१०/३/२०

स्वसंरक्षणावर लक्ष द्या

स्वसंरक्षणावर लक्ष द्या
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
विकृत नजरेचा, किळसवाण्या स्पर्शाचा किंवा छेडछाडीचा अनुभव आलेला नाही अशी मुलगी शहरात सापडणं विरळच. एवढं हा अनुभव कॉमन आहे. लक्ष देऊ नको, काळजी घे, फोन कर, लवकर घरी ये.. असे सल्ले मुलींना तिच्या घरच्यांकडून दिले जातात. निर्भया, हैद्राबाद, हिंगनघाट सारखा प्रसंग घडतो, तेव्हा या सगळ्या प्रसंगांना वाचा फुटते आणि मग मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत यावर घोडे येऊन अडते.
मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी तर स्त्रियांना, लहान मुलींना नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा, त्यांचे दागिने चोरायचे, बॅगा पळवायच्या, अश्लील शेरेबाजी करायची असे अनेक प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. असा अनुभव फक्त गर्दीच्या ठिकाणीच येतो असं नाही तर भर रस्त्यात, फलाटावर, ट्रेनमधून उतरल्यानंतर जिन्यावरून चढताना असे कोणत्याही जागी रोडरोमियोंची, गुंडांची, दारुड्यांची किंवा विकृत मनोवृत्तीच्या लोकांची भेट होतेच होते काहीजण विकृत नजरेने बघून मुलींना घाबरवून सोडतात. पण, मी घाबरत नाही, कोणी आलंच तर... असं म्हणणाऱ्या मुली, स्त्रिया प्रत्यक्षात काही प्रसंग ओढवला तर गप्प बसणे पसंत करतात किंवा काय करायचं हे त्यांना प्रसंगी आठवतच नाही आणि मग आपण प्रशासनाला, पोलिसांना, सरकारला दोष देऊन मोकळे होतो. पण, यासाठी काही प्रमाणात आपणच आपले संरक्षण करण्याचे ठरवले तर त्यासाठी प्रत्येक मुलीने स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येकीने घेतलंच पाहिजे.
संकटाच्या वेळी मदत मिळेपर्यंत बचाव करण्यासाठी काही छोटया छोट्या ट्रिक उपयोगात आणायला पाहिजेत. जसे
- कधी कुणी व्यक्ती आपल्याला समोरून धक्का देऊन खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लहान लेकराच्या दोन्ही हात आपल्या खांद्यावरून पटकन उडवायचे त्याचे खांदे पकडून पायाने त्याच्या पायावर जोरात किक मारुन त्याला बाजूला ढकलून द्यायचे सोबत मोठ्याने ओरडायचे.
- जर कोणी आपल्याला एकटे गाठून चाकू किंवा बंदुकीचा धाक दाखवून दागिने मागत असेल तर आधी बंदुक किंवा चाकूच्या नेमापासून बाजूला व्हायचं आणि हल्लेखोराच्या तोंडासमोर जोरात ओरडून त्याच्या जॉईंटसवर मारायचं.
-  या ट्रिक्स वापरताना नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे जोरजोरात ओरडायचं त्यामुळे हल्लेखोराचं लक्ष विचलित होईल आणि त्याला मारताना आपल्या पूर्ण ताकदीने त्याला मारायचं.
- कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की, कोणीतरी व्यक्ती आपल्याकडे बघत आहे. किंवा कोणाची तरी वाईट नजर बऱ्याच वेळापासून आपल्यावर खिळली आहे. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा घाबरू नका काही वेळात हा प्रकार थांबला नाही तर त्या व्यक्तीला मोठे डोळे करून रागीष्ट असा लूक द्या. म्हणजे आपल्या नजरेची दहशत समोरच्या पर्यंत पोचली जाईल आणि आपला त्याच्यावर धाक निर्माण होईल.
- ऑफिस किंवा शाळा, कॉलेज, घरच्या आजूबाजूच्या परिसरातून जाता -येता वारंवार तुमच्यावर कोणी व्यक्ती कमेंट करत असेल. तुमची छेडछाड करत असेल तर त्यावर रिऍक्ट करा. तुमच्यातील अग्रेशन बाहेर येऊ द्या. छेडछाड करणाऱ्यांची खरडपट्टी काढा. प्रकरण जास्त गंभीर असेल तर पोलिसांची मदत घ्या. पण, घाबरून लोक काय म्हणतील याचा विचार करून प्रकरणाची टाळाटाळ करू नका.
छेडछाडी विषयी तुमच्या घरच्यांशी, मैत्रिणींशी बोला. वेळ पडल्यास पोलिसांशी बोला. कारण, हल्ली छेडछाडीचे प्रमाण पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणून-बुजून धक्काबुक्की करणं, गर्दीचे कारण देत स्त्रियांना नको त्या ठिकाणी स्पर्श करणं अशा घटनांना रोज कित्येक महिला तोंड देत आहेत. कामाला जायची घाई, घरी यायची घाई, वेळ कुठे आहे..? या सगळ्याकडे आपल्याला लक्ष द्यायला अशी कारणे देत आजही अशा गंभीर प्रकारांकडे महिलांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, छेडछाड करणाऱ्यांचे फावते आहे. यासाठी मुलींनी, महिलांनी पुढे यायला हवे.


