Ticker

10/recent/ticker-posts

सेल्फीचे भूत कसे उतरवाल..?

सेल्फीची आवड असणे अयोग्य नाही पण आवड- सवय आणि व्यसन यातील बारीक आणि अस्पष्ट असलेली रेषा आपण प्रत्येकाने ओळखायला हवी...


आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाचे कष्ट आणि वेळ अनेक पटीने वाचविले असले तरी अनेक दुर्घटनाही घडण्यास हेच तंत्रज्ञान कारणीभूत ठरते आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या स्वत:च्या चेहऱ्याचे देखणे रूप जगासमोर आणण्याचा चांगला पर्याय मोबाईलमुळे प्राप्त झाला आहे. अगदी केव्हाही आणि कुठल्याही क्षणी आपण स्वत:चे छायाचित्र काढून इतरांशी शेअर करू शकतो. पण कुठे सेल्फी घ्यायचा आणि कुठे नाही, हे कळले नाही तर जीवालाही मुकावे लागेल. याचे भान ठेवणे गरजेचे आहे. तुमचा जीव जातो आणि कुटुंबातील आईवडील आणि इतरांना होणाऱ्या वेदना आणि त्रास भरून न येणारा असतो. जीवघेण्या अपघाताच्या बातम्या कानावर येऊनही तरुण-तरुणी रेल्वे ट्रॅकवर जात असतात. अनेकांना सेल्फीसाठी नेहमीचा बॅकग्राऊंड नको असतो. म्हणूनच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची त्यांना कल्पना सुचते. सेल्फीचा अतिरेक हा तात्काळ लक्ष वेधून घेण्यासाठी होतो. सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी सतत आपले फोटो सेल्फीद्वारे काढून सतत लोकांना पाठवत राहण्याचे व्यसन बऱ्याच तरुणांना लागले आहे.


जीवावर बेतले

मोबाईलमधून सेल्फी काढण्याचे वाढते वेड जिवावर कसे बेतू शकते याचे उदाहरण नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मंगरूळ तलावाकाठी काही दिवसांपूर्वी दिसून आले. या तलावावर दहा तरुण सहलीसाठी गेले होते. त्यापैकी सातजण तलावात मध्यभागी नौकाविहारासाठी गेले असता त्यांना मोबाईलमध्ये आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटो काढण्याच्या भरात हे तरुण बोटीच्या एकाच बाजूला जमा झाले. तेव्हा त्यांच्या वजनाने बोट कलंडली आणि सातही जण बुडाले. रेल्वे ट्रॅकवर धडधडत येणाऱ्या इंजिनसमोर सेल्फी घेणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रणच देणे. मध्यंतरी अशीच एक घटना घडली. एका महाविद्यालयातील विद्यार्थी ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे रेल्वेने चालले होते. सेल्फी घेण्यासाठी ते रेल्वे रूळावर उतरले आणि सेल्फी घेण्यापूर्वी दुसऱ्या रेल्वेने दोघांना अक्षरश: चिरडले. अनीश नावाचा विद्यार्थी या जीवघेण्या स्टंटबाजीतून वाचला होता. त्याने पोलिसांना सांगितले की सेल्फी घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. पण एका क्षणाची वेळ चुकली आणि त्या दोघांना जीव गमवावा लागला. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळमध्ये रेल्वेच्या टपावर चढून सेल्फी काढण्याच्या आवेशात १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. हा मुलगा मालवाहक करणाऱ्या रेल्वेच्या डब्यावर चढला होता. त्यावरील उच्च दाबाची वीजवाहिनी त्याच्या लक्षात आली नाही. त्या वीज वाहिनीचा प्रचंड झटका बसून तो डब्यावरून खाली फेकला जाऊन मरण पावला होता.


सेल्फी महागात पडली

आणखी एक घटना अशी की, एका तरुणाचे वडील मरण पावल्यावर त्यानेकवडिलांच्या मृतदेहासोबत सेल्फी काढूनक तो फेसबूकवर टाकला. ही दु:खद बातमी त्याला फोन करून कळवता आली असती, पण मित्रपरिवाराला वडिलांच्या निधनाची बातमी अशाप्रकारे देणे पूर्णत: अयोग्य आहे. अमेरीकेत एका क्लबमध्ये २३ वर्षीय तरुणीचा फोन चोरीला गेला होता. आता आपला आयफोन परत कधीच मिळणार नाही असे तिला वाटत होते. पण घटनेच्या वतीने दिवसांनी तिने फेसबुकवर लॉगइन केले व तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या फेसबुक अकाऊंटवर चोरीला गेलेल्या आयफोनवरून काढलेले १६ फोटो अपलोड झालेले होते. विशेष म्हणजे हे सर्व मोबाईल चोरणाऱ्या तरुणीने काढलेली सेल्फी होते. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली व पोलिसांनी मोबाईल चोर तरुणीचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवून दिला. मोबाईल चोरणाऱ्या तरुणीच्या आईने तो फोन स्थानिक पोलिसांना आणून दिला. व मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणीला पोलीसांनी अटक केली. म्हणजेच चोरलेल्या आय फोनवरील सेल्फी तिला महागात पडली, पूर्वी एक फॅड म्हणून सेल्फी काढले जात होते, पण आता त्याचा अतिरेकच होत आहे, असेच  नाइलाजाने म्हणावे लागेल.


सेल्फीचे हे भूत भारतातच नव्हे तर जगभरात सर्वच उत्साही मंडळींच्या मानगुटीवर बसू लागले आहे. म्हणजेच, एक फॅड म्हणून आपल्या समाजजीवनाचा आणि खासगी जीवनाचा भाग बनलेला सेल्फी आता जीवघेणा ठरू लागला आहे. हे वरील उदाहरणांवरून सिद्ध होते. कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या हाताळणीत दाखवायचे असते, ते तारतम्य सेल्फीबाबतीतही दाखवावे लागेल. भविष्यात कधी तरी “नो सेल्फी धोरण शाळा, महाविद्यालये, सरकारे, माध्यमे यांना अंमलात आणावेच लागेल. अशा वेळी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावे गळा काढणाऱ्यांना सुरक्षित आणि निरुपद्रवी सेल्फी असू शकतात हे सिद्ध करावे लागेल. ते व्हायचे नसेल, तर सेल्फीचा गैरवापर टाळलेलाच बरा. सेल्फीची आवड असणे अयोग्य नाही पण आवड- सवय आणि व्यसन यातील बारीक आणि अस्पष्ट असलेली रेषा आपण प्रत्येकाने ओळखायला हवी.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या