२१/७/२०

आरोग्यदूतांना मानाचा मुजरा...

आरोग्यदूतांना मानाचा मुजरा...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

 सध्या संपूर्ण जगासह आपल्या देशावरही महाभयंकर अशा कोरोना या रोगाचे सावट आहे. देशभरात या रोगाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातले सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या रोगाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत असताना राज्यातल्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वच्छतादूतांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णसेवेला समर्पित केले आहे. खरे तर इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच जेव्हा कोरोनासारखे महासंकट उभे रहाते तेव्हा त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु, या आव्हानांवर मात करत महाराष्ट्रातल्या आरोग्यदूतांनी आपली रुग्णसेवा चालू ठेवली आहे. आरोग्यदूतांना किती आव्हानांना सामोरे जावे लागत आहे हे बातम्यांमधून आणि समाजमाध्यमांवरच्या व्हिडिओमधून समोर येत आहे. संसर्ग होऊ नये यासाठी सतत विशिष्ट पोषाख घालून डॉक्टर आणि नर्स यांना  रुग्णांच्या सोबत वावरावे लागते. कामाचे तास संपल्यानंतर विशिष्ट पद्धतीने हा पोशाख त्यांना काढावा लागतो. हा  संसर्गरोधक पोशाख इतके तास जवळ बाळगणे म्हणजे स्वतःला त्यात कोंडून घेण्यासारखेच आहे. रुग्णाचा जीव वाचवताना या आरोग्यसेवकांना मेहनत घ्यावी लागतेच. पण त्यासोबत स्वतःलाही संसर्ग होऊ नये याचीही सातत्याने काळजी घ्यावी लागते. स्वतःला संसर्गापासून वाचत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबालाही संसर्ग होण्यापासून रोखायचे असते. तपासणीसाठी आलेला एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे आणि कोणता निगेटिव्ह हे तपासणी नंतरच कळते. तोपर्यंत त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांनाही  संसर्गाचा धोका असतोच असतो. तरीही हे आरोग्यदूत कशाचीही तमा न बाळगता रुग्णसेवेसाठी उभे आहेत.

नागरिकांच्या आरोग्यासाठी पाणीखाते, महापालिका, ग्रामपंचायतीचे सफाई कामगार रस्त्यावर उतरून करणारे दोन हात करत आहेत. आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात जणू गटारी, रस्ते आणि नालेसफाईने ते करत असतात. आरोग्यदूतांच्या रूपात काम करणाऱ्या सफाई कामगारांमुळे देशवासीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण लढत असताना या आजाराला घाबरून स्वच्छतेच्या कामापासून पळ कसा काढायचा? हे आम्हाला जमणार नाही, स्वच्छतेचे काम स्वीकारले आहे ते पूर्ण करणारच, कामापुढे जीव महत्त्वाचा नाही.... ही भावना जणू मनाशी बाळगून स्वच्छता कामगार कर्तव्य पार पाडत आहेत. लॉक डाऊनमुळे देशाचा प्रत्येक नागरिक घरात अन आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार रस्त्यावर अशी स्वच्छता साखळी तयार करून करून कोरोनाला घराच्या बाहेरच रोखून ठेवण्याचं काम जणू हे योद्धे करत आहेत.

कोरोनासारख्या महामारीच्या वेळी घराच्या बाहेर राहून स्वच्छतेचं हे काम अतिशय जोखमीचे बनले आहे. पण, जिगरबाज सफाई कामगार कोणालाही न घाबरता तोंडाला मास्क लावून आणि हॅन्ड ग्लोज वापरत स्वच्छतेचे काम करत आहेत. गोळा केलेला ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून तो रोजच्या रोज डंपिंग ग्राउंडवर जात आहे. एवढेच नव्हे तर हे स्वच्छतादूत नागरिकांना स्वच्छतेची माहितीही देत आहेत. अशा या सफाई कर्मचाऱ्यांना सलाम..!१७/७/२०

सायबर सुरक्षेची गरज

सायबर सुरक्षेची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून त्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यात तज्ज्ञांमार्फत वेगवेगळे सॉफ्टवेअर निर्माण करून त्याद्वारे सुरक्षा देण्याची जबाबदारी विविध कंपन्या पार पाडत आहेत. असे असले तरी याचा वापर करणाऱ्या नागरिकांना स्वतःची जबाबदारी ओळखून सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे. वस्तू मागवणे, विविध सेवांचे शुल्क अदा करणे, पैसे ट्रान्सफर करणे आदी विविध कारणांसाठी ऑनलाइनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सायबर चोऱ्यांचे व फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये. यासाठी बँका मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगतात. परंतु, ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना एटीएम कार्डवरील माहिती व त्याचा पासवर्ड कोणालाही न देणे, फिशिंग ई-मेलवरून माहिती न देणे, लॉटरी किंवा अर्ज न करता नोकरी देणारे ईमेल यापासून दूर राहणे आदी काळजी घेऊन सुरक्षित व्यवहार करावेत. देशात कार्यरत असणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्हेगारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले असून नेहमीच्या पद्धतीने गुन्हे करून पकडले जाण्याचा भोळसटपणा आता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यासाठी युद्धपातळीवर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आजही सायबर गुन्हा घडलाच, तर काय उपाययोजना केल्या पाहीजेत याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यास अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.