८/३/२०

हळवं मन, स्वच्छतेसाठी नेहमी अग्रेसर

हळवं मन, स्वच्छतेसाठी नेहमी अग्रेसर
-दादासाहेब येंधे
सकाळचे आठ वाजले आणि मग नेहमीच्या सवयीनुसार हातात झाडू घेतली. स्वयंपाक खोलीचा केरकचरा काढून बाहेरच्या मोठ्या खोलीतला केर काढायला सुरुवात केली. सौ. नलिनी बिछान्यावरून नेहमीप्रमाणेच माझ्या केर काढण्याचे काटेकोरपणे अवलोकन करीत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. 
'बाकी सगळी कामं तुम्ही ना अगदी चांगली पार पाडता, पण केरकचरा मात्र तुम्हाला अजून जमत नाही. झाडू अशी फिरविता की तो कचरा परत मागे येतोय. आणि हे तुम्हाला समजत कसं नाही? तिने नेहमीप्रमाणेच अभिप्राय व्यक्त केला. 'तो पहा, तिथे कोपऱ्यात अजून केराचा पुंजका तसाच पडून आहे!'. तिच्या काटेकोर निरीक्षणाचे फलित शब्दांकित झाले होते. 
पण, तेवढ्या त्या तिच्या सहज बोलण्याने माझं मन माञ दुखावले गेले होते. रागानेच मी तिला प्रत्युत्तर दिले; 'माझं इकडे कंबरडं साफ मोडून पडलंय. कपडे धुवायचे, भाजी आणायची, दूध आणायचे, समृद्धीला शाळेत सोडायचे अन तेथून थेट कामावर जायचं आणि तुला तिथे बिछान्यावर पडल्या पडल्या दोष द्यायला काय जातंय?'.
माझ्या रागाच्या पाऱ्याने व्यक्त झालेल्या आकस्मिक प्रतिक्रियेने ती पार दुखावली होती. असं असूनही ती संयमाने म्हणाली, "माझ्या अशा या दुखण्याने, आजारपणामुळे तुम्हाला अपार कष्ट होत आहेत. कमालीचा त्रासही होतोय हे मला अहो समजत नाही का? पण तुम्ही कष्ट घेऊनही असा कचरा मागे राहिला, तर त्याचा काय उपयोग?
'नलिनी, तू काही बोलू नकोस आता? माझ्या दुखावलेल्या मनाने तिचं बोलणं असं मधेच तोडलं आणि मी पुढे त्राग्यातच म्हणालो, 'तुझं ना, काही केल्या समाधानंच होत नाही! मी सगळा कचरा रोजच्या रोज बरोबर काढतो आहे!' माझं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली, 'अहो, असे रागावू व चिडू नका हो! अधून मधून कमरेचं दुखणं सुरूच आहे. मी जर बरी असते तर तुम्हाला असं वाकावं लागलं असतं का? तुम्हाला अशी रोज घरातली कामं करावी लागतात ना त्याने माझा जीव असा तिळ-तिळ तुटतो. पण, मी तरी काय करू?
मी तिच्या या बोलण्याने पार विरघळून गेलो. तिच्याजवळ जाऊन आजारपण पाहिले आणि तिच्या बोलण्यातील तथ्य त्याचक्षणी जाणवलं. ते पाहून मी पटकन बोलून गेलो, आता यापुढे तुझ्यावर अशी बोलण्याची संधी येणार नाही. याची काळजी मी घेईन. तिच्या डोळ्याच्या पापण्या पाणावल्या होत्या. आता रोज घरातील केरकचरा काढताना ती घरात असो किंवा नसो, तिचे ते शब्द नेहमी समोर येतात. स्वच्छतेवरचा तिचा मनापासूनचा भर एवढा जबरदस्त आहे की, त्यासाठी पडेल ते कष्ट उपसायला ती जराही कसूर करत नाही. 
गेल्या ११ वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या एकत्रित वाटचालीतील तिच्यात गुंतलेल्या किंबहुना पाण्यात विरघळलेल्या साखरेसमान व आता तर फार हळवे व संवेदनशील असलेले व झालेले माझे मन तिलाच मोलाचा आधार मानते. अत्यंतिक गोडव्याने व कमालीच्या जिव्हाळ्याने भरलेली "अहो..!" या शब्दाने निरंतरपणे घातली जाणारी व विशेष म्हणजे मनापासून ऐकत रहाविशी वाटणारी हवीहवीशी वाटणारी तिची ती सुंदर साद ऐकल्यावर माझं मन अधिकच भांबावून जाते. आत्यंतिक आतुरतेने, आंतरिक ओलाव्याने, ओतप्रेत जिव्हाळ्याने कोणीतरी तुमची दारात वाट पहात उभी असणार याची घरी परतणाऱ्याला आशाच नव्हे तर, त्याची पक्की खात्री असते. माझ्या बाबतीत अशी वाट पाहात दारात उभ्या राहणाऱ्या सौ. नलिनी. 


