Ticker

10/recent/ticker-posts

सोडा सारे काम-धाम, आधी करा मतदान

सोडा सारे काम-धाम, आधी करा मतदान
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
भारतात लोकशाहीचे बिगुल वाजले असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून पुढील टप्प्यात २९ एप्रिल २०१९ रोजी मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने बहुतेकजण मतदान करण्याऐवजी मौजमजा करण्याकरिता वाया घालवतात.

मतदान हा आपला अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगले खासदार/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर, कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.

चांगले राजकारणी निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राजकारणी हवे आहेत हे कळते. त्यादृष्टीने मतदान महत्त्वाचे आहे. 

संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाही भक्कम व यशस्वी असल्याचे निवडणूक आयोगाने सिद्ध केले आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व देशाच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी मतदारांनी स्वतःहून पुढे येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. परंतु मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने मतदानासाठी जाण्याऐवजी पिकनिकला जाण्याकडे अनेक मतदारांचा कल दिसून येतो. यामागे मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो? अशी मानसिकता दिसून येते. पण, एक-एका मताने मतांचा डोंगर उभा राहतो हे प्रत्येकाने समजले पाहिजे. लोकशाहीमध्ये एक-एक मत अत्यंत बहुमोल आहे. ज्यावेळी आपण आपले हक्क आणि अधिकार यांच्याविषयी एखाद्याला जाब विचारतो त्यावेळी आपण आपल्या कर्तव्याबाबतीतही सजग राहणे आदर्श नागरिकाचे लक्षण ठरते. 

भारतातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. एका अर्थाने लोकशाहीचा महाउत्सवच जणू आपल्या देशात सध्या सुरू आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी आसुरलेले जगभरातील पत्रकार आणि लोकशाहीचे अभ्यासक भारतातील विविध भागात अभ्यासूवृत्तीने भेटी देत आहेत. आपल्याला आवडेल असा लोकप्रतिनिधी आकाशातून अवतरणार नसून तो जनतेतूनच उभा राहणार आहे. त्यामुळेच मतदारांनी मतदानाचा संविधानाने प्रदान केलेला हक्क व अधिकार निष्ठने बजावण्यासाठी जाणीवपूर्वक मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केले पाहिजे. 

देशातील युवक-युवतींनी स्वतःहून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे व इतर मतदारांनाही त्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. एक सार्वभौम व शक्तिशाली लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची असलेली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी मतदानाच्या रूपाने आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे.






टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. खरे आहे, आपण लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. तो आपला हक्क आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आपले लेख वाचनीय असतात. तसेच वैचारिक असतात. मी आपले लेख नेहमी वाचतो. असेच लिहीत राहावे. 👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या लेखांतून विविध विषयांची माहिती वाचावयास मिळते.

    उत्तर द्याहटवा
  4. Very interesting post.this is my first time visit here. I found so many interesting stuff in your blog especially its discussion..thanks for the post! click here

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.