Ticker

10/recent/ticker-posts

कल्पकतेने एसटीला वाचवा

स्थानकांवर 'इन्फो किऑस्क' उभारा 
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

एसटीचा इतिहास महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामित्वाचा इतिहास आहे. प्रवाशांची सोय बघून वाटचाल करताना विकासात या सरकारी उपक्रमाने बजावलेली कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. चार दशकांपूर्वी यशवंतराव मोहिते यांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता मंत्री होता आणि त्यांनी केलेली महत्त्वकांक्षी योजना आजही आठवते. 'गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी' अशी ती घोषणा होती. आज एकविसाव्या शतकात देशातील खेड्यापाड्यांना रस्त्याने थेट राज्याच्या व देशाच्या राजधानीला जोडण्याची भाषा होत असते. तो दृष्टिकोन याच महाराष्ट्रात चार दशकांपूर्वी त्या घोषणेतून व्यक्त झाला होता. याचे किती जणांना आठवण आहे...? त्यावेळेस इतके खेड्यापाड्यापर्यंत पक्के रस्ते झाले नसतील. पण, कच्चे तसेच खडीकरण केलेले रस्ते असतानाही, सामान्य माणसाला त्याच्या आडगावात नेऊन पोचविण्याची जबाबदारी एसटीने उचलली होती. 


अतिशय दुर्गम भागातून महत्त्वाच्या मोठ्या शहरांपर्यंतचे अंतर कमी करणारी एसटी सेवा महाराष्ट्राच्या आर्थिक विकास व औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे चाक बनले होते. त्यातून प्रवासी वाहतूक हा एक मुख्य व्यवसाय उदयास आला हे विसरता कामा नये. तो पुढाकार पुढल्या काळात ज्यांच्या हाती एसटीचा कारभार आला त्यांना टिकवता आला नाही. म्हणूनच त्यात विकृती येत गेल्या. त्याची बाधा मग कामगार, कर्मचाऱ्यांपर्यंत गेली आणि सेवा व सोयी गैरसोयी असल्याचे भासवून त्यावर पर्याय शोधायला सुरुवात झाली. पण, आजही सरकारच्या मालकीच्या प्रवासी सेवेत अनेक सवलती व सुविधा दिल्या जातात. म्हणून तिच्यावर प्रवासी विश्वास ठेवून आहेत. ते भांडवल जीवापाड जपले तर तोट्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्याची कुवत या सेवेत नक्कीच आहे. गरज आहे ती केवळ कल्पकता व प्रयत्नशीलतेची. कारण आज एवढी साधने व सोयी एसटी महामंडळाकडे आहेत, तेवढ्या अन्य वाहतूकदारांकडे नाहीत.


शहरात देशी विदेशी बनावटीच्या गाड्या सुसाट धावत असल्या तरी ग्रामीण, आदिवासी महाराष्ट्राचे लोकजीवन पूर्णपणे एसटीवर अवलंबून आहे. शिवाय, शहरांतही हातावर पोट भरणारे एसटीचे लाखो आश्रयदाते आजही आहेत. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शाळेत नेणारी, आजारी व्यक्तीस तालुक्याच्या दवाखान्यात पोचवणारी, शहरातल्या मुलांना गावाकडच्या जेवणाचा डबा देणारी आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांवर सवलतींचा वर्षाव करणारी एकमेव एसटीच आहे. आज घडीला कित्येक प्रकारच्या सवलती एसटी देतेे. त्या घेताना  फसवणारे बहाद्दरदेखील तेवढेच आहेत. एसटी तोट्यात जाण्याचे या सवलतींचा गैरवापर हे एक कारण आहे. मात्र, एसटी टिकली तरच या सवलती टिकतील. परिणामी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग सवलतीत प्रवास करू शकतील याचे प्रत्येकाने भान ठेवायला हवे.


आज घडीला एसटीकडे राज्यभर कित्येक आगारे (डेपो) आहेत. या जागांचा कल्पक वापर करता येईल. ई-तिकिटे देण्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. मात्र,  ही आधुनिकता केवळ 'व्हर्च्युअल' असून भागणार नाही. रेल्वे प्रमाणे एसटीने तातडीने स्वतंत्र 'एसटी आहार मंडळ' स्थापन करायला हवे. एसटीची कॅन्टीन स्वच्छ, गरम व रुचकर पदार्थ देऊ लागली तर एसटीचे चित्रच बदलून जाईल. जिथे जागा असेल तिथे प्रवाशांसाठी स्वच्छ वेटिंग रूम करणे. दूर पल्ल्याच्या बसेसमध्ये स्वच्छतागृह असणे, केवळ खिडक्यांमधून उत्तरे देणारे पर्यवेक्षक न ठेवता स्थानकांवर 'इन्फो किऑस्क' उभारणे गरजेचे आहे. तसेच एसटी ने बस सेवांचे विकेंद्रीकरण करून छोट्या गावात तसेच रेल्वे स्थानकापासून मिनी बस सेवा चालवणे गरजेचे आहे. तसेच एखादया गाडीत प्रवासी संख्या कमी असेल तर ऐनवेळी त्यांची वेळापत्रके व मार्गात बदल करून खर्चात कपात केली; तर नफा वाढवता येऊ शकतो. 


नियम व नोकरशाहीचा खाक्या कमी करून कर्मचारी व स्थानिक अधिकारी यांना सेवा अधिक उपयुक्त व प्रभावी बनविण्याच्या स्थानिक कल्पना राबविण्याची मुभा उपकारक ठरू शकेल. दुरचा प्रवास करून आलेल्या गाड्यांची फेरीमागे सफाई करण्यानेही प्रवाशांना आल्हाददायक प्रवासाचा आनंद देणे शक्य आहे. वेळच्यावेळी देखभाल, दुरुस्ती यातून गाड्यांचे आयुष्य वाढविणे शक्य आहे. तसेच सेवाभावासाठी अधिक किंमत मोजणारा वर्गदेखील एसटीकडे आणता येईल.   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या