१/३/२०

लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम!

लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम!
-दादासाहेब येंधे
 सृष्टीच्या निर्मात्याने नर-नारी अशा भिन्नलिंगी मानवाची तथा प्राण्यांची उत्पत्ती करतांनाच त्यांना प्रजननाच्या दृष्टीने कामक्रीडेची, लैंगिक सुखाची जाण करून दिली आहे. प्राण्यांमधील शरीरसंबंध आपण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण पाहत असतो. परंतु, मानवामध्ये गुप्त इंद्रियांबाबत चर्चा करणे अथवा शरीरसंबंध ठेवणे म्हणजे मोठे लज्जास्पद आणि गोपनीय गोष्ट मानली जाते.
मानवाचे शिस्त लावणे, काम वाटप करणे, विवाह मर्यादा, नाती-गोती ठरविण्यासंदर्भात विशिष्ट सद्वर्तनाचे नियम ठरवले. त्यातून धर्म उदयास आला. धर्मचाराप्रमाणे मानवामध्ये विवाह, नाती-गोती, शरीर संबंध आणि लैंगिक सुखाच्या बाबतीत विशिष्ट बंधने, नियम व कायदे पाळावे लागतात.
संगणकीय आधुनिक आणि प्रगत विज्ञानयुगात सुद्धा लैंगिक सुख, शरीरसंबंध, गुप्त इंद्रियांबाबत निर्माण होणाऱ्या अडी-अडचणी गुप्तरोगांबाबत गोपनीयता राखली जाते. यासंदर्भात पाल्य आणि पालकांमध्ये उघडपणे चर्चा होताना दिसत नाही. मुलांमधील जिज्ञासूपणामुळे त्यांच्यात विविध शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे. किंबहुना पालक आपल्या हजरजबाबी पाल्यांच्या शंकांचे निरसन करण्यास कमी पडतात. पालकांना कळत नाही की मुलांना काय सांगायचे आणि कसे समजायचे. त्यामुळे मुलांना काहीतरी थातूर-मातूर उत्तरे देऊन ते गप्प करतात.
 विशेषतः नोकरी-व्यवसाय मुळे आपल्या मुलांशी हितगुज करण्यास वेळ देत नाहीत किंवा त्यांना शक्यही नसते अशा वेळेस मुलांच्या शंकांचे समाधानकारक निरसन न झाल्यामुळे मुलं त्यातील रहस्य जाणून घेण्यास आतुर झालेली असतात. नैराश्यामुळे पर्याय शोधू लागतात. मग अशी मुलं संगणकाच्या सायबर सुविधांमुळे इंटरनेट तसेच व्हिडीओ पार्लरच्या माध्यमातून अर्धवट लैंगिक ज्ञान मिळवतात. अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षाही अधिक घातक असते असे म्हटले जाते. शिवाय प्रौढावस्थेत कडे कूच करणाऱ्या मुली मुलांमध्ये वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यातील शारीरिक बदल विकसित होताना अगदी बारकाईने बदलत्या शरीराचे निरीक्षण ते करत असतात. त्याच काळात त्यांना शारीरिक कुतूहल आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागते आणि हळूहळू त्यांची लैंगिक भावना जागृत होऊ लागते. इंटरनेट, व्हिडिओ पार्लर सारख्या सुविधांमुळे असलेले चित्रपट पाहून, लेखन वाचून त्यांची कामोत्सुकता वाढीस लागते. त्याचवेळेस त्यांना हवे असलेले शरीरसुख