Ticker

10/recent/ticker-posts

नरेंद्र मोदींची त्सुनामी अन युतीचं चांगभलं

देशात ३०० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकून एनडीए सरकारने विरोधकांची पळता भुई थोडी केली आहे

-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

'चौकीदार चोर है' असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींवर केलेली टिका, मावळते पंतप्रधान अशी तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केलेली मानहानी यावरच न थांबता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून तब्बल दोन डझन विरोधी नेत्यांनी मोदींविरुद्ध एकत्र येत चालवलेली धडपड मतदारांनी सपशेल नाकारली असून, युतीच्याच पारड्यात एकगठ्ठा मते टाकत पुन्हा देशात युती (एनडीए)सरकारलाच जणू पाचारण केले आहे. देशात ३०० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकून एनडीए सरकारने विरोधकांची पळता भुई थोडी केली आहे.


महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती ३४पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही, असे म्हटले जात होते. परंतु बारामती वगळता महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा जिंकत युतीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. याचे श्रेय नक्कीच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचे यातून स्पष्ट जाणवते आहे.


निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी आपल्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडले. त्याचवेळी वंशवाद, भ्रष्टाचार, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवरून ते विरोधकांवर तुटून पडले. मोदींनी प्रचाराची दशा-दिशा आपल्या सोयीनुसार फिरविली आणि विरोधक त्यात अडकले. पक्षांतर्गत सर्वेक्षणाच्या आधारावर प्रचाराची रणनीती आखण्यात आली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर पडला, तर मोदींनी बिहारमधील दुरावलेला मित्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयुला एनडीएमध्ये परत आणण्यात यश मिळविले. याचा परिणाम दोन्ही राज्यांत दिसला. आंध्रात जगमोहन रेड्डी यांनी नायडूंचा पुरता धुव्वा उडविला, तर तिकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सोबतीने भाजपाने जागा राखण्यात यश मिळविले. तेव्हा मोदींविरोधात कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर विरोधकांकडे नव्हते आणि नेमका हाच या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला.


भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की, ६७.११ टक्के नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले. लक्षात राहण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा महिलांनी जास्त प्रमाणत मतदान केले. आपल्या देशातील अर्धी लोकसंख्या २५ वर्षे वयाच्या आतील आहे. महिलांसाठी एनडीए  सरकारने नवनवीन योजना आणल्या होत्या. त्यांचा फायदा थेट महिलांना होऊन त्याचा पक्षाला विजयासाठी हातभार लागला. त्यातील काही योजना जसे, उज्जवला या योजनेनुसार गॅस कनेक्शन, जनधन खाते सुमारे ५० टक्के महिलांचे आहे. मुद्रा योजनेनुसार ७० टक्के कर्ज वाटप महिलांना झाले आहे. 


फेब्रुवारी २०१९ पर्यंत, युती सरकारने ९.२ कोटी शौचालये बांधल्याचा दावा केला आणि २८ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांतील ५.५ लाख गावे शौचालय युक्त झाल्याचे घोषित केले, त्याचा थेट प्रभाव महिलांवर झाला. तसेच मोदी यांची टीव्हीवर प्रसारित झालेली व अक्षय खन्ना याने घेतलेली बिगर राजकीय मुलाखत रणनीतीही फायदेशीर ठरली. ज्यात त्यांनी स्वतः जेवण तयार करणे, कपडे धुणे आणि कविता लिहिण्याचे प्रसंग सांगितले. ज्यामुळे महिला मतदारांचे लक्ष चौकीदार असलेल्या प्रधानमंत्री यांच्याकडे आपोआप खेचले गेले.


सरकार व संघटना यांच्या या संयुक्त कामगिरीला योग्य पद्धतीने केलेली युती व जोडलेले मित्रपक्ष यांची चांगली जोड मिळाली. या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणून भाजपाला मिळालेले यश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मोदींची सुनामी अन कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपा सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. छान लेख

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.