Ticker

10/recent/ticker-posts

गणेशोत्सव : हिडीस प्रकार थांबून भक्तिभाव वाढवा

लोकमान्य टिळकांनी घराघरांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव सार्वजनिक केला. जनतेला संघटित कराण्याचा, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचा उदात्त हेतू त्यामागे होता. अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सव व्यापक आणि सर्वसमावेशक होऊ लागला आहे; पण त्याचबरोबर उत्सव हे त्याच्या योग्य त्या पद्धतीनेच साजरे व्हायला पाहिजेत, असे आपल्या वडीलधाऱ्यांकडून नेहमी सांगितले जाते. कारण सध्या उत्सवांच्या निमित्ताने काही अनुचित प्रकार घडताना दिसून येत आहेत


मराठी संस्कृतीचा मानबिंदू म्हणून, जगात लौकिक लाभलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता महाराष्ट्रातच अवकळा आली आहे. धार्मिक पावित्र्य आणि सामाजिक महत्त्व व या दोन्ही गोष्टी जपण्यात आपला समाज अपयशी ठरला आहे. गणेशोत्सव सार्वजनिक झाला तेव्हा तो समाज संघटन- प्रबोधनाचे एक साधन होताआता तो राजकीय ध्येयप्राप्तीचे माध्यम  बनला  आहे,  असे म्हटल्यास  वावगे  ठरू  नये.  समाजाची सगळी  क्षेत्रे व्यापलेल्या  राजकाण्यांच्या तडाख्यातून विघ्नहर्त्याचा उत्सवही सुटला नाही. त्यामुळेच दहा ते बारा सदनिकांच्या झोपडपट्ट्यांतील, गल्ली बोळातील 'बाल' (काल्पनिक नाव) मित्रमंडळांच्या उत्सवाला स्थानिक नेतेमंडळींची मदत मिळू लागली. परिणामी, या सार्वजनिक कार्यातून अनेकांचे राजकीय भवितव्य तयार होऊ लागले. त्यातूनच हा उत्सव केवळ मिरवणाऱ्यांसाठी, पैसे फेकून राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरला यातून अनिष्ट गोष्टींचा फैलाव वाढू लागला आहे


वर्दळीचा रस्ता अडवून मंडप टाकणे, मंडळांची धर्मादाय आयुक्‍त वा स्थानिक पोलिसांकडे नोंद करता पावती पुस्तके छापून खंडणीच्या आविर्भावात वर्गणी गोळा करणे, मंडपात स्टेजखाली किंवा मंडपामागे पत्त्यांचे डाव रंगणे अशा एकना अनेक गोष्टींनी तर गणेशोत्सवाच्या पावित्र्याला केव्हाच हरताळ फासला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक सुशिक्षित-सुसंस्कृत लोक आजही सहभागी होतात. उत्सवाचे स्वरूप बदलले तरी अशी मंडळी एकतर केवळ भावनेपोटी त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा प्रवाहपतित होऊन अशा गोष्टींना शरण जातात. खाजगी कंपन्या, संस्था, बँका, सरकारी-निमसरकारी कार्यालये या ठिकाणी काम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांचा विसर्जन मिरवणुकीच्या वेळीतोलठासळलेला आपण पाहतो.


