Ticker

10/recent/ticker-posts

नवरा- बायकोच्या भांडणात होरपळ नेमकी कुणाची?

नवरा-बायकोच्या भाडणात होरपळ नेमकी कणाची ?

- दादासाहेब येंधे

अबोला हा पती-पत्नी या दोघांमधली एक सामान्य गोष्ट आहे. दुनियेत असे कमी लोक सापडतील की ज्यांच्या संपूर्ण जीवनात एक दुसऱ्याशी अबोला झाला नसेल. पती-पत्नीमधील अबोला सामान्यपणे एक-दोन मिनिटं किंवा गैरसमज जास्तच असेल तर एखादा आठवड्यापर्यंत असू शकतो; पण त्यानंतर एकत्र राहत असताना ते एक-दुसऱ्याशी  बोलल्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अबोला सुटू शकतो. पण, जेवढा वेळ त्यांनी अबोला धरला असतो; तेवढा वेळ त्या दोघांसाठीही खूपच वाईट असतो. कारण एकमेकांबरोबर राहून न बोलणं हे त्यांना शक्‍यच होत नाही.


आता तुम्ही विचार करा की, स्त्री आणि पुरुषांचे संबंध एकदम ताणले गेले, गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली. एका व्यक्‍तीने दुसर्‍या व्यक्तीसमोर फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि फक्त हैराण करण्यासाठी समोरील व्यक्‍ती घटस्फोटाला खोटा-खोटा विरोध करत असेल आणि अशा गोष्टीत जर त्या दोन्ही व्यक्‍तींना एकाच छताखाली, एकाच घरात राहण्याचा प्रसंग आला तर त्या दोन्ही व्यक्‍ती किती अस्वस्थ जीवन अनुभवत असतील.


वैशालीचं लग्न होऊन सहा महिनेच झालेले. त्यातच ती, दारुडा आणि जुगार खेळणारा पती, शंका घेणारी नणंद, भांडखोर सासू आणि आळशी सासऱ्याच्या त्रासानं अक्षरशः कंटाळून गेली होती. एक गोष्ट चांगली होती की, वैशाली ही एका शाळेत चांगल्या खात्यात कामाला होती. त्यामुळे सकाळी दहा वाजता निघाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घरी परतेपर्यंत तिला शांतता मिळत होती. पण, घरात पाऊल ठेवता क्षणी घरातील नणंदेचे रोज शंकास्पद प्रश्‍न सुरू होत होते. 


शंकास्पद प्रश्न 

“वहिनी, तू आज दहा मिनिटं उशिरा का आली? रस्त्यात कोणी भेटलं होतं की काय? तुला मी आज टॅक्सीमधून उतंरताना पाहिलं. कुणी लिफ्ट तर दिली नाही ना? उद्या कुठली चांगली साडी नेसून ऑफिसला जाणार आहेस? कुणी खास भेटायला येणार आहे का?" अशा विविध शंकास्पद प्रश्नांना उत्तरे देता-देता वैशाली कंटाळली होती. या त्रासात आणखी भर म्हणून सासूसुद्धा तिच्याबरोबर उगाचच भांडण उकरून काढत तिला डिवचत होती. “आज तू जेवणात एकच भाजी बनवली. डाळ-भात नाही? तू रोज तुला आवडते तीच भाजी बनवतेस. लग्न होऊन एवढे दिवस झालेत, तरी आपल्या घरच्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे तू जेवण बनवत नाहीस." अशी काही ना काही कारणं  करून काढत वैशालीची सासू तिच्याबरोबर रोज भांडणं करायची. नवरा तर रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत घरी यायचा नाही आणि आला तर तो जर का जुगारात जिंकला असेल, तर वैशालीबरोबर गोड बोलायचा आणि हरला तर शिव्यांचा वर्षाव. दारू पिण्याचं तर तो एकही दिवस चुकत नव्हता आणि त्या सवयीमुळे तो जेव्हा घरी यायचा, तेव्हा थोड्याच वेळात बेडवर पडून झोपी जायचा. वैशालीस सुरुवातीला तिच्या नवऱ्याकडून थोडे दिवस शरीरसुख मिळालं. पण, त्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिला त्यापासूनही वंचित ठेवलं. 


पण आता गोष्ट खूपच ताणली गेली आणि शेवटी वैशालीने तिचा नवरा आणि सासरकडील मंडळींविरुद्ध बंड करायचं ठरवलं. याचा परिणाम चोर सोडून संन्याशाला फाशी असा झाला. तिच्या पतीनं तिच्यावर खोटे आरोप ठेवून ती नालायक बाई आहे, बाहेरख्याली आहे, असं सांगून कोर्टात घटसफोटासाठी अर्ज दाखल केला. वैशालीलाही तिच्या पतीकडून आता लांबच व्हायचं होतं; पण जर ती स्वखुशीनं फारकत घेण्यास तयार झाली, तर तिच्या पतीला आणि सासूला तेच हवं होतं. त्यामुळे फक्त त्यांना हैराण करण्यासाठीच वैशालीनं त्या पिटीशनला विरोध केला. एवढंच नाही तर, सासरीच राहून त्यांना त्रास देण्याचा निश्चयही केला आणि कोर्टातून असा मनाई हुकूम मिळवला की, तिला सासरी राहण्यास कुणाचीही मनाई नाही. 


