५, ६, ७ या फलाटांवर उतरण्यासाठी मुख्यत्वेकरून या पुलाचा वापर प्रवाशांकडून करण्यात येतो. १९८४ साली सीएसएमटी हार्बर आणि मध्य मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे बांधणी करण्यात आल्याची माहिती समीर यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून समोर आली आहे. नुकतेच मेल-एक्सप्रेस फलाटांवरील पुलाची जोडणी या पुण्याला देण्यात आली होती.
गरजेनुसार पुलांची उभारणी करणे, ठराविक कालावधीत यांची संरचनात्मक तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांची देखभाल दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणे ही नियमित प्रक्रिया असते. ती जबाबदारी तथाकथित पार पाडली जाते. पण, त्यासोबतच दर पाच वर्षांनी पुलाच्या पृष्ठभागाची दुरुस्ती करणे, वीस वर्षांनी बेअरिंग बदलणे अशा महत्त्वाच्या दुरुस्त्या न चुकता कराव्याच लागतात. आपल्याकडे मात्र, एकदा का पूल उभारला की तो कोसळणे किंवा त्यावर एखादा अपघात होईपर्यंत त्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे.  सदर पुलाची डागडुजी करणे किंवा तो पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारणी करणे गरजेचे आहे का हे स्ट्रक्चरल ऑडीट करणाऱ्यांनी महापालिका तसेच रेल्वेला कळविणे गरजेचे होते.  


जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हा पादचारी पूल इतका कमजोर आणि दुर्लक्षित राहावा ही खरोखर चिंतेची बाब म्हणावी लागेल. यामुळे मुंबईतील रेल्वे प्रवासी किती असुरक्षित आहेत हे अधोरेखित होते.
रेल्वे लगतचे अनेक पूल महानगरपालिका आणि रेल्वे यांच्या वादात अडकले आहेत. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यावरून रेल्वे आणि महानगरपालिका यांच्यात वाद होताना दिसत आहेत. मात्र, त्यामुळे सर्वसामान्यांना मृत्यूने मोबदला प्रत्येक वेळी द्यावा लागत आहे. यावेळी महानगरपालिकेने मुंबईतील अनेक जुन्या पुलांच्या दुरुस्ती साठी करोडो रुपयांची तरतूद केली होती. परंतु, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अंधेरीतील गोखले रोडवरील पूल दुर्घटना असो किंवा एलफिस्टन रोड वरील रेल्वे पुलाचा झालेला अपघात आणि त्यात मृत्यू पावलेल्यांना जबाबदार कोण? असा प्रश्न दरवेळी उपस्थित होत आहे. प्रत्येक वेळी निष्पाप बळी जात आहेत. त्याची जबाबदारी कोणीच घेत नाहीत. उलट हे पूल मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत.
मुंबईतील गर्दी पाहता या पुलांची क्षमता तपासून पाहण्याची गरज आहे. रोज ये-जा करणारे प्रवासी आणि पुलाची क्षमता यांचे समीकरण जुळून पहिले जाणे गरजेचे आहे. मुंबईतील गर्दीचा उच्चांक पाहता तातडीने नवीन पूल बांधणी होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एल्फिस्टन येथे सैन्याने पूल बांधला, त्याचप्रमाणे अतितात्काळ पुलाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे.


५ टिप्पण्या:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...