-दादासाहेब येंधे
धूम्रपान करण्यासाठी लोक वेगवेगळी कारणे शोधत असतात. कधी ट्रेंड म्हणून तर कधी टेन्शनवर उतारा म्हणून, कधी मित्राचा आग्रह म्हणून तर कधी सवंयीचा गुलाम म्हणून! स्वत: धूमपान करून इतरांच्या भोवतालचे वातावरण प्रदूषित करणारे हे महाभाग संख्येने विपूल आहेत. कधीतरी उत्सुकतेपोटी एखादी सिगारेट ओढून बघणारे एकदम दिवसागणिक चाळीस चाळीस सिगारेटीसुद्धा सहजपणे ओढत असतात. त्यात चित्रपटातील त्यांचे सो कॉल्ड रोल मॉडेल्स असे आदर्श प्रस्थापिक करण्यात माहीर असतात. रफ आणि टफ कपडे, ट्रेंडी शूज घालायचे, दाढीची खुंटे वाढवायची, डोळ्यांवर गॉगल, ओठांत सिगारेट शिलगवायची म्हणजे मग या आपल्या रुपड्यांवर फिदा होणाऱ्या छब्यांची नुसती लाईन लागते असा समज काही हीरो करून देतच असतात. धूमपान हे व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. हा मजकूर सिगारेटच्या पाकिटावर लिहूनही सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या दिवसामाशी वाढतच आहे.
आजच्या काळात सिगारेट ओढणे ही एक फॅशन झाली आहे. कॉलेज कट्टा असो की चहाची टपरी, मित्रांचा गोतावळा जमला की 'चोरी चोरी चुपके चुपके' तर कधी बिनधास्त सिगारेटचे कश ओढले जातात. सिगारेट सोडा, असे आपल्याला वारंवार सांगितले जात असूनही आपण ती सोडायला तयार होत नाही. सिगारेटचे व्यसन हे एक मानसिक व्यसन आहे.
त्यामुळे मनाने ठरवले तर आपण त्यापासून सहजपणे मुक्ती मिळवू शकतो. काही लोक धुम्रपानाच्या इतके आहारी गेले आहेत की, त्यामुळे शारिरीक नुकसान होत असूनही अनेकजण मरेपर्यंत सिगारेटचे व्यसन सोडू शकत नाहीत. धरूमपानाचे हे व्यसन कसे लागते? त्यासाठी एक किंबा दोन दिवस विडी किंवा सिगारेट ओढणेही पुरेसे असते. पहिल्यांदा ती ओढताना थोडी कडवट लागते. पण आपणही दुसऱ्याचे अनुकरण केले पाहिजे असे वाटल्यामुळे ही सवय सुटत नाही. दोन-तीन दिस कडवट लागणारी विडी किंवा सिगारेट एकदा तोंडाला लागली की ती मरेपर्यंत सुटत नाही. सर्वसाधारणपणे पाहिले तर ध्रूमपानची सवय किशोरावस्थेतच लागते. या वयात आपल्या मित्रांचा आपल्या मनावार फार प्रभाव असतो. अनेक युवा 'एकाग्रता' मिळविण्यासाठी ध्रूमपान करतात तर काहीजण टाईमपाससाठी, मनोरंजनासाठी या सवयीकडे वळतात. अनेकदा जाहिरातींमधून धूमपानाचे समर्थन केले जाते. धूमपानाचा व्यापार जाहिरातींवरच चालत असतो. किशोरवयीन मुलांना किंवा तरुणवर्गाला आकर्षित करून घेण्यासाठी त्यांना भ्रमित करण्यासाठी आपल्या उत्पादनाची जाहिरात केली जाते. अलिकडच्या काळात तरुणांमध्ये हुक्का लोकप्रिय आहे. हुक्का सिगारेटपेक्षा कितीतरी घातक आहे. ध्रूमपान बंदीसाठी आज काही कायदेही करण्यात आले आहेत विशेषतः शहरी भागासाठी हे कायदे असतात, पण आपल्या देशात ८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. गावांमध्ये कायद्याच्या माध्यमातून तंबाखू -सेवन अथवा धूम्रपान यावर अंकुश ठेवण्यासाठी जागरूकतेची आवश्यकता आहे. केवळ कायदे करून काहीही साध्य होणार नाही. यासाठी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती वारंवार प्रकाशित होण्याची गरज आहे. ध्रूमपानामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात हे जाणून घेतले पाहिजे. त्यापासून होणारे तोटेच अधिकक आहेत, पण फायदा काहीही नाही. सिगारेटमध्ये तंबाखू. भरलेली असते. तंबाखूमध्ये विषारी रसायनांचे भांडार असते. यामुळे कॅन्सर, श्वसन रोग, पोटाचे विकार, हृदयाच्या समस्या असे विकार निर्माण होतात.
यातील निकोटीन नामक द्रव्याने फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होऊन पुढे यासंबंधीचे अनेक आंजार संभवतात हे ठाऊक असूनही आपण हा आत्मघाती मार्ग का पत्कारतो? आपण एक कुटुंबप्रमुख आहोत, आपल्यावर अनेकांची नुसती जबाबदारी नाही तर तेवढीच मायाही आहे हे सत्य आपण विसरून जातो का? आपल्यावसिगारेट ओढण्याने फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या सानिध्यात येणाऱ्या अनेकांना अपाय होऊ शकतो याचा आपण गांभीर्याने का विचार करू शकत नाही? काहीजण दुसऱ्यांचे उदाहरण लक्षात घेऊन सिगारेटची सवय सोडतात. सिगारेट सोडणे म्हणजे एक महिना त्यापासून दूर राहिले पाहिजे. या दिवसांत सिगारेट ओढावीशी वाटलीच तर त्यासाठी काही औषधे मिळतात त्याचा आसरा घ्यायला हवा.
इतरत्र सिगारेट ओढण्यासाठी जरी शासनाने बंदी केलेली नसली. तरीही त्याचा अर्थ तुम्हाला इतरांनी धूमपान करण्याचा परवाना दिला आहे असा होत नाही. कुणीही रस्त्यावर यावे, भकाभका सिगारेट ओढून आपल्या आजूबाजूची हवा प्रदूषितककरावी, समोरून येणाऱ्यांवर धुराची वलये सोडून त्याला शारीरिक इजा पोहचवावी हा हक्क तुम्हाला कुणीही दिलेला नाही. दिवाळीत वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धुराविरुद्ध आवाज उठवले जातात. पण...रोजच्या रोज या धुराचे जे अतिक्रमण धूमपान न करणाऱ्यांवर होत आहे, त्याविरुद्ध कुणीही आवाज उठताना दिसत नाही. जनजागृती मोहीम काढली जात नाही. नुसते पोस्टर लावून या फोफावणाऱ्या घातक सवयींचे निराकरण होणार नाही. हनुमानाने जशी लंका पेटवली तशीच या धूमपानाविरुद्धची आग जनमनात भडकली पाहिजे. एखाद्याविरुद्ध निषेध नोंदवताना ज्याप्रमाणे त्याची पोस्टर किंवा त्याच्या प्रतिमा जाळण्यात येतात, त्याप्रमाणे सिगारेट ओढणाऱ्यांच्या हातातील, खिशातील सिगारेटच्या पाकिटांची होळी करता आली पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.