२८/१/१९

हाॅकर्स झोन उभारावेत

हाॅकर्स झोन उभारावेत
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना होत असणारी गर्दी आणि त्यातून जाणारे बळी यामुळे फेरिवाल्यांचा प्रश्न वारंवार चर्चेत येत आहे. वास्तविक फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी ही संबंधित शासकीय यंत्रणांचीच आहे, मग ती मुंबई महापालिका असू दे किंवा रेल्वे प्रशासन. मात्र, ही जबाबदारी राजकीय पक्षांची तर निश्चितच नाही आणि दमदाटी करून, आंदोलने करण्याने ही पिरिस्थिती सुधारणे शक्यच नाही.
शासकीय यंत्रणांमार्फत त्यांच्याकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा करून असे प्रष्न राजकीय पक्षांनी हातावेगळे करणे हा पर्याय ठरू शकतो किंवा फेरीवाल्यांना आवाहन करणे हाही एक पर्याय असू शकतो. पण, झुंडशाही करून संबंधित प्रशासकीय यंत्रणांवर दबाव तंत्राचा वापर करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांचा नेमका हेतू काय? हे सुद्धा तपासणे महत्त्वाचे ठरते. केवळ राजकीय फायद्यासाठी म्हणा किंवा चर्चेत राहण्यासाठी जर ही राजकीय मंडळी/ पक्ष अशा  पद्धतीने आंदोलन करत नाही ना? हे सुद्धा बघावे लागेल. किंबहुना अशा आंदोलनांना लोकशाही न म्हणता केवळ ठोकशाही म्हटले तर वावगे ठरणार नाही. बरे ही मंडळी कोणत्या नैतिक अधिकारावर अशी आंदोलने उभारतात,  हा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकेल.
वस्तुतः रेल्वेची हद्द असो किंवा महापालिकेची, रेल्वेस्थानकापासून १५० मीटरचा परिसर फेरीवालामुक्त असलाच पाहिजे. त्यामुळे रेल्वेस्थानकात जाणाऱ्या व तेथून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मार्गक्रमण करणे सोपे होते व चेंगराचेंगरीसारख्या घटना घडण्याची शक्यता खूप कमी होते. मात्र, अशा प्रकारचे नियम पाळले जात नाहीत याचे कारण फेरीवाला, पोलीस, महापालिका यंत्रणा यांची झालेली अभद्र युती.
फेरीवाल्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर त्यांना रस्त्यावर किंवा पादचारी पुलांवर विक्री करण्यापासून परावृत्त करायचे असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्याकडून खरेदी करण्याचे टाळावे, पालिकेने फेरीवाल्यांकरिता हाॅकर्स झोन तयार करायला हवेत. फेरीवाल्यांना आवश्यक ते परवाने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी लागेल. त्यांच्याकडून करस्वरूपात शुल्क आकारल्यास त्यातून काही महसूल महापालिकेला मिळू शकेल. हा महसूल सेवा पुरविण्यात महापालिकेला उपयोगी पडू शकेल. मात्र, त्यात गैरप्रकार तर होणार नाही ना यावर लक्ष मात्र पालिकेलाच घालावे लागेल. हे जर का शक्य झाले तर नागरिकांना अशा ठिकाणी खरेदी करणे सोईचे जाईल. तरच असे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
मुंबईत गेल्या कित्येक वर्षे फेरिवाल्यांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला आहे. त्यामुळे धोरण तयार केले, तरी त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मुंबईत ७० लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर अगोदरच गर्दी आहे. त्यात अधिक भर फेरीवाल्यांकडून आणि फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठया प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे बाजारपेठा, मंडया या रेल्वे स्थानकापासून दूर असाव्यात. रेल्वे स्थानकांचा झाला, तर रेल्वे स्थानकांवरील कोंडी काही प्रमाणात कमी होईल. शहरात बेकारी कमी करण्यात प्रशासनाला यश आले तर फेरीवाले कमी होतील. रेल्वे स्थानके, रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे राजकीय भांडवल होऊ नये. मुळात काही धोरणांचाही विचार केला पाहिजे. कमर्शियल सेक्टर उपनगरांमध्ये सेक्टर उपनगरांमध्ये, वांद्रे-कुर्ला संकुलात उभारावेत, असे त्यास नगर नियोजनात स्थान द्यायला पाहिजे. अनेक पाश्चिमात्य  देशातील मोठया शहरांमध्ये नगर विकास करताना, फेरीवाल्यांना शहर नियोजनात स्थान देण्यात आले होते. रेल्वे स्थानकांसारख्या परिसरात फेरीवाल्यांना अधिकृत जागा देता येऊ शकते, परंतु तसे करत असताना, त्यामुळे गर्दीची मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. फेरीवाल्यांची संख्या मर्यादित राहावी. कोंडी होते, अशा ठिकाणी फेरीवाले नसावेत. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांची रचना करताना फेरीवाल्यांना त्यामध्ये सामावून घ्यायला हवे आणि महापालिका किंवा संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
न्यूयाॅर्क, पॅरीस आणि बर्लिन ही नगरनियोजनात फेरीवाल्यांना सामावून घेणाऱ्या प्रमुख शहरांची उदाहरणे आहेत. या शहरांमध्ये रेल्वे स्थानक अथवा जेथे गर्दीचे योग्य नियोजन होईल, अशा अरूंद रस्त्यांवर फेरीवाल्यांना जागा देण्यात आली आहे. फेरीवाले समस्या बनू नयेत, यासाठी फेरीवाल्यांची संख्या निश्चित केलेली आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे स्थानक अथवा मेट्रो स्थानकांमध्ये फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र गाळे देण्यात आले आहेत. अशा प्रकारे आपल्याकडेही नियोजन होणे गरजेचे आहे.      

