Ticker

10/recent/ticker-posts

अष्टपैलू अभिनेता : इरफान खान

अष्टपैलू अभिनेता : इरफान खान
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
'लंच बॉक्स', 'हिंदी मिडीयम', 'पिकू', 'तलवार', अशा अनेक चित्रपटांत विविध भूमिका, नैसर्गिक अभिनय आणि अप्रतिम संवादफेक अशा अनेक वैशिष्टयांमुळे इरफान खान यांनी आपल्या चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले होते.

चित्रपटच नव्हे तर टीव्हीवरील मालिकांमध्ये चाणक्य, भारत एक खोज, सारा जहाँ हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यातल्या त्यांच्या अभिनयाचे वेगळेपण नेहमी लक्षात राहील असेच आहे. अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल. दुर्धर असा कॅन्सर रोग झाला असतानाही खचून न जाता , सकारात्मकतेने इरफान खान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना पुन्हा त्याच उत्साहात ते उभे राहिले. पण, दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला.

बॉलिवूडमध्ये त्यांच्या चित्रपटांत 'मकबूल'च्या रूपाने इरफान यांच्या कमालीचा अभिनय पाहायला मिळाला. 'रोग' या चित्रपटाच्या रूपाने पहिल्यांदा हिरोची भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली होती. 'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटातील विनोदी छटेची भूमिका फिल्मफेअर अवार्ड मिळवून देणारी ठरली. तर पान सिंग तोमर वास्तवाधारीत चित्रपटातल्या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

बॉलीवूडमधला गुंडे, हैदर, लंचबॉक्स, कारवा, हिंदी मिडीयम सारख्या त्यांच्या अभिनयाच्या शैलीला न्याय देणाऱ्या भूमिका करीत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. अँजेलीना जोलीबरोबरचा 'अ मायटी हार्ट' आणि 'द दार्जिलिंग लिमिटेड' यासारख्या हॉलिवूडपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर 'स्लमडॉग मिलेनिअर' यासारख्या त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्याने जगात त्यांच्या नावाची चर्चा झाली. लाइफ ऑफ पाय, द नेमसेक, द अमेझिंग स्पायडर मॅन, ज्यूरासिक वर्ल्ड अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून आपले योगदान दिले.

पैसा, प्रसिद्धी, नाव यात न गुंतता इरफानने मनापासून अभिनय केला. त्यामुळेच अभिनेता इरफान खान याचे निधन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी एक मोठा धक्काच आहे. त्यांच्या अकाली निधनाने एक दमदार, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड असा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना स्फूर्तिदायी असाच होता. ज्या वयात अधिक सकस अभिनय करायचे दिवस होते अगदी त्याच वेळी इरफान जग सोडून गेले त्याचे चित्रपटसृष्टीतील कार्य त्याच्या चाहत्यांसोबतच नवोदित कलाकारांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या