प्रत्येक नागरिकाने डोळस होणे गरजेचे आहे...
-दादासाहेब येंधे
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमितसिंग राम रहिम याला बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. या बाबाबिरुद्ध धाडसाने तक्रार करणाऱ्या महिला, हे प्रकरण धसास लावताना प्राणाला मुकलेला पत्रकार, खास तपास करणारे अधिकारी यांचा लढा या शिक्षेमुळे एका तर्कसुसंगत शेवटाला पोचला आहे. मात्र असं असलं तरी या तथाकथित गुरूवर अंधपणानं श्रद्धा ठेवणाऱ्या झुंडी कायमच आहेत.
स्वतःच्या आश्रमातील बऱ्याच महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप रामरहिमवर आहे. खरेतर स्वतःला बाबा-बुवा, म्हणवून घेणारे हजारो एकरांत अवाढव्य असे आश्रम उभारतातच कसे आणि कोण परवानगी देते..? त्यांना ? एरवी प्रामाणिक नोकरदारांवर निश्चलीकरणापासून आधारकार्डपर्यंत सगळ्या नियमांचा वरवंटा फिरवणाऱ्या सरकारला या असल्या भोंदूबाबांचे गैरव्यवहार दिसू नयेत, हा बाबा म्हणवून घेणारा 'यू आर माय लव्ह चार्जर' यासारखी टुकार गाणी गातो, नाचतो. तरीही त्याला आध्यात्मिक गुरू म्हणवून संरक्षण दिले जाते. अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात काही गैर आहे असे कोणालाच वाटत नाही, या जागी जर कोणी सामान्य व्यक्ती असता तर त्याला अशा सुखसुविधा दिल्या असत्या का..? बाबा राम रहिमकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. देशात कुठेही पाहायला मिळणार नाहीत अशा विविध कार मॉडेल त्याने खास इंजिनीयरचा स्टाफ विकत घेऊन तयार करून घेतल्या आहेत. करोडो रुपयांची मालमत्ता त्याच्याकडे आहे आणि हरयाणा राज्य सरकार या बाबाच्या आश्रमास करमाफी देते...
विसावे शतक मागे सरून २१व्या शतकाला सुरुवात होऊन आता ११ वर्षे लोटली आहेत. या ११ वर्षांत जगात खूप स्थित्यंतरे झाली, प्रगतीही तितक्याच मोठ्या प्रमाणात झाली. या प्रगतीच्या गाड्याला अडविण्यासाठी अंधश्रद्धेचा धोंडा मध्येच आला आहे, त्यामुळे ही प्रगती निखळ आहे असे वाटत नाही. कारण या प्रगतीतही आजचा माणूस स्वतःला असुरक्षित समजत आहे. त्याला नवनव्या विवंचना सतावत आहेत. या विवंचना, असुरक्षिततेचे उत्तर तो शोधण्यासाठी बाबा-बुवांच्या, महाराजांच्या भजनी लागला आहे आणि येथूनच अंधश्रद्धा सुरू होते. हिंदुस्थानात परीस्थिती अशी आहे की, अध्यात्माच्या नावावर गट-तट पडले आहेत. प्रत्येक मताचे, वेगळ्या प्रवृत्तीचे बुवा-महाराज पहायला मिळत आहेत. माझा मार्ग तेवढा योग्य असा समजही या गटा-तटांत असतो. त्यामुळे प्रत्येकाचे स्वतंत्र कळप झालेले आहेत. निर्बुद्ध मेंढराप्रमाणे त्यांचे अनुयायी त्यांच्या मागूनच वाटचाल करीत आहेत. त्यांनी आपला मेंदू गहाण ठेवला आहे कि, काय असे त्यांच्या वर्तनातून जाणवते. कारण श्रद्धेपेक्षा अंधश्रेद्धेचाच अंमल लोकांवर जास्त प्रमाणात पहायला मिळतो.
अध्यात्म काही वाईट नाही. अध्यत्मात संतांनी मनाची आणि दृष्टीचीही कवाडे सताड उघडी करायला सांगितले आहे. आद्यंतीमाणे स्वउन्नती करायची आहे. मग, ती आत्मिक, मानसिक, सामाजिक का असेना. परंतु उन्नती या अनुयायांत झालेली पाहायला मिळत नाही. उन्नती होते ती बुवा-महाराजांची. त्यांच्याकडेचं ऐश्वर्य वाढत असते. अनुययांची परिस्थिती मात्र भरकटलेल्या मेंढराप्रमाणेच राहते. अंधश्रद्धेचा मार्ग अंधकाराने भरलेलाच असतो, त्यामुळे त्यापेक्षा अशी वेगळे घडणे शक्य नसते. श्रद्धेला कोणाचा विरोध असू शकत नाही, परंतु श्रद्धेचा बाजार मांडला की ती अंधश्रद्धाच होते. त्यामुळे हल्ली श्रद्धेच्या नावावर दिमाखदार 'मॉल, डेरे, हॉल, मंदिरे, दरबार' उभे असलेले दिसतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणूनच सर्वसामान्य माणूस बुवा-महाराज आणि मांत्रिक-तांत्रिकाच्या जाळ्यात सहजपणे ओढला जातोय. खरेतर लोकांनी कुणाचे अनुयायी बनण्यापूर्वी त्यांची विश्वसनीयता पडताळून पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने डोळस होणे गरजेचे आहे. बाबा, बुवाविरुद्ध कारवाई झाली की लोक रस्त्यावर येऊन राष्ट्रीय संपत्तीची नासधूस करतात. समाजातील प्रत्येकाने अशा ढोंगी बाबा-बुवांपासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.