घरात शांती नाही

आपल्या सामान्य कोर्टात होतं तसंच वैशालीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पिटीशन केसमध्येही तारखांवर तारखा पडत होत्या आणि जवळजवळ पाच वर्षांनंतर त्या अर्जावर पिटीशन निकाल आला. वैशालीवर केलेले तिचा नवरा सिद्ध करू शकला नाही, असं सांगून कोर्टाने केस फाईल बंद केली. नंतर वैशालीच्या नवऱ्याने हायकोर्टात अपील केलं त्याचा निकाल सहा वर्षानंतर आला आणि तेही अपील रद्द करण्यात आलं. त्यानंतर वैशालीच्या पतीनं सुप्रीम कोर्टात केस दाखल केली आणि शेवटच्या चार वर्षांपासून ती केस सुनावणीसाठी तशीच पडून आहे. या सगळ्या गोष्टीं दरम्यान वैशाली आजही 

आपल्या सासरीच राहते. रोज या लोकांमध्ये झगडे होतात, कधीकधी हमरीतुमरीही होते आणि दोन्ही पक्षांनी पोलिसात वेळोवेळी फिर्यादही केली आहे. यामुळे घरात कुणालाही शांती मिळत नाही. वैशालीच्या नवऱ्याचं घर एक चाळीत दोन रूमचं होतं, ज्यात एका रूममध्ये पार्टीशन करून वैशाली आणि तिचा नवरा राहत होता. पण, भांडण झाल्यापासून वैशाली एकटीच एका रूममध्ये राहत होती. किचन एक आहे, आंघोळीसाठी बाथरूमही एकच कॉमन आहे. वैशाली सहज दर महिना २० ते २५ हजार कमवते. जर तिने ठरविलं, तर ती एकटीही दुसरीकडे राहू शकते. पण,  बदल्याची भावना, समोरच्याला हैराण करण्याची इच्छां यामुळे वैशाली स्वत:ही अस्वस्थ होत आहे. 


त्रासदायक आयुष्य

असं तर किती गोष्टींमध्ये होत असेल. एक गोष्ट सत्य आहे की, मुंबईसारख्या शहरात जागेची टंचाई असल्यामुळे स्त्रीला आपल्या पतीपासून वेगळं राहणं मुश्कील होतंय. पण, जेव्हा संबंध बिघडले असतील आणि दोघंही एकमेकांची तोंडे बघायला तयार नसतील तर समोरच्याला फक्त हैराण करण्यासाठीच एकमेकांबरोबर राहणं योग्य आहे का? हा प्रश्‍न उपस्थित होतो. वैशालीच्या गोष्टीत भले तिचा नवरा आणि सासरकडील मंडळी तिला त्रास देत असतील पण, शिकल्या-सवरलेल्या वैशालीला एक गोष्ट समजायला हवी होती की, तिच्या पतीला आणि सासरच्यांना हैराण करता-करता ती स्वत:ही हैराण होते आहे. पतीशी पटत नव्हतं तर ती त्याच्यापासून घटस्फोट घेऊ शकत होती. स्वखुशीने घटस्फोट घेतला असता आणि तिनं दुसरं लग्न केलं असतं तर ती शांततेनं आयुष्य जगू शकली असती. मागील दहा वर्षांपासून वैशाली तिच्या सासरच्यांनाही त्रास देत आहे आणि स्वत:ही त्रासदायक आयुष्य जगत आहे. लोक असं का करत असतील? फक्त दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, वैर काढण्यासाठी? उगीचच स्वत:ला त्रास करून घ्यायचा आणि हैराण व्हायचं, कशासाठी हेच कळत नाही. 


स्त्रियांच्या रक्षणासाठी आपल्या सरकारनं काही वर्षांपूर्वी “द प्रोटेक्शन ऑफ वुमन फॉर डोमेस्टिक व्हायोलन्स अँक्ट” हा कायदा संमत केला आहे. हा कायदा स्त्रियांच्या भल्यासाठी आहे. या कायद्याअंतर्गत स्त्री लग्नानंतर जिथे राहत आहे, तिथे राहण्याचा तिला हक्क मिळतो. हा हक्क स्त्रीला द्यावा, ही एक चांगली गोष्ट आहे. पण,  वैशालीसारख्यांच्या गोष्टीत तिला या कायद्याने संरक्षण दिलं, हक्‍क दिला तर तुम्हाला वाटत नाही का, की दोन्ही पक्षाला ते नुकसानकारक आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या