Ticker

10/recent/ticker-posts

तुझा विसर न व्हावा ...

महाराष्ट्राचा अपूर्व भक्‍ती सोहळा म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणारी पांडुरंगाची यात्रा म्हणावी लागेल. आता तर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशांतून अनेक भक्‍त आषाढीच्या निमित्ताने पंढरीच्या वारीमध्ये वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये हरीनामाचा गजर करण्यासाठी सहभागी होत आहेत. मन आणि शरीराचा सगळा शीण घालवून समाधानाचे वरदान प्राप्त करून घेताहेत. आषाढी एकादशीला श्रद्धा, भक्‍ती हीच माणसाच्या किंवा एकूण विश्वाच्या जीवनाचा सिद्धांत आहे, हे सांगणारा महोत्सव सध्या पंढरपुरात भरला आहे. लाखो विठ्ठल भक्‍तांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर मनोमन पांडुरंगाचे दर्शन घेईल. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवायला मिळाले नाही, तरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन रोमारोमांत विठ्ठलमय झालेला वारकरी खऱ्याखुऱ्या आनंदाचा वाटेकरी होईल. 


अंधश्रद्धेला थारा नसलेला हा वारकरी सांप्रदाय खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे. जातीपातीला नसलेला थारा हेच याचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य आहे. दर महिन्याला एक तरी सोहळा महाराष्ट्रत साजरा केला जातो. या मागचे कारण म्हणजे या निमित्ताने समाजाने संघटित व्हावे, हाच खरा उद्देश आहे. विठ्ठलभक्‍्तीमध्ये तल्लीन झालेला वारकरी नुसताच देव देव करणारा नसतो, तर तो खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि श्रमजीवी असतो. म्हणून तर शिर्डीला साईबाबांच्या व तिरुपतीला बालाजीच्या पायाशी कोट्यावधी रुपयांचे दान देणारा, आणि पंढरपुरातील वारकरी यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. विठू माऊलीकडे लीन होणारा भक्‍त हा कधीही आपल्या संपत्तीचे वाजवीपेक्षा दर्शन करीत नसतो. मात्र तोच प्रकार उलट्या पद्धतीने शिर्डी व तिरुपतीत पाहायला मिळतो. देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागणाऱ्या भक्तांची संख्या हल्ली वाढतेय, ती पैशाच्या मोहामुळे. पण, पंढरपुरात जाणारा प्रत्येक वारकरी मात्र मोहमायेपासून शेकडो मैल दूर्‌ असतो. त्याला कोणतीही लालसा नसते. त्याला आस असते, ती फक्त विठू माऊलीच्या दर्शनाची. गळ्यात तुळशीची माळ आणि तोंडाने विठूनामाचा जप हीच त्याच्यासाठी संपत्ती असते.


भक्तीचे विद्यापीठ

आज कलियुगाचा महिमा सांगितला जातो. जिकडे तिकडे अविश्वास आणि भौतिक सुखाची लागलेली भयंकर आस जागोजागी पहायला मिळते. याचे प्रमुख कारण म्हणजे जगण्याचे खरे समाधान कशात आहे, याचीच ओळख  माणसाला होत नाही. पैसा मिळाला, सुख मिळाले की, आपल्याच मौजमस्तीमध्ये रमणारा माणूस मनामधून अनेक कारणांनी मात्र दु:खी आहे. श्रद्धेचा पायाच ढासळल्यामुळे भौतिक सुखाची ही इमारत केव्हा मोडकळीला येईल याचा भरवसा राहात नाही. हा सगळा अनुभव घेऊनच आपल्या भारतीय संस्कृतीच्या क्रषीमुनींनी आणि संतांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भक्‍ती सोहळ्यांची व्यवस्था केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संसार, प्रपंच करताना अनेक समस्या येतात. पण, त्यातून पळून न जाता,. विरक्‍ती न घेता त्याला भक्‍तीची जोड दिली आणि कृतीचे महत्त्व पटवून दिले. महिना, दीड महिना वारीमध्ये सहभागी झालेला व्यापारी वर्ग असो किंवा शेतकरी असो, तो पुन्हा आपापल्या गावाला जाऊन कामाला लागेल. केवळ आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतलेला वारकरीसुद्धा श्रद्धेची ही साठवण मनामध्ये ठेवत असतो. स्वत:बरेबर आपल्या घरात प्रपंचामध्ये भक्तीचा दिवा तेवत ठेवत असतो. कोणतीही औपचारिक किंवा कायदेशीर व्यवस्था नसताना स्वयंशिस्तीने भक्‍तीचे हे विद्यापीठ शेकडो वर्षे आपले काम करीत आहे. अनेकांना खऱ्या जीवनाच्या समाधानाचे शिक्षण देत आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर अनेकांचे भविष्य घडविण्यासाठी जो आत्मविश्वास आणि जी जीवनमूल्ये लागतात ती देण्याचे काम अशा प्रकारच्या भक्तीतून, वारीतून आपोआप होते. यासाठीच पंढरीचा महिमा वर्णावा किती, अशा प्रकारचे वर्णन पांडुरंगाबाबत केले गेले आहे. कारण तसा अनुभव आतापर्यंत लाखो भक्तांनी घेतला आहे.


सगळा भार देवावर न टाकता आपल्यावरच्या जबाबदारीचे भान त्या देवाच्याच कृपेने बाळगण्याचे आवाहन त्यानिमित्ताने केले जाते. तेच पंढरपुरात जमलेल्या वैष्णवांच्या मांदियाळीचे वैशिष्ट्य ठरते. आयुष्याच्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडत असताना काही काळासाठी का असेना, जीवनमुक्‍ततेची ही अनुभूती देणारी ही भक्‍ती म्हणूनच मोलाची ठरते आहे. म्हणूनच या उभ्या आयुष्याशी सामना करताना नेहमी तुझी साथ असावी. देवा, तुझा विसर न व्हावा...







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या