काश्मीर मध्ये पुन्हा 'नंदनवन' होईल
-dyendhe1979@gmail.com
नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्यामुळे संपूर्ण देशातीलच दहशतवादी कारवायांना आळा बसून देशाच्या नंदनवनातही शांतता नांदेल.
काश्मीरला दुहेरी नागरिकत्व बहाल करणाऱ्या ३७०या कलमामुळे एकतर काश्मिरी जनता व भारतीय नागरिक यांच्यात काही प्रमाणात दरी निर्माण झाली होती. भारतीय सुरक्षा दले सार्वजनिक ठिकाणीच सुरक्षा देण्यात व्यस्त असत. त्याचाच फायदा दहशतवादी काश्मिरी नागरिकांच्या घरात लपून बसण्यासाठी मिळवायचे. घराघरात लपून बसून अचानक सुरक्षा रक्षकांवर लपून हल्ले करायचे. स्थानिक काश्मिरी नागरिकांनी सहकार्य न केल्यास त्यांच्या मुलींना व बायकांना दहशतवादी पळवून नेत लैंगिक अत्याचार करायचे. त्यांच्या घरांवर हल्ले करायचे. परिणामी, काश्मिरी नागरिकांना दहशतवाद्यांना सहकार्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातच शेजारी राष्ट्राकडून दहशतवाद्यांना पाठींबा मिळत असल्यामुळे त्यांचा मनसुबा कायम वाढतच होता. भारतीय सुरक्षकांच्या ताफ्यावरही कित्येकदा दगडफेक केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
आता काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम रद्द करून केंद्र सरकारने मोठा अडसर दूर केला आहे. परिणामी, आपल्या सैन्याला आता काश्मीरी नागरिकांच्या घरात जाऊन लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडून बाहेर काढता येईल. यामुळे काश्मीरमधला दहशतवाद नष्ट होईल व काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात येईल.
७० वर्षांची ही भळभळती जखम एकाएकी जाणार नाही. तर त्यासाठी थोडा वेळी द्यावा लागेल. परंतु, आता खऱ्या अर्थाने काश्मीर स्वतंत्र झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यथावकाश तेथे उद्योगधंदे उभे राहून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. काश्मीरमध्ये अनेकानेक उद्योगधंदे सुरू करून तिथल्या बेकार तरुण-तरुणींचे आयुष्य कसे सुखकर होईल याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील उद्योजकांना तसे आवाहनही केले आहे. यातून तेथील बेकार हातांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीर सगळ्यात प्रिय असल्याने यात स्थानिक मुस्लिम तरुणांचा सहभाग वाढवून पर्यटकांसाठी विश्वासाचे-संरक्षणाचे स्वस्थ वातावरण निर्माण करता येईल. काश्मिरी जनतेसाठी भारतभ्रमण यासारखी व्यापक मोहीम आखली तर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी ते चांगले पाऊल ठरून देशातील हिंदू-मुस्लिम जनतेचा परस्परांशी संवाद वाढून ते भारतीय संस्कृतीशी एकरूप होण्यास मदत होईल. शांततेमुळे काश्मीरमध्ये पर्यटन बहरेल. एकूणच विकासाला चालना मिळून तेथील नागरिक देशाच्या मुख्य प्रवाहात येतील.