Ticker

10/recent/ticker-posts

दुचाकी स्वराचे सुरक्षाकवच म्हणजे हेल्मेट

दुचाकी स्वराचे सुरक्षाकवच म्हणजे हेल्मेट
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
बरेचसे पालक आपल्या मुलांना कौतुकाने दहावी बारावी झाली की गाडी घेऊन देतात तेव्हा ती मुलं पंधरा-सोळा वर्षांच्या आत असतात. कॉलेजला जायला गाडी हवी म्हणून विनापरवाना दुचाकी चालवणे किंवा चालवू देणे कितपत योग्य आहे? हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला बाइक घेऊन देताना विचार केला पाहिजे. १८ वर्षांखालील मुलांनी वाहन परवाना नसताना दुचाकी वापरायची, त्यावर त्यांनी हेल्मेट घातलेले नसतं आणि नंतर अपघातांचे प्रमाण वाढल्याची चर्चा करत बसायचं हे योग्य आहे का? वाहन चालवण्याचा परवाना असणे किंवा नसणे याला आपण किती महत्त्व देतो? प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन तिथे स्वतः वाहन चालवून इंग्रजी 8 काढून दाखवून किती लोकांनी परवाना मिळवला आहे? 8 काढून दाखवायचे म्हणजे नक्की काय? हेच नागरिकांना माहिती नसते. वाहन परवाना मिळवताना कित्येक लोक फक्त दलालाला पैसे देतात आणि परवाना मिळवायची वाट बघत घरात बसून राहतात, आठ-पंधरा दिवसांत घरपोच वाहन परवाना मिळतो. हे असले प्रकार थांबले पाहिजेत. कारण अशा प्रकारांमुळे वाहन चालक हा योग्य प्रकारे वाहन चालविण्यास सक्षम नसतो. त्यास रहदारीचे नियम माहिती नसतात. थोड्याशा अंतरासाठी कशाला हवे हेल्मेट म्हणत गाडी पळवतात. पोलिसांनी अडविताच त्यांच्याबरोबर हुज्जत घालताना दिसून येतात.
मुळात हेल्मेट दुचाकी वाहनांचे अपघात टाळू शकत नाही. परंतु, अपघात झाल्यास वाहनचालकाच्या डोक्याला मार लागल्यास मृत्यूच्या दारात जाण्यापासून रोखण्याचा संरक्षणासाठी मदत करीत असते. अपघाताच्या वेळी डोक्याला लागणारा जबरदस्त धक्का बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे आणि संरक्षण देण्याचे बहुमूल्य कार्य फक्त हेल्मेटचा करू शकते. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ प्रमाणे हेल्मेटचा वापर देशात करण्याचे बंधन बऱ्याच वर्षापासून आहे दुचाकी अपघाताबद्दल केलेल्या संशोधनातून डोक्याला मार लागून दुचाकी वाहन चालक जबर जखमी होण्याचे आणि मृत्यू होण्याचे कारण स्पष्ट झालेले आहे. या दुचाकी वाहनांच्या अपघातांमुळे जगातील बऱ्याच देशांनी दुचाकी वाहन चालकाला हेल्मेट वापरण्याची सक्ती केलेली आहे. आपल्या देशातील दिल्ली राज्याने ३५ वर्षापासून आणि पंजाब, केरळ, गोवा राज्याने तर राजस्थानमधील जयपूरमध्ये कर्नाटकमधील बंगलोरमध्ये आणि आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये हेल्मेट वापरण्यासाठी सक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईतही दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती करण्यास सांगितले जात आहे. दुचाकी वाहनांच्या अपघाताच्या वेळी वाहनचालकाला कोणतेही संरक्षण असल्यामुळे डोक्याला मार लागून जबर जखमी होण्याची व त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने समोर आलेले आहे. दुचाकी वाहन चालक कार ड्रायव्हर जवळजवळ तीस पटीने जास्त अपघाताची जोखीम घेत असतो.
कवटीच्या आतील मेंदू शरीरातील हालचालींवर नियंत्रण करीत असतो. मेंदूची रचना सूक्ष्म व गुंतागुंतीची असून त्यास लागलेल्या मारामुळे अथवा लागलेल्या झटक्यामुळे छोटासा धक्का पण मेंदूच्या नियंत्रण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करून मोठ्या प्रमाणात शारीरिक नुकसान होण्याची संभावना असते. त्यामुळे डोक्याचे व त्यातील मेंदूचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुचाकी वाहन अपघातात जखमी होणाऱ्या साधारणपणे ८० टक्के व्यक्तींना अपघातात डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागलेला असतो. तसेच ६८% दुचाकी वाहन चालक हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला बसल्यामुळे अतिशय गंभीर जखमी होत असतात. हेल्मेटचा वापर करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हेल्मेटमुळे वाहनचालकांच्या दृष्टीत काहीही फरक पडत नाही. उलट आपल्या डोक्याचे संरक्षण होते. तसेच आता कित्येक बाईकमध्ये हेल्मेट वाहनांमध्ये ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांना होणारा त्रास केस गळण्याची कारणे आणि मानेला त्रास होत असल्याबद्दल तक्रारसुद्धा चुकीची आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये वाहनांना वेग कमी मिळत नसल्यामुळे हेल्मेट वापरण्यास विरोध करणारे दुचाकी वाहन चालक, अपघातानंतर रस्त्यावर पडत असताना, गुरुत्वाकर्षणामुळे प्रेशरमुळे, वाहनाच्या दुप्पट वेगाने रस्त्यावर पडत असतो, या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
 दुचाकी वाहन अपघातात घरातील कमावत्या आधारभूत व्यक्तीला झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे जबर जखमी व्यक्तीमुळे अपंग झालेल्या व्यक्तींना पुढील आयुष्य दुःखात पार करणाऱ्या, त्यांच्या कुटुंबाला सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, यातना जीव घेणाऱ्या असतात. आधुनिक जास्त वेगवान आणि मजबूत दुचाकी वाहनांमुळे, दुचाकी वाहन अपघातास मोठ्या प्रमाणात सापडून डोक्याला मार लागून जबर जखमी होण्याच्या व मृत्युमुखी पडण्याच्या वाढत झालेल्या भीषण प्रमाणाचा गांभीर्याने विचार करून हेल्मेटचा वापर सक्तीने करण्याचे आवश्यक व निकडीचे झालेले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.