मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांच्यासोबत डॉक्टर, पोलीस यांचे अचूक नियोजन
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
देशासह राज्यात कोविड बाधितांचा आकडा वाढत होता. मुंबईतही एप्रिल २०२० मध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत होती. अशा परिस्थितीत आशिया खंडातील मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावी मध्ये कोविड-१९ शिरला तर काय परिस्थिती उदभवेल..? या प्रश्नाने त्यावेळी प्रशासन चिंतेत होते. मात्र कोविडने त्याचा रंग दाखविलाच. जगभरात प्रत्येक ठिकाणी त्याचा शिरकाव झाला. त्याला धारावी तरी कशी अपवाद ठरणार होती. एप्रिलमध्ये कोविडने आगमन केले आणि महापालिका प्रशासनासोबत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. जे काही कोविडला रोखण्याकरता नवीन नवीन प्रयोग झाले त्याची सुरुवातच या परिसरातून झाली. भीतीदायक वातावरणात आरोग्य कर्मचारी अक्षरशः प्राणाची बाजी लावून धारावीतल्या झोपडपट्ट्यांमध्ये, गल्ल्यांमध्ये फिरत या आजाराबाबत जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवत होते. तेथील डॉक्टरांनीही प्रचंड मेहनत घेतली.
धारावीमध्ये एका दिवसात एकही रुग्ण न सापडणे हा चर्चेचा विषय आहे. कारण, त्या वस्तीला तशी पार्श्वभूमी आहे. त्यावेळी कोविडची संख्या मुंबईमध्ये वाढत होती. त्यावेळेस सात जुलैला दिवसभरात या भागात एकच नवीन रुग्ण सापडला. तर यावेळी या भागातील कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घेत मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील पाठ थोपटली होती.
काय केलं आपण...? कोणती चांगली कामगिरी केली..? की, जगानेही आपली दखल घेतली. पुढील संभाव्य कारणे असू शकतात. १) भारतीयांमध्ये हर्ड इम्मुनिटी विकसित झाली आहे. उदाहरणार्थ सेरॉलॉजिकल सर्व्हेनुसार, दिल्लीतील निम्म्याहून अधिक लोकांमध्ये covid-19 अँटीबॉडीज आहेत आणि त्यांना यापूर्वीच कोरोना झाला होता. त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत आणि विषाणू लोकसंख्येमधून गेला, यातून हे दिसते की २) विषाणूशी लढण्याची भारतीयांची प्रतिकारशक्ती पाश्चिमात्त्य देशांपेक्षा चांगली आहे. केवळ तज्ज्ञच हे ओळखू शकतात की, त्यामागे आपल्या मुलांचे धुळीत खेळणे, आपले मसालेयुक्त खाद्यपदार्थ, स्ट्रीट फूड, जास्त सूर्यप्रकाशात वावरणे आहे किंवा लठ्ठपणाचा कमी दर हे अशी करणे असू शकतात. तथापि, आपल्यापेक्षा पाश्चात्त्य देशांमध्ये या विषाणूंचा हल्ला अधिक प्राणघातक होता. इतर कारणांमध्ये हे समाविष्ट असू शकते, ३) सुरक्षित राहण्याची प्रवृत्ती भारतीयांमध्ये आहे. त्यांना माहीत आहे की आजारी पडल्यावर कोणीही त्यांना वाचवण्यासाठी येणार नाही. स्वतःचे संरक्षण करण्याची मजबूत मानसिकता लोकांना सतर्क ठेवते. आणि ४) सुरुवातीच्या कठोर लॉकडाऊनमुळे भारतीयांमध्ये या आजाराबद्दल बरीच जागरूकता आली. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगली. आणखीही काही कारणे असतील. पण, आपल्याकडे पाश्चात्त्य देशांसारखी भयावह स्थिती दिसली नाही.
आशिया खंडात धारावी ही दाट वस्ती असलेले एक मोठी वसाहत आहे. अनेक देशांना धारावीची ओळख विविध कारणांवरून आहे. आज रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचे श्रेय मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्यासोबत येथील स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिटी, छोटी-छोटी मंडळे यांना खऱ्या अर्थाने जाते. या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे येऊन कोविडला आळा घालण्याचा प्रयत्न केला. धारावीचा एकूण परिसर २.५ चौरस किलोमीटरचा असून या परिसरात ९ लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. या काळात धारावी हा परिसर अनेकांसाठी तिरस्काराचा विषय ठरला होता. धारावीमध्ये जर या संसर्गजन्य आजारांचा उद्रेक झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला असता. पण, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे आरोग्य विभाग यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, महापालिकेचे अधिकारी, आरोग्य यंत्रणा, स्थानिक पोलिस, राजकारणी, स्थानिक खाजगी डॉक्टर यांनी या आजारविरोधात एकत्रितपणे लढा दिला.
प्रत्येकाची घरोघरी जाऊन चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेत त्यांचे अलगीकरण करणे हे या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि कोविड-१९ वर विजय महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही. योग्य नियोजनामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे त्याचे श्रेय या सर्व कोरोना योद्ध्यांना जाते. याच सकारात्मक वातावरणामुळे धारावीचे नाव जगात आदराने घेतले जात आहे. धारावीचे गोडवे गायले जात आहेत. सर्वजण एकत्र येऊन कशा पद्धतीने आजराविरुद्ध लढा देऊ शकतात याचे एक उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
आता लसीकरण सुरू झाले आहे. तरीदेखील प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. कोविडचा १४० कोटी लोकांवर होणारा परिणाम कमी करून भारताने मोठे यश संपादित केले आहे. हे जगाने मान्य करण्याची हीच वेळ आहे. आम्ही या महामारीशी लढा देताना दाखवलेल्या धैर्याबद्दल आपली पाठ थोपटून घ्यायची हीच वेळ आहे. तेव्हा जोपर्यंत कोविड-१९ या जगातून जोपर्यंत हद्दपार होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे नव्हे स्वतःची 'माझी जबाबदारी' आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.