Ticker

10/recent/ticker-posts

नियोजनशून्यतेचे बळी

नियोजनशून्यतेचे बळी
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

कोरोनाने अख्ख्या जगाचीच झोप उडवली आहे. त्यातच आपल्याकडे लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे हातावर पोट असलेल्यांच्या हालाची तर परिसीमाच राहीली नाही. ज्यांनी रोजंदारीवर ठेवायचे त्याच ठेकेदारांनी जर हात आखडता घेतला तर दाद मागायची कुणाकडे...? असा जटिल प्रश्न सध्या बांधकाम, हॉटेल व्यवसाय, विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या मजुरांना लॉक डाऊनमुळे पडला आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभर लॉक डाऊन जाहीर झाल्याने अन  देशातील सारे व्यवहार ठप्प झाल्याणमुळे  हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी हिरावली गेलीय. मुंबईत राहणे, खाणे परवडत नाही आणि लॉक डाऊनमुळे छोटी-मोठी हॉटेल, हातगाड्या, खाउगल्ल्या बंद असल्यामुळे खाणेही मिळत नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच कामधंदा गमावून बसलेल्या मजुरांना 'गड्या आपुला गाव बरा' असे म्हणण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

कोरोनाच्या भीतीमुळे अन खायला अन्न मिळत नसल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा महानगरांमधून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. कधी सायकल, तर कधी सिमेंटचा मिक्सर, दुधाचा टँकर मधून, काहीजण आपले सामान डोक्यावर, मुला-बाळांना कडेवर घेऊन पायी चालत, तर कधी ट्रकच्या टपावरून आदी जे जे मिळेल त्यातून प्रवास करीत मजुर आपल्या जन्मस्थळाकडे जाण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर सात-आठ महिन्यांच्या गर्भवती महिला भर उन्हात चालताना बातम्यांतून दिसल्या. काही रस्त्यातच बाळंत झाल्या. मुंबई ते वाशिम हे अंतर एक गर्भवती महिला मे महिन्याच्या भर उन्हात चालत गेली.  खरेतर हे योग्यच नव्हे तर आपल्यासोबतच आपल्या कुटुंबांचाही जीव धोक्यात घालणारी जीवघेणी धडपड म्हणावी लागेल. मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या अशा ट्रकवर पोलीस कारवाई करतानाची दृश्ये टीव्हीवर बातम्यांमधून रोज पहावयास मिळत आहे.

जेवढं अन्न आपल्याला रोज हवे आहे ते न मिळाल्यास आपण किती दिवस पोट मारून जगू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा. रोजंदारी नसल्यामुळे एखादा मजूर परप्रांतात किती दिवस राहणार? तरीही गेला दीड महिना मजुरांनी तग धरलाच ना..? आणि मग लोक घराबाहेर पडले अन पोलीस रस्त्याने जाऊ देत नाहीत म्हणून लपूनछपून मार्ग काढीत राहिले. आणि त्यातील काहींनी मग रस्त्याऐवजी रेल्वे ट्रॅकची निवड केली असावी. सिंगपूरहून लोकांना आणायला एअर इंडियाचे विमान सोडण्यात आले. 'लॉकडाऊन' होण्याअगोदर अशी दहा-पंधरा विमाने इतर देशातही पाठवण्यात आली होती. मात्र, ज्या असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांच्या दुखण्याची आपण चर्चा करतो आहोत; त्यांच्यासाठी साधी बस अथवा रेल्वे उपलब्ध करून देण्यात येऊ नये हेच आमचे दुर्दैव.

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झोपलेल्या काही मजुरांना मालगाडीने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात सोळा मजुरांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. सटाणा शिवारातील एमआयडीसीच्या उड्डाणपुलाजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जालना येथील कारखान्यात काम करणारे हे मजूर पायी चालत असताना जालना येथून औरंगाबाद रेल्वे स्टेशन कडे निघाले होते. घटनास्थळावरील दृश्य बातम्यांतून पाहताना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे होते.  जालना येथून मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे नसल्याने त्यांनी पोलिसांच्या नाकाबंदी मुळे जालना-औरंगाबाद रोड महामार्ग न वापरता त्याला समांतर जाणाऱ्या रेल्वे लाईनचा मार्ग अवलंबला. त्यानुसार ते सर्वजण १२ वाजेच्या सुमारास पायी चालत निघाले. जालना पासून करमाड पर्यंत ४० किलोमीटरचे अंतर चालून हे मजूर सटाणा शिवारातील रेल्वेच्या १३९/७ या नबरींग पोलपर्यंत पोहोचले. थकवा आल्याने आणि लॉक डाऊनमुळे या मार्गावर रेल्वे येणार नाही, असे समजून २० पैकी १८ मजुरांनी रुळावर अंथरून टाकून अंग टाकले. यातील तीन मजूर रूळ सोडून बाजूला झोपले. थकल्यामुळे सर्वांना गाढ लगेच झोप लागली. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता जालना कडून  पानेवाडीकडे (मनमाड) मालगाडी जात होती. जवळ आल्यावर या मालगाडीच्या चालकाने रोडवर झोपलेल्यांची गर्दी पाहता जोरजोरात हॉर्न वाजविला. मात्र, त्यातील कोणीही न उठल्याने मालगाडी त्यांना चिरडून पुढे निघून गेली. या भीषण अपघातात १४ जण जागीच ठार झाले. तर दोन जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मुत्यू झाला.

हे मजूर रेल्वेने मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी जालन्यावरून औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण, मालगाडीच्या रूपाने मृत्यूच जणू त्यांच्यासमोर धडधडत आला अन या मजुरांचा जीव घेऊन गेला. त्यांचा अपराध हाच की ते रेल्वे रुळांवर झोपले होते. पण, त्यांचावर ही आत्मघाताची वेळ का आली, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. एकीकडे देशभर लॉक डाऊन जाहीर होऊन जवळजवळ दीड महिना होऊन गेला आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने त्यात होरपळलेल्यांचीही संख्या वाढत आहे.
खरेतर या देशातील गरिबांना कुणी वालीच नाही की काय अशी एकंदरीत स्थिती झाली आहे. जातीधर्माच्या नावाखाली आणि गरिबांच्या गरिबीचं राजकारण करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढेच येथील राजकारण्यांना माहीत आहे. गरीब व्यक्ती जगली काय अन मेली काय! कुणालाही कशाशीही काही देणेघेणे नाही. 

आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी आवाज उठवल्यामुळे गेल्या आठवड्यापासून स्थलांतरित कामगारांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत आहे. असे असले तरी वैद्यकीय प्रमाणपत्रापासून ते तिकिटांच्या खर्चापर्यंत अनेक गोष्टींत स्पष्टता आणि नियोजनाचा अभाव यामुळे पुन्हा अराजकाची स्थिती निर्माण झाली आणि घराची ओढ लागलेले मजुर सैरभैर झाले. त्यामुळे या मजुरांचा बळी मालगाडीने घेतला की नियोजनशून्यतेने याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. I have read you article and after reading this I can say that it is very bad situation of workers who come from North indian state like
    Up, MP, Bihar, Zarkhand, orissa, Uttrakhand and other North indian state to get job in Maharashtra and Gujarat. I would like to also say that government of above states should do something for them and provide employment. This is very informative article I really thanks to dadasaheb yendhe to write such type of articles and light on situation of migrated workers. Please do write in future with this type of article

    उत्तर द्याहटवा
  2. गरिबांना वाली नाही कुणी.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.