-दादासाहेब येंधे
आनंदाची अभिव्यक्ती आणि अनुभूती देणाऱ्या घटना, प्रसंग यांची स्मृती, मानवी जीवनात परंपरेने सण-उत्सव होऊन उभी राहते. भारताचा सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात किंवा ग्रंथांच्या कोषात नाही, तर तो त्यांना साजिवंत करणाऱ्या सण-समारंभात एक आनंद सोहळा होऊन उभा राहत आहे. म्हणूनच सण आणि उत्सव हे माणसाला खूप प्रिय वाटतात. महाकवी कालिदासाचे, 'उत्सवप्रिय: खलु मनुष्य:' हे वाक्य जणू, माणसाचे सांस्कृतिक लक्षणच सांगून जाते. नित्याचे व्यवहार, कामे, लौकिक जबाबदाऱ्या पार पाडताना, जाणवणारा 'तोच तो पणा' आणि त्यातून येणारे जडत्व घालवून, सण-उत्सव हे चैतन्याचे नवे अंगण उभे करतात. सामूहिक लोकजीवनाचा आनंद लुटतात, म्हणून सण उत्सव हे प्रसन्नतेचे प्रेरक, प्रेमाचे प्रबोधक तर भावनांचे संवर्धक ठरतात. भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजे भारतातील सण आणि उत्सव. पितृपूजा, वीरपूजा, धर्मोत्सव, ऋतुपरिवर्तन, निसर्गपूजा आणि कृतज्ञता अशा वेगवेगळ्या कारणाने भारतीय सण हे समाज जीवनाला जगण्यातल्या आनंदाची आणि आनंदाच्या जगण्याची जाणीव करून देत आहेत.
दिवाळी हा नुसता सण नाही तर दीपोत्सव आहे आणि दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही तर उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे सहा उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन या उत्सवात संमिलीत झालेले आहेत. संत साहित्यात आणि लोकसाहित्यात दिवाळीचे अनेक संदर्भ देण्यात आलेले आहेत. संत साहित्यातील दिवाळी ही तत्व दर्शनाने उभी राहते. तर लोकवाणीतील दिवाळी ही भावदर्शनाने. दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. भारतीय संस्कृती ही तेजाची उपासक आहे. प्रकाशाची उपासक आहे. आणि 'दीप' हा त्या प्रकाशाचे रूप आहे. जो स्वतः प्रकाशतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करतो. तो तेजोमय दीप अखंड प्रज्ज्वलित रहावा आणि त्याच्या प्रकाशात समृद्धीची वाटचाल घडावी हेच या दीपोत्सवाचे आगळे रूपक आहे.
संतांना ज्ञानाची दिवाळी, महासुखाची दिवाळी आणि नित्य किंवा निरंतर दिवाळी अभिप्रेत आहे. लोकजीवनातील दिवाळीच्या आनंदाचे रूपक संतांनी आत्यंतिक आनंदाच्याच अभिव्यक्तीच वापरले आहे. संतांच्या लेखी साधुसंतांच्या भेटी, हाच खरा आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात,
साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा|
संतांनी एका अत्युच्च तत्त्वदर्शनातून दिवाळी उभी केली आहे. ज्ञान, विवेक, आनंद, साम्यावस्था, संतभेट अशा विविध तत्त्वांनी दिवाळी साजरी केली म्हणून ती महासुखाची ठरली.
दिवाळी दिवाळी असा नाही दुजा सण|
सारवली घरे, वाडी तुळशीचे अंगण|
अंगणात विसावाला नंदाचा नंदन|
काकड्याची घंटा त्याला भक्तीचं कोंदण|
सारवलेली घरे, सजलेले तुळशी वृंदावन, प्रसन्न अंगण, गावच्या देवळातली पहाटेची काकडआरती या सर्व आनंदात दिवाळीला सुरुवात होते. गाव, शिवार, सासर, भाऊ, बहिणी, नातीगोती, शेती, बैल या साऱ्यांना ओवीतून मांडून जगण्यातल्या साधेपणाचे चित्र गावच्या ठिकाणी उभे राहते. दिवाळी हा जसा लक्ष्मीपूजेचा सण आहे, नववर्षाच्या स्वागताचा सण आहे, तसाच तो बहीण-भावाच्या निरागस प्रेमाचाही सण आहे. या प्रेमाचे अनुबंध ओव्यांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत. भावाच्या प्रेमाची ओढच तिला माहेरी घेऊन जात असते.
आला दिवाळीचा सण
दिवाळी सुनसुन|
नाही बंधुले बहीण
ओवाळील कोण||
आला दिवाळीचा सण
वानं दिसते उघड|
नाही बहिणीले भाऊ
कोण घेईल लुगडं||
दिवाळीचा सण आहे; पण भावाला जर बहीण नसेल तर ओवाळणार कोण? आणि बहिणीला भाऊ नसेल तर लुगडे घेणार कोण? असे झाले तर दिवाळी सुनी सुनी आहे असे सांगून, कौटुंबिक प्रेमधाग्याने दिवाळी कशी बांधली आहे, हेच तिला सांगायचे आहे. डॉ. खोडे यांच्या 'स्त्रियांची गाथा' या पुस्तकात असे संदर्भ आले आहेत.
भारतातील प्रत्येक सण हा कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे. दिवाळीही त्याला अपवाद नाही. दिवाळीची वसुबारस हे त्याचेच प्रतीक आहे. त्या दिवशी शेतकरी पशुधनाची म्हणजे आपल्या गोठ्यातील गुरांची पूजा करतो. रानात गुरांच्या मागे धावणारी गुराखी मुले, गवताच्या काड्यांचा गोफणीसारखा दिवा विणतात. त्याच्या मध्यभागी पणती ठेवून, गायी-गोऱ्ह्याला ओवाळतात. त्यावेळी त्यांच्या तोंडून निघणारी लोकगीते फारच सुंदर वाटतात.
दिन दिन दिवाळी|
गाई म्हशी ओवाळी|
गाई म्हशी कुणाच्या|
लक्षुमनाच्या ||
लक्षुमन कुणाचा
आईबापाचा |
दे गं माझी खोबऱ्याची वाटी|
घालीन वाघाच्या पाठीत काठी|
बहुळा गाय गुणी गेणुबा,
बहुळा गाय गुणी|
जाय यमुना तीरी गेनुबा
जाये यमुनातील तिरी|
बहुळ्या गाईचा गोऱ्हा गेनुबा
बहुळ्या गाईचा गोऱ्हा|
तुला सांगतो होरा|
असे म्हणत गाय, गोऱ्हा, शिवार, चारा, होरा या साऱ्या विषयांचे संदर्भ घेत वसुबारसेचे 'गुराखीगीत' गोठ्या गोठ्यांतून आनंदाचा नाद घुमविते. खोबऱ्याची वाटी आणि रेशमी करदोटा देऊन गुराख्याची बोळवण करण्यात येते.
एकीकडे संत साहित्यातील तत्त्वदर्शन आणि दुसरीकडे लोकवाणीतील भावदर्शन यातून दिवाळी सणाचे एक आनंदतत्व उभे राहते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.