ध्यानधारणेसाठी घरातील एखादी विशिष्ट जागा निश्चित करा
-दादासाहेब येंधे
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात मनःशांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण, त्याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. मेडिटेशन कधी कराचे, किती वेळ करावे..? जागा कुठे व कशी निवडावी असे अनेक प्रश्न प्रत्येकाला सतावत असतात त्याविषयी...
शक्य असल्यास ध्यानधारणेसाठी घरातील एखादी विशिष्ट जागा निश्चित करा नियमितपणे त्या जागी बसून ध्यान करा. जागेची निवड करताना शांत आणि प्रसन्न जागा निवडा. घरातील इतर सदस्यांचा वावर कमी असेल अशी जागा निवडण्यास प्राधान्य द्या. तसेच त्या जागी मोकळी खेळती हवा आहे का हेही पाहणे गरजेचं आहे.
ध्यानधारणा करताना सुरुवातीला कंटाळा येईल. मन एकाग्र होताना तुमची पंचाईत होईल. पण, नियमितपणा यावर मात करण्यास आपल्याला शिकवेल. त्यासाठी नियमित वेळ काढून ध्यानधारणेला सुरूवात करा. सुरूवातीला काही वेळेस ध्यानधारणा नकोशी वाटेल. पण, सातत्य ठेवल्यावर हळूहळू शरीराला सवय होईल. आणि मग मन एकाग्र होऊ लागल्यावर आपल्याला ध्यानाची सवय होईल आणि ते दीर्घकाळ करण्याची इच्छा निर्माण होईल.
ध्यानधारणा करत असताना ते तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करीत आहात हे लक्षात असू द्या. इतरांशी तुलना करणे टाळा. आपल्याला शक्य असेल त्यानुसार अधिकाधिक वेळ ध्यान करण्याचा प्रयत्न करा. दीर्घश्वसन शरीराच्या हालचालींकडे मन एकाग्र करा. ओमकार हे ध्यानधारणेसाठी सर्वोत्तम पर्याय ठरते. मन एकाग्र करून स्वतःशीच संवाद साधण्याचा प्रयत्न करा. इतरांशी तुलना न करता तुमच्या स्वतःच्या पद्धतीने ध्यान करणं नेहमीच फायदेशीर ठरेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.