-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
सध्या महिला घरदार आणि नोकरी नेटाने सांभाळत असून त्या आता मोकळ्या हवेत उंच भरारी घेत आपले स्थान निर्माण करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महिलांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी बलिदान दिले, तर काही महिलांनी जनतेसाठी लढत असलेल्या आपल्या नवऱ्याला त्यांच्या कामगिरीत साथ दिली. त्यापैकी रमाबाई आंबेडकर यांनी त्याग करून नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनी अन्याय स्वीकारत महिलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेत त्या पहिल्या शिक्षिका झाल्या. तसेच सर्वत्र गाजत असलेला मराठी चित्रपट 'आनंदीबाई जोशी' हा चित्रपट सर्व महिला व पुरुष वर्गाला भावला. डॉक्टर आनंदीबाई पहिल्या डॉक्टर महिला ठरल्या. केवळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले गोपाळराव यांच्यामुळेच. त्या पहिल्या स्त्री डॉक्टर बनल्या आणि त्याचप्रमाणे संसर्गजन्य कुष्ठरोगावर काम करत प्रकाश आमटे यांना साथ देत त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांनी सुद्धा अनेक आदिवासी भागातील लोकांची आरोग्य सेवा करत त्या सर्वांच्या आई झाल्या.
सिंधुताई सकपाळ म्हणजे सर्वांच्या 'माई' यांनी अनेक संघर्ष करत निराधार मुलांना आधार देत मोठे केले. त्यांना सांभाळत त्यांच्या त्या आई झाल्या. अशाच अनेक महिला आजही लढत आहेत. प्रत्येकाचे कार्य मोठे आहे आणि या कार्यालाच सर्व महिलांनी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचे विचार समजून ते आत्मसात करण्याची गरज आहे. या सर्व महिला कष्टातून लढत मार्ग काढत सर्वांना दिशा देत एक प्रेरणादायी ठरल्या आहेत. या महिलांप्रमाणे अनेक महिला सामाजिक कार्यकर्ते स्त्री स्वातंत्र्याची बीजे रोवताना दिसून येत आहेत.
पूर्वी महिला फक्त 'चूल आणि मूल' एवढ्यातच सीमित होत्या. सतीप्रथा, बालविवाह, केशवपन यासारख्या गंभीर अत्याचारांना सामोरे जायच्या. त्यामुळे अनेक वेळा त्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. पूर्वी ग्रामीण भागातील महिला साक्षर नव्हत्या. त्या घराचा किंवा घरातील माणसांचाच विचार करत होत्या. त्यामुळे घराचा उंबरठा ओलांडताना त्यांना कित्येकदा विचार करावा लागत होता. परंतु अनेक युवक पुरुषांनी या महिलांना शिक्षित केले. स्त्री स्वातंत्र्याची बीजे रोवत त्यांना स्वबळावर जगण्यासाठी उभं करत घरादाराच्या प्रगतीप्रमाणेच स्वतःचा विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. बदलत्या काळानुसार महिलांचे राहणीमान जरी बदलत असले तरी आधुनिक जगात वावरताना पूर्वीपेक्षाही कित्येकपट आज महिला प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी करताना दिसत आहेत. तरीही आजच्या युगात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतोय. स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. त्यात कौटुंबिक कलह आणि वाढते अत्याचार यांचे प्रमाण अधिक दिसून येते. या अत्याचारापासून महिलांनी आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. एकीकडे आपण म्हणतो की, स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले याच स्वातंत्र्यामुळे तिला आता विविध गोष्टींपासून सुद्धा सावध राहणे ही तिची स्वतःसाठीची लढाई आहे. तेव्हाच ती तिच्या सुरक्षेमध्ये खऱ्या अर्थाने सक्षम होईल. समाजाने देखील महिलांप्रती मदतीचा हात पुढे केला पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.