२२/१/१९

कॅशलेस व्हा, निर्धास्त राहा

कॅशलेश व्हा, निर्धास्त राहा
- दादासाहेब येंधे (dyendhe@1979@gmail.com)
 ऑनलाईन खरेदीने सध्या मोठा वेग घेतला आहे. यात मोबाईल ऍपचा मोठया प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे हे मोबाईल काॅमर्स ई-काॅमर्स क्षेत्राला मागे टाकेल, असे दिसतेय. मोबाईल अॅप डाऊनलोड करणाऱयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ई-काॅमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोबाईल अँप्लिकेशनवर जास्त लक्ष केंद्रित करीत आहेत.
 मोबाईल काॅमर्स बाजारावर पकड मजबूत करण्यासाठी फिलपकार्ट, अॅमेझाॅन, स्नॅपडिल आणि क्विकर यांसारख्या ई-काॅमर्स कंपन्या देषातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी करताना दिसत आहेत. तसेच मोबाईल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात आहे. कारण येणाऱ्या काळात मोबाईल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा असणार आहे.
प्लॅस्टिक मनी: केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयामुळे हजार-पाचशेच्या नोटा निरूपयोगी झाल्याने सुट्टया पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून बरेचजण कॅशलेस व्यवहारावर भर देताना दिसून येत आहे. कॅशलेस व्यवहार ‘प्लॅस्टिक मनी’ वापरून करता येतात. खरेदी करताना पैसे चुकते करण्यासाठी रोख पैसे भरण्याऐवजी प्लॅस्टिक मनी वापरता येतात. प्लॅस्टिक मनीचे मुख्य तीन प्रकार आहेत. 1) क्रेडिट कार्ड 2) एटीएम कार्ड 3)डेबिट कार्ड. रक्कम काढण्यासाठी तसेच खरेदीसाठी या कार्डचा वापर करता येतो. आपल्या सोबत रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते.
घरबसल्या बॅंकिंगचे व्यवहार: शहरी भागातील बऱ्याचशा बॅंकांनी फोन बॅंकिंग सुविधा सुरू केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेतही अशी सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे आता घर बसल्या बॅंकेचे व्यवहार करणे आपल्याला शक्य झाले आहे. आयव्हीआरच्या माध्यमातून संबंधित बॅंकेच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संबंध न येता फोनसाठी दिलेल्या पासवर्डच्या माध्यमातून ग्राहकाला खात्यातील बॅलेन्स, बिल व इतर माहिती घरबसल्या मिळते. त्यामुळे वेळ वाचतो. ही सुविधा २४तास मिळते. 
मोबाईल वाॅलेट अॅप्स: आपल्या देशातील मोबाईल वाॅलेटची वाढती मागणी पाहता भारतीय स्टेट बॅंकेने आपले  मोबाईल अॅप सुरू केले आहे. एचडीएफसी बॅंक,  आयसीआयसीआय बँकेनेही आपापल्या नावाने मोबाईल वाॅलेट सुरू केले आहे.
सावधानता गरजेची: आधुनिक युगात बॅंकिंग सुविधांचा लाभ घेणे सोयीचे झाले आहे. पैशांसाठी बॅंकेच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. एटीएम कार्डचा वापर करून ताबडतोब पैसे मिळविता येतात. घरोघरी इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे नेटबॅंकिंग ही सुविधा आपल्याला वापरता येते. नेट बॅंकिंगमुळे आपण घरबसल्या बिल भरणे, पैसे दुसरीकडे पाठवणे असे सहजगत्या करू शकतो, परंतु हे करताना आपल्याकडून नजरचुकीने काही त्रुटी राहतात आणि सायबर चोरांकडून हॅकिंकसारखे प्रकार घडून आपले पैसे चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी अकाऊंटचा पासवर्ड बदलणे, तो कुणालाही न सांगणे यांसारखे महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. जेणेकरून, सायबर चोरांकडून हॅकिंगसारखे प्रकार घडून मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