जल्लोष करायचा म्हणून गणपतीसमोर हिडीस नाच नि आचरट चाळे करायचे, तर मिरवणुकीऐवजी एखाद्या - आडोश्याला जाऊन गुपचूप दारू प्यायची हे कुठेतरी थांबायला पाहिजे. गणेशोत्सव म्हणजे शुभमंगल कार्य; पण यातील मंगलता लोपून ध्वनिप्रदूषणासारखी अमंगलताच समाजावर लादली जात आहे नव्हे तर समाजच ती अंगावर ओढून घेत आहे. आजकाल ध्वनिप्रदूषणाची अथवा गोंगाटाची सवय सर्वांनाच झालेली आहे. एखाद्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण नसेल किंवा नीरव शांतता असेल तरकिती शांतता आहे असे म्हणत, इथे कुणी वारले आहेका?" असा प्रश्‍न केला जातो. गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमात गोंगाट रूपी ध्वनीशक्ती विधायक सामाजिक शक्‍तीचा ऱ्हास करत आहेत. समाजाच्या अध्यात्मिक शक्तीचीही हवा काढून घेत आहे. आपली आरेग्यशक्ती फक्त अध्यात्माचा मुखडा घेऊन मिरवत आहे. गोंगाट (अनावश्यक आवाज) जेव्हा आपल्या सभोवती असतो, तेव्हा पदार्थविज्ञान रूपातील ही शक्‍ती आपल्या कानात शिरते. आपल्यावर या शक्‍तीचा अनावश्यक परिणाम होतो. तो होऊ नये, म्हणून शरीर कानाला व मेंदूला जास्त काम करण्यास भाग पाडते. त्यातून मनाची व मेंदूची बरीच शक्‍ती खर्च होते. त्यामुळे जास्त प्रमाणात काम न करतादेखील थकवा वाटतो. चिडचिड वाढते, कामात लक्ष लागत नाही, डोकेदुखी होते या सगळ्याचा परिणाम मानसिक तणाव वाढण्यावर होतो.


ध्वनीप्रदूषणाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर ताण-तणावासारखे इतर अनेक अयोग्य परिणाम होण्याची दाट शक्यता असते, आवाजाच्या कोलाहलामुळे रक्‍तदाब वाढतो, मेंदूतील द्रावाचा दाब वाढतो, ह॒दयाच्या ठोक्यांचा वेग श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, घाम येतो, चक्कर येते, मळमळ वाढून फार लवकर थकल्यासारखे जाणवते, तसेच बहिरेपणामुळे व्यक्‍ती एकलकोंड्या स्वाभावाची बनते. सध्या सामाजिक आणि अध्यात्मिक सौख्यापेक्षा आपले उपद्रव मूल्य दाखविण्याचीच स्पर्धा जणू गणेश मंडळांमध्ये लागलेली आहे असे वाटते. त्यामुळेच रुग्णालयांच्या जवळ असलेल्या मंडपांतून डॉल्बीवरून (साऊंड सिस्टिम) गाण्यांचा दणदणाट सुरू राहतो. नवजात बालकांची, वृद्धांची, हदयरोगींची तमा बाळगली जात नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाने गाठलेली ही स्थिती सांस्कृतिक दहशतवादापेक्षा वेगळी नाही. राजकीय महत्वाकांक्षेने पछाडलेल्या बड्या नेत्यांमुळे खालच्या थरातील नेत्या-कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाला या वळणावर आणून ठेवले आहे. 


आजही सार्वजनिक गणेश मंडळांना सूचवावेसे वाटते की, उत्सव काळात अनेक चांगले कार्यक्रम राबविता येऊ शकतात, ज्यामुळे समाजाला वाममार्गापासून अलिप्त करता येईल. व्याख्यानमाला, कला-क्रिडा, सास्कृतिक स्पर्धा आयोजित करता येतील. शिवाय, उरलेल वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना, अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना मदत देता येऊ शकते. विविध वृत्तपत्रांतून अनेक वेळा गरीबांसाठी मोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रिया वा औषधोपचाराची गरज असल्याची व त्यासाठीच्या निधीसाठी आवाहन केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी अशा आवाहनाला अनुसरून सक्रिय पाठिंबा आपल्या कुवतीनुसार करूशकतात, तसेच ग्रामीण भागातून ज्या शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च अत्यावश्यक आहे, त्यासाठी खर्च करावा. वाचनालये किंवा सार्वजनिक शौचालये, यासाठी मंडळे खर्च करू शकतात. आरोग्याशी निगडीत एड्स ते कॅन्सर यांबाबत समज-गैरसमज, पावसाळ्यातील आरोग्य, स्त्रियांचे प्रश्‍न आणि आरोग्य, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसह अंधश्रद्धा असे कार्यक्रम ठेवावेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी असे कार्यक्रम राबविल्यास जनतेला प्रबोधनाचे एक नवे दालन खुले होईल. गणेशोत्सवात होणारा हिडीस प्रकार थांबविण्यासाठी व गणेशोत्सव शिस्तबद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास नवा पायंडा पडेल आणि हा उत्सव सगळ्यांनाच प्रेरणा, आनंद देणारा व भक्तिभाव असणारा ठरेल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या