Ticker

10/recent/ticker-posts

सुवासिनी प्रमाणे नटणारा घाट

माळशेज घाट हे अँडव्हेंचर, नेचर लव्हर आणि ट्रेकर्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण 


जून ते ऑगस्ट या महिन्यांत पावसाची बरसात असते. नवचैतन्य घेऊन आलेला हा पावसाळा आणि त्यातच काही महिन्यांच्या गॅपनंतर एकत्र आलेला कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप असे समीकरण जुळल्यानंतर सुरुवात होते ती पावसाळ्यात सहलीला जायच्या गप्पांना. मुंबई-पुण्याजवळच्या कॉलेजियन्सच्या तोंडावर पावसाळा पिकनिक स्पॉट म्हणजे माळशेज घाट हे नाव बरेचदा ऐकले असेल. मुंबईपासून १५४ किलोमीटर आणि पुण्यापासून १३० किलोमीटर अंतरावर असलेला माळशेज घाट हा वन-डे पिकनिक स्पॉट आहे. समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर असलेला माळशेज घाट हा अँडव्हेंचर, नेचर लव्हर आणि ट्रेकर्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. सृष्टीची नवनिर्मिती आणि भर पावसात चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या घाटात जायला काहीच हरकत नाही. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रतील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे.




फेसाळणारे धबधबे

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे  धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता आणि घाटातील गणपतीचे मंदिर हे अनुभवायचे असेल तर नगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. बोगद्यातून गाडी जाताना त्यावर पडणाऱ्या पाण्याचा धो धो आवाज अंगाचा थरकाप उडवितो. तेथील रस्ता हा एवढा बिकट आहे की, गाडीतून प्रवास करताना जणू आपल्या अंगावर पूर्ण सह्याद्री पर्वतच येत आहे, असा भास कधीकधी होतो. 


जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव धरणाचा सुंदर जलाशय(धरण) आहे. इकडची खासियत म्हणजे रोहित पक्षी' फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एस.टी.च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वत:च्या वाहनाने गेल्यास पुण्याहून किंवा कल्याण, ठाणे येथून एक दिवसाची पावसाळी सहल सहज काढता येईल.


समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलांमुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या, माकड अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैंबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.


पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल. डोंगरावरून फेसाळत पडणारे पाणी मन मोहून टाकते. 


उत्तुंग डोंगररांग

कदाचित खंडाळा घाटाच्याही आधीचा, देशावरच्या लोकांना कोकणात उतरण्यासाठी असलेला हा खूप जुना घाट. पेपरात “दरडी कोसळून, काही दिवस रस्ता बंद' या बातमीमुळे माहिती होणारा. गावी जायचे असल्यास या घाटाने कधीकधी प्रवास होतो. घाटाकडे जाताना मध्येच लागणाऱ्या टोकावडे गावातील बटाटे वडे, खारे शेंगदाणे, करवंद, जांभळं, रायवळ आंबे, आणि पावसाळयात गरग-गरम मक्‍याची कणसं तीही मीठ-मिरची लावून व लिंबू पिळलेली खातानाची मजा काही औरच. माळशेज घाटापासून जवळच हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. इथला कोकणकडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. माळशेज घाटातील रांगांमध्येच तिसऱ्या शतकातील बौद्ध गुहा आहेत.


अष्टविनायकातील ओझर व लेण्याद्रीचे गणपती इथून जवळ आहेत. ओझर जवळील हिवरे खुर्द येथे प्रति शनिशिंगणापूर म्हणून शनीचे मंदिर प्रसिद्ध आहे. ज्योतिलींग भीमाशंकरही माळशेज घाटापासून काही अंतरावर आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी या घाटातून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे माळशेज घाटानजिक आल्यास इतरही ठिकाणांना भेटी देता येतात. 


सणावाराला हिरवा चुडा, हिरवा शालू ल्यायलेल्या सुवासिनीप्रमाणे पावसाळ्यात माळशेज घाट नटतो. काळे पांढरे ढग गिरीशिखरांच्या टोकांना स्पर्श करू लागतात. घाटातल्या डोंगर टेकाडांवरून असंख्य धबधबे उतरू लागतात. नागमोडी वळणे आणि डोंगरदऱ्यांच्या कपारीतून उतरणारे धबधबे आणि पावसाळ्यात येथे वानरसेना (माकडे) मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. त्यावेळी पर्यटकांच्या हातामधील वस्तू पळविण्याचे कामही मोठ्या प्रमाणात या वानरसेनेकडून होते. अशी अंनेक उदाहरणे या घाटाच्या आकर्षणाचे बिंदू आहेत.



किर्र झाडीतून येणारे पक्ष्यांचे मंजूळ आवाज, पावसाळ्यातील शुभ्र गाणाऱ्या पाण्याचा खळखळाट येथील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खरंच, माळशेज घाट आपण लेखात म्हटल्याप्रमाणे सुवासिनीप्रमाणे नटनारा घाट आहे. वन डे पिकनिकसाठी चांगले ठिकाण आहे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.