१५/१/१९

अंधश्रद्धा: देशव्यापी कायद्याची गरज

अंधश्रद्धा: देशव्यापी कायद्याची गरज
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

 महाराष्ट्र हे अंधश्रद्धाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर शेजारी कर्नाटक राज्यातही हा कायदा लागू झाला आहे. आता गरज आहे ती अंधश्रद्धाविरोधी कायद्याची देशपातळीवर अमलबजावणीची. आजही भारतामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात दिसून येते. त्यामागे पारंपरिक बुरसटलेल्या मनोधारणा तसेच भोंदू बाबा-बुवांचा स्वार्थीपणादेखील तितकाच कारणीभूत ठरतो. अंधश्रद्धेमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक, बौध्दिक, शारीरिक तसेच मानसिक पिळवणूक मोठया प्रमाणात होत असते. धार्मिक बाबींच्या नावावर अनेक अंधश्रद्धा आपल्याकडे प्रतिष्टा मिळवून आहेत. त्यालादेखील कडाडून विरोध व्हायला हवा. भारताचे संविधानच देशाच्या नागरिकांना विज्ञान आणि विवेकवादाचा पुरस्कार शिकविते. तसेच राज्यकर्त्यांकडून त्याच दृष्टिकोनातून जनतेवर शिक्षण आणि संस्काराची अपेक्षा करते. म्हणूनच आता थेट केंद्र सरकारनेच अंधश्रद्धाविरोधी कायदा अमलात आणण्याची वेळ आली आहे. पारंपरिक लोकधारणा एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीने संपुष्टात येत नसतात. मात्र, ज्या परंपरांच्या पालनामुळे इतर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत नसेल किंवा त्यांची फसवणूक केली जात नसेल त्याचबरोबर व्यक्तींची कुठल्याही तऱ्हेने पिळवणूक घडत नसेल तर त्या परंपरेला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, परंपरेच्या नावाखाली स्वतःच्या तुंबडया भरणाऱ्या प्रवृत्तीला अंधश्रद्धाविरोधी कायद्याने अद्दल घडवता येऊ शकते.
 आजच्या विज्ञान युगातही पैशांचा पाऊस पडतो अशा भूलथापा मारणारे आणि त्यांच्या खोटेपणाला बळी पडणारे लोक आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मांत्रिकाने सांगितले म्हणून लहान मुले बळी देण्याचे अघोरी प्रकारही गुप्तधनाच्या लालसेपोटी आजही घडत आहेत. अशा विकृत मनोवृत्तीच्या मागे डोळे बंद करून तसेच बुद्धी गहाण ठेवून जाणाऱ्या लोकांच्या डोक्यांमधील अंधश्रद्धेची जळमटे वेळीच काढणे अतिशय गरजेचे आहे. सामाजिक उत्थानासाठी ते महत्त्वाचे ठरते.
 अंधश्रद्धेमुळे एक व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि पर्यायाने अवघा समाजच मानसिकदृष्टया गुलाम होत असतो. मुळात आजचे शिक्षण हे नव्या पिढीला विवेकवादी बनवण्यास सक्षम आहे, असे वाटत नाही. कारण पुढची पिढी घडवणारे शिक्षकच आज प्रचंड अंधश्रद्धाळू असल्याचे दिसते. हे चित्र बदलून भारत विज्ञानवादाचा पुरस्कर्ता ठरण्यासाठी अंधश्रद्धाविरोधी कायद्याची देषव्यापी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

९/१/१९

वन्यजीव वाचलेच पाहिजेत!


