कोरोनावरील स्वदेशी लस
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com )
नववर्षात सर्वात आतुरतेने ज्या गोष्टीची वाट देशावसीय पाहत होते, ती बातमी अपेक्षेप्रमाणे आली. आॅक्सफर्ड-अॅस्ट्रेझेनका आणि पुण्यातील सीरम इन्टिटयूट यांनी तयार केलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या कोविड-19 वरील लसीच्या आपत्कालीन वापराला देशाच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली. हा आनंद द्विगुणित करणारा आहे. याच गोष्टीचा पुढील भाग म्हणजे ‘कोव्हिशील्ड’ सोबतच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीच्या आपत्कालीन वापरालाही औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. एकाच वेळी दोन लसींच्या वापराला परवानगी मिळाल्याने देशस्थ कोविडवर कायमची मात करण्याच्या दृष्टीने लसीकरण कार्यक्रम जोरात सुरू होईल यात शंकाच नाही.
२०२० या वर्षाला कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने संपूर्ण जगास वेठीस धरले होते. भारतातच नव्हे तर जगभरात लाखो नागरिकांचा कोविड-19 या रोगामुळे बळी गेले. कोटयावधी नागरीक या आजाराने संक्रमित झाले. या अभूतपूर्व महामारीने जग ठप्प झाले. लाॅकडाऊनच्या काळात भारतात हजारो किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करून मजुरांनी आपले गाव गाठले. या हालअपेष्टांत कित्येकांना हे जग सोडून जावे लागले. उद्योगधंद्यांची आर्थिक चाके घसरल्याने लाखो नागरिकांचा रोजगार बुडाला. देशातील बेरोजगार आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. अख्ख्या जगाचा थरकाप उडविणाऱ्या या कोविड रोगावर भारतातील संशोधकांनी अधिक परिश्रम करून लस शोधून काढली. त्यामुळे कोविडच्या अंधारावर नवीन वर्ष प्रकाशाची पहाट घेऊन आल्याने भारतीयांसह संपूर्ण जगातील लोकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
सर्वात प्रथम म्हणजे ‘कोविड योद्ध्यांना’ लस दिली जाणार आहे. म्हणजेच पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आडून कोविडबाधितांवरील उपचारांत आघाडीवर असलेल्या तीन कोटी आरोग्य कर्मचारयांना लस दिली जात आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात आणखी २७ कोटी जणांना लस देण्याचे नियोजन असून, हा कार्यक्रम वर्षभर चालणारा आहे. इतक्या मोठया संख्येला लस देण्याचे आव्हान सोपे नाही. पहिल्या तीन कोटींचा टप्पा पार पडल्यास पुढील मोहीम सोपी होऊ शकेल. कोणाला लस द्यावी, कशी द्यावी याबाबतची प्रमाणित प्रक्रियाही तयार आहे. लस आल्याने जीवनात सकारात्मकता निर्माण झाली आहे.
लस आली म्हणजे कोविड संपला, असे नाही. जागतिक आरोग्य संघटनेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वच जण याबाबत आवाहन करीत आहेत. मास्क वापरणे, सुरक्षित वावर, स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर आदी गोष्टींची सवय आणखी काही काळ सुरू ठेवावी लागणार आहे. तसे झाले, तरच सध्या देशात खालावत असलेला कोविडचा आलेख पुन्हा वर सरकणार नाही.
कोविडच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना त्यावरील जालीम उपाय लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून हळूहळू लसीकरण करून घेणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. खरेतर हे चांगले चित्र आहे. सर्वसामान्यांना या आजारापासून वाचवणारे बहुतांष आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी बाहेर पडत आहेत. लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या काळात विविध कारणांमुळे लसीकरण धिम्या गतीने सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार होण्यास सुरूवात झाली होती, ते लसीकरण मोहिमेवरून अनेक प्रश्न उपस्थित करीत होते. मात्र, लसीकरणाच्या मोहिमेतील काही अटी-शर्ती शिथिल केल्याने लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेला आता सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आरोग्य क्षेत्रातील योद्धयांच्या या सहभागामुळे नागरिकांनाही लसीकरण करून घेण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोविड वरील लस आली तरी नागरिकांनी सुरक्षित वावर ठेवला पाहिजे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जे नियम आखून दिले आहेत त्याचे काटेकोर पालन केले पाहिजे. जेव्हा लसीकरणासाठी प्रत्येकाचा नंबर येईल त्यावेळी निश्चितच फायदा होणार आहे. येत्या काळात लसीकरणाचा आकडा वाढेल. त्यामुळे लसीकरण मोहिमेवरील नागरिकांचा विश्वास वाढणार आहे. सगळयांनीच कोविडच्या विरोधातील ही लस घेतली पाहिजे, असे वैद्यकिय क्षेत्रातील जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.
कोविड घेऊन आलेले २०२० हे वर्ष मागे पडले आहे. नव्या २०२१ या वर्षात कोविड असला, तरी त्याचा उद्रेक कमी झाला असून, त्यावरील उपचारासाठीची सुविधा देशात विकसित झाली आहे. त्यामुळे २०२१ हे गेल्या वर्षापेक्षा संपुर्णतः वेगळे असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने गाफील राहून चालणार नाही. कोविडच्या विषाणूत होत असलेला बदल आणि त्याबददल तज्ज्ञ देत असलेले इशारे पाहता, सावधानता बाळगणे गरजेचे आहे, तरच लसीकरणाची मात्रा परिणामकारक ठरेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.