Ticker

10/recent/ticker-posts

पवित्र श्रावण महिना

पवित्र श्रावण महिना
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

हिंदू पंचांगाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात देव निद्रिस्त असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बऱ्या वाईट घटनांचा परिणाम मानवी जीवनावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे अखंड छत्र आपल्यावर राहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह व पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र आपल्या डोक्यावर कायम ठेवण्याचाच प्रयत्न जणू  प्रत्येकजण करत असतो. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त मानव सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो.


हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण हा अत्यंत पवित्र असा महिना मानण्यात येतो. गटारी अमावस्येला मनाचा मलीनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार प्रदोष हे सर्व पर्वकाळ ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते. म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.


शंकराला पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला असेल तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच. पण, पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची प्रवृत्ती आहे. त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या ब्राह्मण, पुजारी, गुरव इत्यादींच्या चरित्राचेही साधन होते म्हणून यात मानवताही मानवताही आली आहे.


या काळात जास्तीत जास्त उपवास असल्याचे कारण देवाच्या सानिध्यात वास करायला मिळावा हे आहेच. पण, कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त झाला नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्प सात्विक आहार हे प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरी नामाचा जप करण्यास लागते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


जिभेचे चोचले पुरवण्याचे काम कमी झाल्यामुळे साहजिकच या दिवसांत घरातील महिलांना थोडा आराम मिळतो. व ती सुद्धा आपल्या मैत्रिणींसोबत नटून-थटून देवाच्या पूजेला मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलांची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते. मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी एकत्र जमतात. 


यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसोबत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होत मनाच्या मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात, फेर धरतात व मनातल्या भावना गाण्यांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोऱ्या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात.






टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.