वन्यजीव वाचलेच पाहिजेत
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा शिरकाव, मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा झपाट्याने होत असलेला -हास आणि महामार्ग बांधणीमुळे धोक्यात आलेले कॉरिडॉर, या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्यजीवांच्या नैसगिर्क अधिवासावर झाला आहे आणि परिणामी वन्यजीवनच धोक्यात आले आहे. असे एकूण सध्याचे चित्र आहे.
अलीकडे शिकारीचे प्रमाण वाढत असले तरी या कारणांना दुर्लक्षित करून चालणारे नाही. कारण वन्यजीवन धोक्यात येण्यामागे शिकार हेच एक कारण नसून त्यापेक्षाही राष्ट्रीय महामार्ग, कोळसा खाणी, विद्युत प्रकल्प, वाढते पर्यटन, शहरीकरण या माध्यमातून आपणही कुठेतरी वन्यजीवांच्या असुरक्षिततेला कारणीभूत ठरत आहोत. कदाचित या सर्व मुद्यांवर गांभिर्याने विचार झाला तर धोक्यात आलेले वन्यजीवांना कुठेतरी सुरक्षितता मिळेल.
जंगलातील वाढते पर्यटन आता वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. जंगल पर्यटन आणि त्या अनुषंगाने जंगलाच्या आजूबाजूला झालेले रिसॉर्ट वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. पर्यटक येतात आणि त्यांच्याजवळचे प्लॅस्टिक बाहेर फेकतात. काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक वाघ प्लॅस्टिक चघळत असलेला फोटो प्रसिद्ध झाला होता. व्यस्थित नियोजन न करता होणारे पर्यटन वन्यजीवांच्या मुळावर उठले आहे. कान्हा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, सारिस्काप्रमाणेच महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प धोक्यात आल्याची ही घंटा आहे.
पूर्वी सहय़ाद्रीच्या पट्टय़ात विपुल जैवसंपदा टिकून होती. या जैवसंपदेत एकप्रकारची सलगता होती. त्यामुळे वन्यजीवासाठी अधिवास सहय़ाद्रीच्या पट्टय़ात होती. वन्यजीवांना सहजपणे अन्न उपलब्ध होत होते. त्यामुळे जैवसाखळी सुरळीतपणे चालू होती. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून सहय़ाद्रीच्या पट्टय़ातील जंगलांचा विविध कारणांनी ऱ्हास होत आहे. वणवे, जंगलतोड, मानवी वस्ती, शेती आदी विविध कारणामुळे सहय़ाद्रीतील जंगलांचा नाश होत आहे. साहजिकच वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहे. त्यांना अन्न सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. तेथे त्यांना सहज अन्न वा भक्ष्य उपलब्ध होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातून गंभीर असा मानव-वन्यजीव संघर्ष उभा ठाकला आहे. स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात वन्यजीवांच्या मानवी वस्तीववरील अतिक्रमणात वाढ होणार आहे. मानवाप्रमाणे वन्यजीवांनाही जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे. वन्यजीवांसाठी कायदे आहेत. जंगल हे त्यांचं घर आहे. त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. जंगलं टिकल्यास जैवसाखळी सुरळीत चालेल. मग वन्यजीवांच्या मानवी वस्तीवरील अतिक्रमणाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.
जंगलात अन्न मिळाले नसल्यानेच, जवळच्या खेड्यात घुसलेले वाघ भुकेने मरण पावल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. वन संरक्षण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी, जंगलांचे पुनरुज्जीवन, जंगलात पाण्याचे साठे निर्माण करणे, अन्य प्राण्यांनाही संरक्षण देणे, जंगलावरची अतिक्रमणे हटवून जंगलांचे रक्षण करणे अशी व्यापक उपापयोजना अंमलात आणल्या शिवाय भारत आणि आशिया खंडातल्या वाघांचे अस्तित्व अबाधित  राहणार नाही. अन्यथा पुढच्या पिढ्यातल्या मुलांना वाघ फक्त चित्रातच दाखवावा लागेल.