घेण्याचे त्यांचे वय नसते पण अतिउत्साहामुळे त्यांच्यात लैंगिक मनोवृत्ती जागृत होऊन त्यांना मर्यादेचे भान राहत नाही. त्यांच्या मनावरील संयम सुटल्यामुळे त्यांच्याकडून विनयभंग, बलात्कार सारखे अपराध घडताना दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर विवाहित महिलेवर अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती. अशा प्रकारच्या बलात्काऱ्यांना आपण नराधम, लिंगपिसाट म्हणू लागतो.
बलात्कारी पीडितांचे कौमार्यभंग झाल्याने अब्रू लुटली गेल्याने समाजात त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्कारी स्त्रिया कुमारिका आत्महत्या करतात. त्यात भर म्हणून इंटरनेट, व्हिडिओ पार्लर सारख्या सुविधांमुळे विविध दूरदर्शन वाहिन्यांवरून दाखवले जाणारे चित्रपट, अर्धनग्न पोशाख, नंगानाच पाहून शालेय मुले मुली तरुण-तरुणींना लैंगिक आणि शारीरिक सुखासंबंधी उत्सुकता वाढू लागते. तर बहुतांशी मुलांमध्ये भय, न्यूनगंड, मनोविकृती, वासनाविकार झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येते.
त्यामुळे कामवासनेच्या मनोविकृतीने पछाडलेले नराधम नाती-गोती विसरून बाल, विवाहित, अविवाहित, वयोवृद्ध स्त्रियांवर बलात्कार, विनयभंग करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. बलात्काराची भावना लैंगिक मनोविकृतीमुळेच निर्माण होते. याचे कारण म्हणजे लैंगिक अज्ञान. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार ११ ते १६ वर्षे वयोगटातील शालेय मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे झालेले आहे. लैंगिक सुख ही नैसर्गिक गरज असून त्यासंदर्भात शास्त्रशुद्ध आणि निर्मळ भावना मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादेच्या संवाद माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींकडून किंवा डॉक्टरांकडून उघडपणे आवश्यक तेवढेच लैंगिक शिक्षण देण्यास काहीच हरकत नसावी.
लैंगिक सुखाची नैसर्गिक गरज, मुलींमधील मासिक पाळी, विवाह व शारीरिक सुख उपभोगण्यासाठी व्योमर्यादेची आवश्यकता आणि लैंगिक सुखासंबंधी भय, भीती, न्यूनगंड, मनोविकृती याबाबत सखोल ज्ञान आणि माहितीचा समावेश लैंगिक शिक्षणात असावा. त्याचबरोबर विनयभंग, बलात्कार, छेडछाड, रॅगिंग सारखा गुन्हा केल्याने होणारा फौजदारी दंड, शिक्षेबाबत उदाहरण दखल्यांसहित सखोल ज्ञान व माहिती विद्यार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे. जेणेकरून, अशा अपराधाबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण होईल. आणि त्यांच्याकडून अतिरेक किंवा दुरुपयोग होणार नाही.

दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...