Ticker

10/recent/ticker-posts

खाकीतल्या दुर्गाही वंचित...

 महिला पोलिसांच्या प्राथमिक सुविधांकडे

 सरकारकडून डोळेझाक 

-दादासाहेब येंधे

कायदा सुव्यवस्थेचा विषय निघाला, तर पहिली आठवण येते ती पोलिसांची. मुंबईतील लाखो नागरिकांची सुरक्षा ज्या पोलिसांवर अवलंबून आहे, तेच पोलीस मात्र सुविधांपासून वंचित आहेत. मुंबईतील नागरिकांच्या कायदा- सुव्यवस्थाविषयक समस्या या एक-दोन आहेत का? नाही! इथे समस्यांचा डोंगरच उभा आहे. खतरनाक गुंड, समाजकंटक, पाणीचोर, पाकिटमार, सोनसाखळी चोर, भामटे, खंडणीखोर, लाचखोर, अशा साऱ्या समाजस्वास्थ्य विरोधी घटकांनी अक्षरशः थैमान घातलं आहे. जनतेला भेडसावणाऱ्या कायदा- सुव्यवस्थाविषयक समस्यांची व्यापकता आणि स्वरूप भयंकर आहे. ते दिवसेंदिवस अधिक भयानक होत चाललं आहे. 


दीड कोटीपेक्षाही अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात दररोज  हजारोंची भर पडत आहे. आणि या समस्याग्रस्त महानगरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसी मनुष्यबळ आहे, जेमतेम अंदाजे ५५हजार! त्यातले निम्मे आहेत व्हीआयपी बंदोबस्तासाठी! परिणामी, पोलिसांमध्ये नैराश्य घर करतंय. त्यातही महिला पोलीस म्हटलं तर, घराकडे आणि स्वत:कडे संपूर्ण दुर्लक्षच!, आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा... ?


महिला पोलिसांच्या प्राथमिक सुविधांकडे सरकारकडून डोळेझाक होते. असं नसतं, तर पोलीस ठाण्यात महिला पोलिसांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, विश्रांतिगृह असली असती. वाहतूक खात्यातही महिला पोलिसांची भरती होत आहे; पण त्यांच्या प्राथमिक सुविधांची सरकारकडून फारशी काळजी घेतली जात नाही. कामाच्या अनियोजित वेळा, वेळी-अवेळी खाणं, त्यामुळे निर्माण होणारा कामाचा त्रास या सगळ्या गोष्टी महिला पोलिसांच्या अनारोग्यास कारण ठरत आहेत.


वाढते कामाचे तास

पोलिसांची सर्वांत मोठी समस्या आहे, ती म्हणजे कामाची अनियमित वेळ आणि तास. दहा ते बारा तासांची ड्युटी. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद, मोहरम, इलेक्शन, संमेलनं, दंगली, सभा, नेतेमंडळींना संरक्षण इत्यादी ठिकाणी पुरुष पोलिसांबरोबर महिला पोलिसांनाही घेतलं जातं. तेही सकाळी सात वाजताच दिलेल्या पॉइंटवर हजर राहणं गरजेचं. बंदोबस्ताची कामं लागतात तेव्हा पोलिसांच्या मंजूर झालेल्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात. “आम्हा पोलिसांना खासगी आयुष्यच नाही," असं निराशाजनक विधान बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस करताना दिसून येतात. कामाच्या अनियमित वेळेमुळे कित्येक महिला पोलिसांना त्यांच्या कुटुंबासाठी वेळच देता येत नाही. कित्येक जणींना स्वत:ची तान्ही मुलं घरी अथवा शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे किंवा पाळणाघरात सोडून बऱ्याचदा ड्युटीवर हजर राहावं लागते. मुलांच्या आजारपणात, त्यांच्या परीक्षांच्या दिवसांत कित्येक पोलीस आईंना मुलांकडे लक्षच देता येत नाही. घरगुती समारंभात किंवा नातेवाइकांच्या एखाद्या कार्यक्रमात वेळेवर उपस्थित न राहू शकल्यामुळे कुटुंबातील नातेवाइकांचे रोष सहन करावे लागतात.


