Ticker

10/recent/ticker-posts

जीव घ्यायला लावतं ते कसलं प्रेम?

 समाजाची मानसिकता बदलण्याची गरज

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका २५ वर्षीय शिक्षिका असलेल्या तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जिवंत पेटवण्यात आले. विकेश नामक इसमाने सदर कृत्य केले. ३फेब्रुवारी २०२० रोजी ही घटना घडली. या घटनेत जबर भाजलेल्या त्या पीडितेचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. पण, त्यांना यश आले नाही. त्या पीडितेची मृत्यूशी झुंज आठव्या दिवशी संपली. 


खरंच, खरं प्रेम असा जीव गेला शिकवतं का? आणि जीव घ्यायला शिकवते ते कसलं हो प्रेम? असा प्रश्न यानिमित्ताने समोर उभा ठाकला आहे. आपल्यासोबत असा अनर्थ घडेल याची पुसटशी कल्पनाही तिच्या मनात उमटली नसेल. त्यामुळेच अगदी बिनधास्तपणे सकाळी घरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली कॉलेजला गेल्यावर मुलांना शिकवायचं, कॉलेज संपवून घरी आल्यानंतर मैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा. इतरांप्रमाणे असे अनेक विचार हिंगणघाट येथील त्या पीडित तरुणीच्याही डोक्यात आले असतीलच. तोच एकतर्फी प्रेम करणारा नव्हे, तर एक विकृत, हैवानियत डोक्यात संचारलेला माथेफिरू युवक येतो आणि त्या निरागस, निष्पाप तरुणीच्या मागे धावून तिच्या अंगावर पेट्रोल ओततो. जळत असलेला एक टेंभा तिच्या अंगावर फेकतो. का बरं, आपल्यालाही बहीण, मुलगी आहे असा साधा विचारही त्याच्या मनात येत नाही? असंच पेट्रोल ओतून आपल्यालाही जिवंत जाळलं तर त्या वेदना आपल्यालाही सहन होतील का?असा विचार आजच्या या तरुणपिढीनं, युवावर्गानं करायला नको का? एखाद्याला नकार देणं म्हणजे तिला जीव गमवावा लागणं. हा एवढा गंभीर गुन्हा आहे का...? मुलींनाही भावना असतात, त्यांनाही जगण्याचं स्वातंत्र्य आहे हे या अशा विकृतांना केव्हा कळणार?


एकतर्फी प्रेमातून हत्याकांडे, हल्ली हा प्रकार महाराष्ट्राला काही नवीन नाही. वृत्तपत्रांची पाने उलटताच किंवा न्यूज चॅनेल सुरू करताच एकतर्फी प्रेमातून खून, हत्याकांड, हल्ला आशा बातम्या वाचावयास, ऐकावयास मिळतातच मिळतात. उल्हासनगरचा रिंकू पाटील हत्याकांडाने याची ठळक सुरुवात झाली होती. ३१ मार्च १९९० रोजी हरेश पटेल व त्याच्या साथीदारांनी परीक्षा केंद्रात वर्गात रिंकूवर वार केले व पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. हरेशचे रिंकुवर प्रेम होते. तिने त्याला नकार दिला. तो सैरभैर झाला. त्याने तिचा जीव घेतला. त्यानंतरच्या हत्याकांडाची जी काही मालिका सुरू झाली ती आजही कायम आहे. माहीममध्ये विद्या मोहिते हिला भररस्त्यात ठार मारण्यात आले. सांगलीच्या शास्त्री चौकात सुनीता देशपांडे हिची भरदिवसा हत्या करण्यात आली. 'मला नकार देतेस, तू माझी होऊ शकत नाहीस. तर मग तू कुणाचीच नाही, तुला जगण्याचा अधिकार नाही'. ही मानसिकता यातून दिसून येते. रिंकू, विद्या, सुनिता.. अशी काही निवडक बळीतांची माहिती प्रसिद्ध झाली ती प्रसिद्धी माध्यमांच्या सतर्कतेमुळे. त्यांनी सदर प्रकरणांना प्रसिद्धी दिल्यामुळे बाकीच्या घटनांची प्रसिद्धी झाली नाही. त्यातील बळी त्यांची नावेही कुणाला ठाऊक नाहीत.


हिंगणघाट येथील घटनाही अशाप्रकारेच प्रेमाला प्रतिसाद न देण्यातून घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेतील आरोपी विवाहित असून त्याला छोटी मुलगीही आहे. आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून शिक्षकेस जिवंत जाळण्याची मानसिकता एकदम भयानक अशीच म्हणावी लागेल. असे विकृत मानसिकता आणि त्यास बळी पडणाऱ्या तरुण अथवा पुरुषांना रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.


फक्त प्रत्येक वेळेला घटना घडून गेल्यानंतर कठोर कायदे करावे असे म्हणून चालणार नाही. तर त्यासाठी समाजाची एकंदरीत मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायदेशीर पातळीवरच कठोर काम करत असताना समाजात स्त्री- पुरुष समानता हा विचार खोलवर रुजवायला हवा. हे काम सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून लोकसहभागातून करता येईल. वाढत्या अत्याचाराच्या घटना आजचे सामाजिक वातावरण जबाबदार आहे. मुलांना बालपणापासूनच चांगले संस्कार झाले तर ते वाईट गोष्टींच्या नादाला लागणारच नाही घरातूनच स्त्रीबद्दल आदर करण्याचा आदर्श निर्माण व्हायला हवा.


असे असंख्य माथेफिरू समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत. पण, त्यांच्यातील विकृतीचं काय? हा प्रश्न कायम राहतो. ही प्रवृत्ती आता वेळीच ठेचून काढणं गरजेचं आहे. नाहीतर मुली निर्धास्तपणे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. स्त्री ही हाडामासाची आपल्यासारखीच माणूस आहे तिला वेदना आणि संवेदनाही आहेत. त्याचा आदर करण्याची सुबुद्धी जेव्हा पुरुषांमध्ये येईल. तेव्हाच बलात्कार आणि अत्याचार थांबतील.


सदर लेख महिलांचे अग्रगण्य मासिक माझी सहेली यामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या