५/१/१९

अपयशावर मात करा

अपयशावर मात करा
-दादासाहेब येंधे
(dyendhe@rediffmail.com)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचशा घरांतून मानसिकदृष्ट्या विचलित झालेली, खचलेली मुले आपल्याला दिसत आहेत. काही मुले व्यसनांच्या आहारी जातात. कोणी दहावी-बारावीला नापास झाला म्हणून आत्महत्या करतोय, तर कुणाला मनासारखा मोबाइल मिळाला नाही म्हणून स्वतःचे जीवन संपवून टाकत आहे. कोणी रेल्वेच्या रुळांवर, कोणी समुद्रात उडी मारून, तर कोणी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. परिणामी, तरुण पिढी विस्कटत चालली आहे.
हल्ली कुटुंबातील संवाद गायब होत चालला आहे. सध्याचे पालक दोघेही नोकरी करीत असल्यामुळे दमून संध्याकाळी घरी येतात. मुले आजी-आजोबा किंवा इतर नातेवाइकांकडे अथवा पाळणा घरात असतात. त्यांना आपल्या आई-वडिलांबरोबर बोलायचे असते. परंतु आई-वडिलांना घरातही वेळ नसतो. मुले काही बोलायला गेली तर नेहमी त्यांना एकाच प्रकारचे उत्तर मिळते मी फार दमली/दमलो आहे. मला त्रास देऊ नको. तू जाऊन टीव्ही बघ. एव्हढेच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवतही नाहीत. मुले आई-वडिलांची वाट पाहून कंटाळून झोपून जातात किंवा मित्रांकडे जाऊन गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर तासनतास बसल्याने एकलकोंडी बनतात आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
खरेतर जीवनाचा लढा उभारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते तुमच्या वाटयाला आलेली परिस्थिती अन जाणीव या दोनच गोष्टी मानवाच्या जीवनाच्या खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरतात. कारण परिस्थिती माणसाला जगण्याबरोबर वागणंही शिकविते. मुंग्या आपल्यापेक्षा दसपट प्राण्यांची शिकार करतात. त्यांच संघटन, जिद्द आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा कल वाखाणण्याजोगा आहे. एखाद्या बिळात राहून पोट भरता येणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. तसेच आपल्या वाटयाला आलेलं कुठलंही काम हे ना आपल्या नशिबाचा भाग असतो, ना कर्माचे फळ. तर तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात वाटयास आलेला अनिवार्य लढा असतो. ज्यांना ज्यांना वेदनांची जाण अन भान आहे त्यांना कळतोय जीवनाचा मथितार्थ. सुख हे आपल्या जीवनाचे सोबती नाहीत अन पुढेही नसणार. वेळ आलीच तर दुःखालाही कवटाळणं, शिकणं म्हणजे जीवनाचे विविध पैलू शिकणे होय. पायाला ठेच लागेल म्हणून वाटेवरचे दगड उचलत चालणे हा मूर्खपणा होय. तुम्हाला हे चांगलं माहीत आहे. आज ना उद्या पायाला ठेच लागेलच, कारण चालणं अनिवार्य आहे. म्हणून आयुष्य दगड उचलत चालायचं की जीवनात जे जे कडू-गोड प्रसंग येतील यांचा सामना करीत चालायचं हे आपणच ठरवायचं आहे. भूतकाळात जी जी माणसं मोठी झाली ती सर्वच या निखाऱ्यातून बाहेर पडली आहेत. जखमांना कुरवाळत बसल्याने जीवनाचे प्रश्न सुटत नसतात. रक्तारक्तात आशावाद पेरला की उगवणारी रोपं सुद्धा आशावादीच उगवतात. त्यासाठी आपल्याकडे हवा सकारात्मक जीवनाचा लढा.
तरुण वयातील या आत्महत्या थांबवायच्या असतील तर संवादाची पातळी घराघरातून वाढली पाहिजे. आई-वडिलांसोबत मुला-मुलींनीही व्हाट्सअप, फेसबूक सारख्या आभासी दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष संवाद साधावा. मुलांनो आई-वडीलांबरोबर बोला, तुम्ही बोललात तर तुमच्या मनातील खलबते त्यांना कळेल. त्याच्यावर कुटुंबातून सकारात्मक प्रतिक्रिया येतील. घरातील आई-वडील तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील.
मुलांनो नकार पचवायला शिका, आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला येत असतो. आपण कोणाची तरी मदत घेताना कधी नकार येतो तर कधी भरभरून मदत मिळते. जीवनातले सगळेच प्रसंग आनंदाचे नसतात. तसेच ते दुःखाचेही नसतात. परंतु आपण दुःखाच्या प्रसंगात खचून जातो आणि नकळतपणे अयशस्वी होतो. म्हणून दुःख, अपयश , नकार या गोष्टी पचवायला शिकले पाहिजे. तरच आयुष्याची वाटचाल यशस्वी आणि सार्थक होणे सहज शक्य होऊ शकते. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी आत्महत्या हे त्यावरचं उत्तर असू शकत नाही. प्रत्येकाने आपल्या अंगभूत गुणांचा उपयोग करून अधिक खंबीरपणे वागल्यास आपल्या समस्यांवर उपाय शोधता येतील.
मला मरायचं आहे, मी मेल्यानंतरच प्रश्न सुटतील असे विचार मनात येतात तेव्हा मला माझा प्रश्न सोडवायचा आहे, मी आहे त्या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे, जगायचं आहे हे विचारदेखील जोरकसपणे मनात आले तर हा प्रश्न सुटेल, सुटू शकतो. गरज आहे ती मनावरचा ताण हलका करण्याची. आत्महत्या हे कुठल्याही समस्येवरच उत्तर असू शकत नाही.


दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...