स्वसंरक्षणासाठी हत्यार नाही

पोलीस दलाला सक्षम करण्यासाठी नवनवीन योजना आखल्या जात आहेत. पोलिसांच्या हाती लाठ्यांऐवजी पिस्तूल सोपवलं जात आहे. मात्र, महिला पोलिसांच्या हातात साधी काठीही नसते. पुरुष पोलिसांप्रमाणे,या महिला पोलीसही खडतर प्रशिक्षण घेतात. मात्र, प्रत्यक्षात यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते. महिला आरोपींची कोर्टात ने-आण करणं, मोर्चा तसंच बंदोबस्ताच्या ठिकाणी यांना हजेरी लावण्यास पाठवलं जातं. कधी-कधी वायरलेसही सांभाळावी लागते. बंदोबस्ताच्या ठिकाणी जर आणीबाणी निर्माण झाली किंवा एखाद्या आरोपीने अथवा कुणी नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला, तर स्वसंरक्षणासाठी यांच्याकडे ना काठी ना हत्यार!


प्रथाधनगृहाची कमतरता

बऱ्याच पोलीस ठाण्यात महिलांसाठी चांगली प्रसाधनगृह नाहीत. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात महिलांसाठी चांगल्या दर्जाचं स्वच्छतागृह असावं, असं कायदा म्हणतो. परंतु, पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलिसांसाठी चांगल्या दर्जाचं स्वच्छतागृह नसल्याची दखल वरिष्ठ स्तरावर फारशी घेतली जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी काम करणं म्हणजे एक प्रकारे  शिक्षा भोगण्यासारखंच आहे. चांगल्या दर्जाची सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे बंदोबस्ताला असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे हाल होतात. परिणामी, कित्येक जणींना युरीन इन्फेक्शनचा त्रास भोगावा लागत आहे. आणि मासिक पाळीच्या वेळी तर यांची कसोटीच असते. या सगळ्या समस्यांचा परिणाम या महिला पोलिसांच्या आरोग्यावर होतो. हृदयरोग, मधुमेह, नैराश्य यांसारख्या शारीरिक आणि मानसिक व्याधी जडतात. या आजाराचा परिणाम या महिलेच्या कुटुंबावरही कळत-नकळत होतो. म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं आणि महिला पोलिसांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे.


हवी सन्मानाची वागणूक

जनतेच्या रक्षणासाठी आणि समाजात शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अहोरात्र झटावं लागतं. डोळ्यांत तेल घालून बंदोबस्त करावा लागतो. असं काम करत असताना पोलीस यंत्रणा किती अडचणींना तोंड देत असते, याचा फारसा विचार केला जात नाही. असा विचार होणं गरजेचं आहे, असं महिला पोलिसांचं स्पष्ट म्हणणं आहे. कामाचे तास निश्चित नसल्यामुळे शरीर आणि मन थकणं स्वाभाविकच आहे. “शेवटी आम्हीही हाडामासाची माणसंच आहोत". आम्हालाही काही वैयक्तिक अडी-अडचणी असतात. तर अशा अडचणींकडे वरिष्ठांनी लक्ष दिलं पाहिजे," असं महिला पोलिसांचं म्हणणं आहे. असं झालं तर वरिष्ठांविषयी गैरसमज, नाराजी या बाबी टाळणं शक्य होईल. एखादी ड्युटी जमत नसल्यास बदलून द्यायला सांगितली तर देण्यास हयगय केली जाते. वर कोणी सांगितलेलं तुम्हाला पोलीस खात्यात यायला? नोकरी सोडा आणि घरी बसा”, अशा शब्दांत सज्जड दमच या महिला पोलिसांना भरला जातो. 'कुठे नोकरी मिळत नव्हती, म्हणून पोलीस खात्यात आलो' अशा छापाच्या सगळ्याच महिला पोलीस नाहीत, तर जनतेची सेवा करण्यासाठी, महिलांना त्रास देणाऱ्यांना अनुशासन करण्यासाठी खात्यात त्या आल्या आहेत, हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे.


आता जुन्या पद्धतींप्रमाणे पोलीस खात्याला वागून चालणार नाही. काळानुसार बदल करायलाच हवेत...






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या