गाई-म्हशींच्या दुधापेक्षा रासायनिक पदार्थ वापरून कृत्रिम पद्धतीने तयार केलेले दूध आणि त्यापासून बनविलेले पदार्थ स्वस्तात तयार होतात असे पदार्थ किंवा मिठाई सध्याच्या बाजारभावाने विकल्याने व्यापाऱ्यांना भरपूर नफा कमविता येतो. असे दूध आयोग्याला अत्यंत हानीकारक आहे. त्याकरिता या भेसळमाफियांना आणि ते विकणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी.
-दादासाहेब येंधे
साध्या देशात ३३,४०० कायदेशीर कत्तलखाने आहेत. परंतु त्यातील कित्येक कत्तलखान्यांत गैरफायदेही उठवितात. रोज जवळ जवळ दोन लाख जनावरांची कत्तल या कत्तलखान्यांत होते. खरे तर दुभत्या व कमी वयाच्या जनावरांची कत्तल करू नये असा कायदा असतानादेखील या कायद्याला धाब्यावर बसवून दुभत्या व कमी वयाच्या जनावरांचीदेखील या कत्तलखान्यांत अमानूषपणे कत्तल करण्यात येते. त्यात आणखी भर म्हणजे देशभरात ५५० नवीन व आधुनिक कत्तलखाने खोलण्यासाठी सरकार विचाराधीन असून त्यांना ३ करोड रुपये सबसिडी म्हणून देण्यात येणार असल्याचे समजते.
त्यामुळे दुभत्या जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ज्या देशात एकेकाळी दुधाची गंगा वाहत होती त्या देशात दुधाची आज वानवा आहे. परिणामी दुधाचा भाव २० रु. वरून ३० रु. लिटर.तसेच तूप २५०- ३०० रु. किलो झाले आहे. जर दुभत्या जनावरांची अशीच वर्षानुवर्षे कत्तल होत राहिली तर काही दिवसांनी दूध १०० रु. लिटरमध्ये मिळणेसुद्धा मुश्कील होईल. दुधाच्या बाबतीत काही वर्षापासून एक ज्वलंत प्रश्न समोर उभा राहिला आहे, तो म्हणजे दूध शाकाहारी की मांसाहारी? खरे तर काही देशात पाळीव जनावरांचा सांभाळ एका कुटुंब सदस्याप्रमाणे होतो. गाय किवा म्हशीला वासरू झाल्यावरं प्रथम त्या नवजात वासराला पहिले दूध पिण्यास देऊन नंतर उरलेल्या दुधाचा खाण्यासाठी किंवा पूजा-अर्चा करण्यासाठी वापर करीत असत म्हणून ते शाकाहारी, परंतु पशूवध केल्याने दुधाचा प्रश्न समोर उभा असून पशूमालक आणि दूध डेअरीवाले 'जास्त नफा मिळविण्यासाठी जे हिंसक प्रकार करतात त्यामुळे दूध हे हिंदुस्थान व अमेरिकेमध्ये मांसाहारी बनले. गाई-म्हशीने एकदा वासराला जन्म दिल्यानंतर जवळजवळ १० महिने ती दूध देते व सामान्य पद्धतीने त्या तीन ते चार वर्षांनी गाभण राहून जवळजवळ चार वासरांना जन्म देतात. परंतु सध्याच्या काळात दर वर्षाला गाई-म्हशींना कृत्रिम रीतीने (इंजेक्शन देऊन) गाभण करण्यात येते.
एकदा वासराला जन्म दिल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी त्यांना लस टोचण्यात येऊन त्या पुन्हा दूध देऊ लागतात व मालकांना वर्षभर दूध मिळते. अशा गैरकारभारामुळे जनावरांच्या शरीरात पचनशक्ती व गर्भपिशवीचा ऱ्हास पावून त्यांना किटोसीन नावाचा रोग होतो. निकृष्ट प्रकारचा आहार व वेळेवर पाणी न पाजल्याने व अशक्तपणाने त्यांना 'रुमेनाडोसिस' नावाचा रोग होऊन जनावरे अशक्त दिसून कमी प्रमाणात दूध देतात. त्यांच्या शरीराचा समतोलपणा व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शने, हार्मोन्स तसेच मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक लसी टोचण्यात येतात.
या सर्व कारणांमुळे दुभत्या जनावरांचे आयुर्मान कमी होऊन त्या दूध कमी प्रमाणात देऊ लागतात आणि त्यामुळे मग त्यांना कत्तलखान्याचा थेट रस्ता दाखविला जातो. गाई- म्हशींमध्ये ज्याप्रमाणे कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा घडवून आणली जाते ती जास्तीत जास्त पैसा कमविण्यासाठी वापरली जाते. काहीजण म्हणतात की, गाई-म्हशींनी जास्त प्रमाणात आणि जाडसर दूध देण्यासाठी त्यांना ऑक्सिटोसीन नावाची लस टोचली जाते; परंतु हे साफ खोटे आहे, तर गायी-म्हशींनी आपल्या सडांतून दूध व्यवस्थित सोडावे म्हणून ते इंजेक्शन दिले जाते. पण, वर्षानुवर्षे या इंजेक्शनची त्यांना सवय लागल्याने कधी-कधी त्या दूध देईनाश्या होतात. दूध डेअरीत पोहोचेपर्यंत त्यात बऱ्याच प्रमाणात भेसळ झालेली असते. दूध खराब होऊ नये म्हणून त्यात युरिया मिसळून ते डेअरीत दिले जाते. जे मानवाच्या शरीराला हानीकारक आहे. कित्येक ठिकाणी युरिया, झिंक ऑक्साईड तर सफेद रंगाकरिता व्हायटिंग पावडर, चुना व इतर केमिकल मिसळून दूध राजरोसपणे विकले जाते. तसेच दुधावर योग्य प्रकारची जाडसर साय व फेस येण्याकरिता त्यात कलाई, तांबे किंवा शिसे यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसून येत आहे. परंतु यामुळे मानवाच्या किडनीवर त्याचा आघात होऊन मेंदूच्या शिरांवरदेखील मोठ्या प्रमाणात बिघाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ऑक्सिटोसिनयुक्त लस दिलेले दूध प्यायल्याने लहान मुलांना लवकर चष्मा लागण्याची व स्त्री-पुरुषांना शरीरातील हार्मोन्समध्ये, असंतुलन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते.भरमसाट वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे मागणीत झालेली वाढ याचा गैरफायदा हे भेसळ माफिया आपला नफा वाढविण्याकरिता करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी घातलेल्या धाडींमध्ये दूध, पनीर, मावा असे पदार्थ रासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेले आढळले. गाई-म्हशींच्या दुधापेक्षा रासायनिक पदार्थ वापरून कृत्रिम पद्धतीने तयार केलेले दूध आणि त्यापासून बनविलेले पदार्थ स्वस्तात तयार होतात असे पदार्थ किंवा मिठाई सध्याच्या बाजारभावाने विकल्याने व्यापाऱ्यांना भरपूर नफा कमविता येतो. असे दूध आयोग्याला अत्यंत हानीकारक आहे. त्याकरिता या भेसळमाफियांना आणि ते विकणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.