Ticker

10/recent/ticker-posts

महिलांचा सन्मान ही काळाची गरज

महिलांचा सन्मान ही काळाची गरज!
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

सध्या सगळीकडे ‘मी टू’ मोहिमेची चर्चा आहे. ‘मी टू’च्या व्यासपीठाचा वापर करून अनेकजणी आपल्यावरच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. ही चळवळ फोफावत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसवण्यासाठी फक्त ‘मी टू’सारख्या मोहिमा राबवून उपयोग नाही, तर त्यांना योग्य तो मानही मिळायला हवा. त्यासाठी या मोहिमेच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा.

'मी टू ' मोहीम भारतात आता कुठे सुरु झाली  आहे, मूळ धरू लागली आहे, रुजू लागली आहे. पण, जगभरात हि मोहीम खूप आधी सुरु झाल्याने समाज याबाबत बराच जागरूक झाला आहे, असं  वाटते. प्रत्यक्षात महिलांना अशा अत्याचारांना सामोरं जावं लागणं हीच खूप दुर्दैवी बाब आहे. एकीकडे आपण देवीची पूजा करतो, तर दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार करतो. हे मानवजातीला शोभणारं नाही. हि मोहीम फक्त चित्रसृष्टीपुरती मर्यादित नाही. शाळेपासून अगदी आयटी क्षेतापयर्यंत अशा गोष्टी घडत असतात. पण, चित्रपट क्षेत्राला असलेल्या वलयामुळे इथे घडणाऱ्या घटना खूप मोठ्या केल्या जातात. त्यांचा अधिक गवगवा होतो. अशा घटना वर्षानुवर्षे घडत आलेल्या आहेत. मी तर म्हणेन, घरातही असे अत्याचार होत असतील. पण, आपला संसार वाचविण्यासाठी महिला याबद्दल बोलत नाहीत. त्या व्यक्त होत नाहीत. फिल्म इंडस्ट्रीचा ग्लॅमरशी असलेला संबंध लक्षात घेता या क्षेत्रातल्या घटना अतिशयोक्तीने सादर केल्यासारख्या वाटतात. 'मी टू ' मोहिमेबद्दल मी आतापर्यंत जे ऐकलं, वाचलं आहे त्यावरून मला असे वाटते.


'मी टू' च्या आवाक्याबद्दल बोलायचं तर यामुळे लोक आणि विशेषकरून महिला एक पाऊल पुढे टाकू लागल्या आहेत. आपल्यावर बेतलेल्या प्रसंगांविषयी बोलू लागल्या आहेत. अत्याचारांना वाचा फोडू लागल्या आहेत. ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. ‘मी टू’ची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. घरानंतर महिला कामाच्या ठिकाणी सर्वात जास्त वेळ असतात. तिथेही त्यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा. अशा मोहिमांबद्दल माध्यमांमध्ये चर्चा झडतात, यावर कोणते उपाय करायला हवेत, महिलांनी काय करायला हवं हे बोललं जातं. पण नुसत्या चर्चा करून ‘मी टू’चं वादळ शांत होणार नाही. हे वादळ शांत व्हावं, असं वाटत असेल तर स्त्री मानाने कशी जगेल, हे पाहायला हवं.


‘मी टू’ ही सोशल मीडियावरची मोहीम आहे. त्यावरचा तो हॅशटॅग आहे. त्यामुळे फक्त समाजमाध्यमांमधून व्यक्त झालेल्या महिलांची किती दखल घेतली जाते किंवा जाईल हा प्रश्न असतो. आपल्याकडे लैंगिक अत्याचाराविरोधात कायदे आहेत. अशा घटनांची गुन्हा म्हणून नोंद करता येऊ शकते. त्यामुळे महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल करायला हवा. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. कायद्याने अशा घटनांची दखल घ्यायला हवी. तक्रारी नोंदवल्या जाऊन रितसर चौकशी व्हायला हवी. तरच या मोहिमेला बळ मिळू शकेल. अन्यथा, हा विषय, या घटना फक्त सोशल मीडियापुरत्या मर्यादित राहतील. काही दिवस त्याची हवा होते आणि मग सगळं काही मागे पडतं. ‘मी टू’ मोहिमेबाबत असं होता कामा नये. कारण ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. या मोहिमेमुळे महिलांच्या हाती एक अस्त्र आलं आहे. महिला अत्याचाराच्या घटना समाजमाध्यमांवर उघड झाल्या तरी त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन गुन्हेगाराला शासन होणं महत्त्वाचं आहे.


‘मी टू’ ही अत्यंत शक्तिशाली मोहीम ठरत असल्याने पुरुषांनाही विचार करायला भाग पाडलं आहे. आपलं वागणं, बोलणं, वावर, स्पर्श, महिलांच्या नजरेला नजर देणं यातून काही चुकीचे संदेश जाऊ शकतात का, याचं भान पुरुषांनाही येणं गरजेचं आहे. ते यानिमित्ताने येऊ शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.