९/३/१९

पाकची सर्व बाजुंनी कोंडी करणे गरजेचे

पाकची सर्व बाजुंनी कोंडी करणे गरजेचे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पुलवामा येथे भारतीय सैन्यावर हल्ला झाल्यानंतर भारतानेही त्यास हवाई हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) करून सडेतोड उत्तर दिले. यासोबतच पाकची आणखी कोंडी करण्यासाठी भारताने आता पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात घेरण्याची तयारी सुरू करण्यास हरकत नसावी.
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची बंदी घालावी आणि भारताने या स्पर्धेतून मागणी घ्यावी अशी मागणी करणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान सतत आपली भूमी दहशतवाद्यांना वापरण्याची मुभा देत आहे. भारत मात्र या दहशतवादाविरुद्ध कायम शांततेने लढत आला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे मत आहे, आणि भारत दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नाही असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
भारतीय संघाचा १६ जूनला मॅंचेस्टर येथे पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. आणि पाकला भारतात येण्याची परवानगी नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र भारताला आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणे बंधनकारक आहे. दोन्ही देशांनी शेवटची पुर्ण मालिका २००७ मध्ये खेळली होती पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी बहिष्काराचा निर्णय योग्य ठरतो. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर बंदी घालण्याची मागणी भारताकडून व्हायला हवी.
विश्वचषक स्पर्धा भले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भरवणार असेल पण त्याचा सर्वाधिक भार भारताने उचलायचा असेल तर तेथेही त्या स्पर्धेत भारताचा सहभाग अगत्याचा होतो. भारताने स्पर्धेतून अंग काढून घेतल्यास एकूण स्पर्धेचा आर्थिक डोलारा डळमळीत होऊ शकतो. कारण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था भारतात आहे आणि तिची इच्छा डावलून विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होऊ शकणार नाही. विश्वचषक क्रिकेट स्पेर्धेसाठी होणारा खर्चही निघणार नाही. त्यासाठी भारतीय कंपन्यांच्या जाहिराती व प्रायोजक अशा स्पर्धेकरिता आवश्यक आहेत. आणि त्यासाठी भारत सरकारची मान्यता अगत्याचे होऊन जाते. आणि ज्या स्पर्धेत भारतीय संघ असू शकत नाही त्याचा आर्थिक भार उचलण्यास सरकार मान्यता देणार नाही. परिणामी, भारतीय कंपन्याही तो आर्थिक भार उचलणार नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली तर विश्वचषक स्पर्धेवर मोठा फरक पडू शकतो म्हणजे भारताने विश्वचषक सामन्यांत खेळताना पाकिस्तानशी सामना खेळणार नाही, असा दावा करण्यापेक्षा पाकिस्तानला या स्पर्धेतून बाहेर लावण्याचा हट्ट धरावा. म्हणजे सरळसरळ क्रिकेट परिषदेला ठणकावून सांगायचे की, त्यांनीच एक दहशतवादी राष्ट्र म्हणून पाकिस्तानला क्रिकेट जगतातून बहिष्कृत करावे; अन्यथा भारत अशा स्पर्धेत खेळणार नाही.
अशावेळी दिवाळखोर दहशवादी पाकिस्तानला विरोध करायला भारत एकटाच नसेल. श्रीलंका, बांगलादेश इतर देशही सहज आपल्या सोबत येतील. याआधीही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांनी पाकिस्तानचे दौरे कधीच थांबवले आहेत. खेळ आणि दहशत यांचा अनुभव श्रीलंकन क्रिकेटपटूंनी घेतलेलाच आहे. त्यामुळे भारताने अशी ठाम भूमिका घेतल्यास अनेक  क्रिकेट खेळणारे देश तात्काळ भारताच्या समर्थनाकरिता पुढे येतील म्हणजे सुंठीवाचून खोकला जाईल. क्रिकेटमधली ही कोंडी पाकिस्तानच्या जनतेला प्रक्षुब्ध करील आणि त्यानंतर एका क्षेत्रातून पाकिस्तानला बहिष्कृत करण्याची साखळी सुरू होईल. मग त्या देशातील जनताच धोरणाच्या विरोधात उठाव करेल आणि राज्यकर्ते व लष्कराला भारतासमोर  शरणागती पत्करावी लागेल. देश आणि देशहित सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे सुक्यासोबत ओले जळले तरी त्याचे वाईट वाटून घेऊ नये. सद्यस्थितीत पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याची आवश्यकता आहे.

1 टिप्पणी:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...