Ticker

10/recent/ticker-posts

गणेशोत्सव आणि राष्ट्रीय जागृती

सध्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक 'इव्हेंटम्हणून होऊ लागली आहेसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्थकारण जे पूर्वी परिसरातील रहिवाशांच्या ११ रुपये व  दुकांनदारांच्या ५१ रुपयांच्या पावतीवर चालायचे तिथे आता लाखोंचा व्यवहार सुरू झाला आहेसध्याचा गणेशोत्सव हा निव्वळ सांस्कृतिक किंवा धार्मिक सोहळा राहिलेला नाही

-दादासाहेब येंधे 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा त्यांचा शुद्ध हेतू होता तो म्हणजे स्वातंत्र्यासाठी राष्ट्रजागृती करणे. त्यांच्या काळात त्यांनीच सुरू केलेला गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवांचे उद्दिष्ट पार पडले. स्वातंत्र्य मिळाल्यावरही हे दोन्ही उत्सव थाटात साजरे केले जातात. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. मनोरंजनाचे कार्यक्रमही दर्जेदार असत. अनेक नावाजलेले कलाकार गणेशोत्सवात आपली कला सादर करीत असत. ११ रुपयांच्या पावतीसाठीदेखील पाच-पाच चकरा माराव्या लागायच्या आणि निरुत्साही होता तेवढ्या चकरा मारल्या जायच्या. नोकरी-धंदा बाजूला ठेवून मेहनत करून देखावे उभे करणे हे तेव्हाचे भूषण होते. 


काळ बदलला तसे कार्यकर्तेही बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमगाटाला, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. श्रमापेक्षा पैशांची किंमत वाढली. झगमगाटी आणि डोळे दिपवणाऱ्या सजावटीवर  फुटी किंवा त्याहीपेक्षा उंच मूर्तीवर वारेमाप खर्च केला जातो. परिणामी, गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवत चालला आहे असे वाटत आहे. मोठ्या शहरांमधील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे वर्षभर काही ना काही सामाजिक कार्य करत असतात हे खरे असले तरी गणेशोत्सवाच्या काळांत जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचायला हवा तो पोचत नाही आणि उत्सवाचे झगमगते अर्थकारण कोणाही सामान्य माणसाला कोड्यात पाडते.


सध्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक 'इव्हेंट' म्हणून होऊ लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांचे अर्थकारण जे पूर्वी परिसरातील रहिवाशांच्या ११ रुपये व दुकांनदारांच्या ५१ रुपयांच्या पावतीवर चालायचे तिथे आता लाखोंचा व्यवहार सुरू झाला आहे. सध्याचा गणेशोत्सव हा निव्वळ सांस्कृतिक किंवा धार्मिक सोहळा राहिलेला नाही. गणेशोत्सवाद्वारा माणसांना जोडण्याची गरज आहे; परंतु तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. भपकेपणामुळे आपण आपल्या देवतेचाच अपमान करीत आहोत, हे लोक विसरताहेत. कारण त्यांना गणपतीचे महत्त्वच ठाऊक नाही. गणपती हा लोकांसाठी सुखकर्ता आहे. तो लोकांवर आलेली विघ्ने दूर करतो. तो दीनदुबळ्यांचा उद्धारकर्ता आहे. अशा लोकदैवताचा उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

 

लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती सार्वजनिक केला. याचे कारण त्यांना लोकसंग्रह करायचा होता. लोकांचे नाते राष्ट्राशी जोडायचे होते. त्यामुळे सार्वजनिक गणपती उत्सव हा धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे याचे भान सर्वांनीच बाळगायला हवे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडले जाईल,  हे टिळकांना ठाऊक होते. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवात माणूस जोडणारे कार्यक्रम आयोजित केले तर राष्ट्र जोडण्यास तरुणांचा हातभार लागेल. देवळांतून जमा होणारा पैसा हा लोकोपयोगी राष्ट्रोपयोगी कामासाठी वापरला गेला पाहिजे, असा विचार त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. मोठमोठी आरास आणि देखावा करण्यापेक्षा जनतेसाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास खरी ईश्वरसेवा केल्यासारखे होईल.


देवाकरिता मनुष्य नसून मनुष्यांकरिताच देवाचे अस्तित्व आहे. गणेशोत्सवातून जमा होणाऱ्या निधीतून वाचन केंद्र, नवीन हॉस्पिटल, गरीबांना मदत अशी सामाजिक बांधिलकीची अनेक कामे करून त्यातून लोकांचा सहभाग कसा जास्त होईल, याकडे गणेश मंडळांनी लक्ष दिले पाहिजे. गणेशाची मूर्ती किती फुटांची आहे यापेक्षा गणेशाच्या भक्तांची संख्या किती मोठी करता येईल आणि त्या लोकसहभागाकडून तो कार्यक्रम भव्यदिव्य कसा करता येईल याकडे मंडळांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. आज समाज अनेक कारणांनी पीडित झालेला आहे. त्याला त्यातून कसे सोडविता येईल, त्याला मदत नाही तर कमीत कमी योग्य मार्गदर्शन कसे करता येईल यासाठी सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न मंडळांनी केला पाहिजे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या