Ticker

10/recent/ticker-posts

मुलगी वाचवा हो ...

मुलीला मुलगा समजून, मुलगा मानून तिच्या जन्माचे स्वागत करायला हवे

-दादासाहेब येंधे 

'मुलगा झाला' असा शब्द कानी पडला की, साऱ्या घरभर आनंदसरिता ओसंडून वाहू लागते. मुलगा झाल्याची ही बातमी सगेसोयऱ्यांना, नातेवाईकांना समजली तर त्यांचेही आनंदाचे ओढे-नाले या आंनदसरितेला येऊन मिळतात आणि या साऱ्यांचा एक मोठा आनंदसागर निर्माण होऊन अति हर्षाचे उधाण येते; परंतु हा मुलगा एका नारीच्या उदरी जन्मला हे हा अज्ञानी समाज काही काळ विसरून गेलेला असतो. वंशाला दिवा पाहिजे म्हणून स्त्रीभ्रूण हत्येचे (बालहत्या) महाभयंकर पाप हा अंध आणि अज्ञानी समाज करत असतो. या पापाची जाणीव या अंध झालेल्या समाजाला अजूनही होत नाही याचीच मोठी खंत वाटते. 

भारतात दरवर्षी कित्येक स्त्रीभ्रूण हत्या होतात. गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून सोनोग्राफी मशीन इथे आल्या, तेव्हापासून स्त्रीभ्रूण हत्येला भारतात उधाण आले आहे. वास्तविक विविध आजारांवरील चाचण्या करण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा वापर होतो. तसा तो केला जातही असेल; पण सोनोग्राफीचा पर्याय आल्यापासून त्याचा दुरूपयोगच जास्त झालेला आहे. काही वेळा एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी व नंतर झालेल्या मुलात जास्त अंतर असेल तर हमखास समजावे एखाद्या मुलीचा निश्चितच येथे बळी गेलेला आहे. बऱ्याचदा अशी माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. पण ते उघड सत्य आहे.

समाजात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अलीकडे आई-वडीलांकडून मुलीच्या जन्माचा हक्क नाकारला जात आहे. या सर्व गोष्टीला दारिद्रयाबरोबरच अज्ञान हेसुद्धा कारणीभूत आहे. केवळ गरीब वर्गामध्ये हे प्रमाण अधिक आहे असे नाही तर सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गातही हे प्रमाण वाढत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, मुली शिकाव्यात आणि विधवांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी फुले आणि कर्वे यांनी स्त्रीसुधारणेचे कार्य केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु स्त्रीभ्रूण हत्येत मात्र महाराष्ट्र आता मोठया प्रमाणावर पुढे जात आहे, त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याची तात्काळ गरज निर्माण झाली आहे. 

आज देशात मुलींचे जन्माचे प्रमाण कमी होत आहे. या सर्व गोष्टीला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. कारण आपण शिक्षित असूनही अशिक्षित असल्यासारखे वागत आहोत. याला आणखी कारणीभूत म्हणजे आपले काही पूर्वापार चालत आलेले अंध समाज, रूढी-परंपरा व रितीरिवाज. मुलगा हा वंशाचा दिवा असतो, संपत्तीचा वारस आणि घराण्याचा कुलदीपक असतो. म्हातारपणाचा आधार असतो आणि मृत्यूनंतर पाणी पाजण्यास आणि चिता पेटविण्यास (अग्नी डाग देण्यास) मुलगाच हवा असतो. अशा या अंध व खुळया समजुतींमुळे मुलाच्या जन्माचा अट्टाहास केला जात आहे; परंतु मुलींचे ढासळते जन्मदर मानवाला संकटाच्या खाईत नेत आहेत, याची जाणीव अजूनही समाजाने ठेवलेली नाही. 

जर दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर या देशात ज्या काही स्त्रिया जन्माला येतील त्यांनादेखील जीवन जगणे मुष्कील होऊन बसेल. कारण पुरुषांची संख्या वाढली आणि स्त्रियांची संख्या कमी झाली तर मुलांची लग्ने होणे फार दुरापास्त आणि अवघड होईल. अशा वाढत्या मुलांच्या संख्येमुळे अनेक मुलं अविवाहित राहतील किंवा विवाह लवकर वेळवर होणार नाहीत हे सत्य नाकारून चालणार नाही. मुलींच्या घटत्या संख्येमुळे स्त्रीला देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. याचा कुणी विचार व चिंतन करण्यास तयार नाही. स्त्रीचे घटते प्रमाण आणि पुरूषांचे वाढते प्रमाण याला कारणीभूत सर्वस्वी आपण सारे जबाबदार आहोत. मुलांची संख्या वाढून ते जर फार काळ अविवाहित राहिले तर त्यांच्या वासनेला बळी पडावे लागेल. कमी संख्याबल असलेली स्त्री, स्त्रीच्या या कमी बलसंख्येमुळे तिला भरदिवसादेखील राजरोसपणे फिरता येणार नाही. भरदिवसा तिच्यावर बलात्कार होत जातील. याचा कुणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. 

मुलींना आईच्या पोटातच मारून टाकण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी समाजात जागृती निर्माण करून तशी जाणीव नव्याने विकसित करायला हवी. या हत्या रोखण्यासाठी महिला आयोगाकडे कायद्याचे अधिकार असायला हवेत. सामाजिक मतपरिवर्तनाखेरीज स्त्रीभ्रूण हत्येवर प्रभावी तोडगा काढण्याची गरज आहे. राज्यात जेथे जेथे सोनोग्राफी केंद्रे जिल्हास्तरावर आहेत तेथे तालुकापातळीवर वैद्यकीय अधिक्षक यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या मदतीने गर्भजल चाचणी केंद्रावर अचानक भेटी देऊन तपासणी करावी. तसेच दरमहा गर्भजल केंद्रांना भेटी देऊन कारवाई केली जावी आणि त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश प्रत्येक जिल्हाधीकाऱ्यांकडून निघणे आवश्यक आहे. 

आईवडीलांनी मुलाचा हट्ट न धरता मुलीलाही मुलगा समजून, मुलगा मानून मुलीच्या जन्माचे स्वागत करायला हवे. सरकारने देखील केवळ घोशणाबाजी आणि कन्या जन्माचे स्वागत करा, असे अभियान फक्त कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे आणि स्त्रीयांवर होणारा अन्याय, अत्याचाराविरूद्ध कडक कायदा करून तिचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या