सर्वसामान्य लोकांनीही इंटरनेट वापरतानाचे नियम लक्षात घेऊन आपण या सायबर हल्ल्यांना बळी पडणार नाही
याची काळजी घेतली पाहिजे. पण, सगळ्याच बाबींमध्ये बऱ्यापैकी दुर्लक्षच केले जाते हे वास्तव आहे. ऑनलाईन
पेमेंट, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया अकाउंट इत्यादिसाठी असलेल्या आपल्या पासवर्डची पुरेपूर काळजी घेणे
अत्यंत आवश्यक आहे. पासवर्ड जितका कठीण व क्लिष्ट तितका सुरक्षित ठरतो. आणि हॅकर्सना हॅक करणे मुश्किल होते. तसेच पासवर्ड सतत बदलत राहणे गरजेचे आहे. बँकिंगच्या व्यवहारात आता अनेक प्रकारचे वॉलेट, बँकिंग अँप उपलब्ध झाले आहेत. अनेकदा एकसारख्या दिसणाऱ्या अँपमुळे आपली फसगत होते आणि भलताच अँप डाउनलोड होतो. आणि चुकीचे अँप आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह होते. अँपचा वापर सुरू करताना आपण संपूर्ण व्यक्तिगत माहिती त्यात जमा करतो आणि काही तासातच ग्राहकाला लुटले जाते. अँपचे अड्रेस देशाबाहेरचे असतात. त्यामुळे हॅकर्सचा शोध घेणे कठीण होते.

कधीतरी अचानक एखादा कॉल येतो, आपली माहिती विचारतो. अमूक-अमूक बँकेतून बोलतोय असे सांगतो. तुमचे एटीएम कार्ड लॉक झाले आहे, ते सुरू करून देतो असे सांगतो. आपणही घाईत असतो. आपला आधारकार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर त्या अनोळखी व्यक्तीला सांगतो. मोबाइलवर आलेला ओटीपी समोरच्याला सांगतो. आणि नेमके इथेच फसतो. काही वेळातच आपल्या बँकेतील आकाउंटमधून रक्कम निघत असल्याचा मेसेज आपल्या मोबाइलवर येतो. अशा सर्वच प्रकारात सावध राहण्याची आवश्यकता आहे. यापासून वाचायचे असेल तर शाळा, महाविद्यालयांमधून, शहरी विभागातून सायबर गुन्हेगारी, करणे, उपाय आणि पोलीस संरक्षण याबाबतची माहिती पोचवायला हवी.

मोबाइल आणि इंटरनेटच्या अतिरीक्त वापरामुळे जग एका क्लिकमध्ये सामावले आहे. ही स्वागतार्ह गोष्ट असली
तरी एका क्लिकमुळे आर्थिक गुन्हे तितक्याच मोठया प्रमाणात वाढले आहेत, हेही ध्यानात घेणे गरजेचे आहे.
७०टक्के गुन्ह्यांत मोबाईलचाच वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईसह सर्वप्रकारचे पासवर्ड सुरक्षित ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी ठरते. यासाठी उपाय म्हणून आर्थिक व्यवहार करताना सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या कॉम्प्युटवरून करू नका. अनोळखी आणि नवीन वेबसाईट्सना भेट देणे टाळा. सहज अंदाज बांधता येतील असे पासवर्ड नसावेत. बँकेतून बोलतोय, तुमचा आधारकार्ड नंबर सांगा वगैरे असा फोन आल्यास तात्काळ आपल्या संबंधित बँकेला तसेच स्थानिक पोलीस ठाणेत जाऊन तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा! बँक कधीही आपल्या ग्राहकाला फोन करून कुठलीही माहिती विचारत नाही. आपले सेव्हिंग अकाउंट बंद झाले असेल किंवा एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले असेल तर बॅंकेत गेल्यावर रीतसर संबंधित तक्रारीचा फॉर्म भरून दिल्यानंतरच, म्हणजेच आपल्या लेखी तक्रारीनंतर आपल्या विनंतीनुसार बँक आपल्याला नवीन एटीएम पिन देते किंवा आपले खाते पुन्हा सुरू करते. त्यासाठी संबंधित बँकेत जाणे गरजेचे असते. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...