Ticker

10/recent/ticker-posts

वासुदेव आला हो... वासुदेव आला...

 वासुदेवाच्या रूपातून लोकसंस्कृतीचे दर्शन

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

अंगावर घोळदार अंगरखा, डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, पायात घुंगरू आणि कंबरेला शेला आणि तोंडी कृष्णाचा गजर करत सकाळच्या प्रहरी वासुदेवाची स्वारी येते. वासुदेव आला... हो.. वासुदेव आला... असे गात आपल्या आगमनाची वर्दी त्याने आधीच दिलेले असते.


प्रत्येक घरापर्यंत जात तो माऊली, संताची वंदावी सावली... असं म्हणत हाक मारतो. घरातील महिला बाहेर येऊन त्याला धान्य किंवा पैसे देते आणि आपल्या मुलाबाळांसाठी आशीर्वाद घेते. या दानामुळे प्रसन्न होऊन वासुदेव दान पावलं... दान पावलं... अशी ओवी म्हणत स्वतःभोवती गिरक्या मारत पुढे निघून जातो.


दान देणाऱ्याला तो त्याच्या आजोबांचे वडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवदेवतांना संतांना ते दान 'दान पावलं दान पावलं' असे एक गाणे म्हणून पोहोचते करतो. पंढरपूरचा 'विठोबा राया', कोंढणपूरची 'तुक्काबाई', जेजुरीचा 'खंडोबा', सासवडचा 'सोपानदेव', आळंदीचा 'ज्ञानोबा', देहूचे 'तुकाराम बाबा', शिंगणापूरचा 'महादेव', मुंगी पैठणातला 'नाथमहाराज' अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दान वासुदेवाच्या हातात पडत असले तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोहोचविण्याचे असते असे म्हणतात. दाताही दान आपल्या वाडवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वतःसाठी नव्हे तर आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईत भर पडावी, अशीच त्यांची भावना असते. पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवताना स्वतःभोवती गिरक्या घेतो.


वासुदेवाच्या गाण्यात कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंचनीती असे विषय येतात. अनेकदा साध्यासोप्या भाषेत ही गाणी वेदांताचाही बोध करतात. वासुदेव आणि त्यांचा व्यवसायांना हजार-बाराशे वर्षाची परंपरा आहे. महानुभाव साहित्यात 'भ्रडी' या नावाने वासुदेवाचा निर्देश आलेला दिसतो. ज्ञानदेवांनी तसेच नामदेवांनी वासुदेवावर रूपके केली आहेत.  


सकाळी पहाटे पहाटे गाव जागं करणारा हा वासुदेव सध्या दिसेनासा झाला आहे. खेडोपाड्यात जाऊन वासुदेव फिरायचा. लहानग्यांना जागं करायचा. लोकांचे मनोरंजन करायचा. पण, वाढत्या शहरीकरणात गावाचं रूप पालटून गेलं आणि लोकसंख्या संस्कृतीतला महत्त्वाचा घटक असलेल्या वासुदेवाला स्थान  उरलं नाही.


आज काही निवडक लोककलाकारांनी वासुदेवाची ही परंपरा जपून ठेऊन ते गावोगावी फिरून जमेल तशी आपली कला पेश करतात आणि आपल्या पोटापाण्याची कमाई करून जगतात. ग्रामस्थ जत्रांमधून फिरतात. कधीकधी शहराचाही वाट धरतात. सर्व समाज घटकांचा प्रभाव असलेल्या पंढरपूरच्या वारीत आजही वासुदेव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात, तर यातले बहुतेक लोक गांजलेले जसं दारोदार फिरून भिक्षा मागतात. फिरून भिक्षा तरी किती मिळणार..? तरीही या लोक उपासकांनी ही कला जतन करून ठेवली आहे.


वासुदेवाची वेशभूषा करून भारुड व अभंगांच्या माध्यमातून ही कला लोकांसमोर लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न वासुदेव करत असतात. लोकसंस्कृतीचा अनोखा ठेवा ते व्याख्यानाच्या माध्यमातून सादर करत असतात. या वासुदेवाच्या रूपातून लोकसंस्कृतीचे दर्शन होत असते. आजच्या बदललेल्या परिस्थितीतही हे लोक उपासनेत मोलाची कामगिरी करत आहेत. आज होत असलेला निसर्गाचा ऱ्हास त्यातून निर्माण झालेली पर्यावरण रक्षणाची गरज या पार्श्वभूमीवर जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वासुदेव त्यात आपला वाटा उचलत घरोघरी जाऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत. सरकारनेही या लुप्त होत चाललेल्या वासुदेवाला, लोककला जिवंत ठेवणाऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. 









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.