फळांचा राजा आंबा, याची चव चाखायला सर्वजण उत्सुक असतात. फक्त उन्हाळ्यात येणारे हे फळ शरीरासाठीदेखील आरोग्यदायी आहे.
आला गं... बाई आला गं..,
पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ...
(ही पूर्ण लावणी, आंब्याचेच रुपक घेत पुढे जाते.)
आणि आपले बालपण ज्या गाण्याशी निगडीत आहे ते गाणे..
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात,
नाच रे मोरा नाच...
ही लोकगीते आता तोंडावर यायला लागली आहेत. कारण आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात, रस्त्यावरच्या गल्लोगल्ली आंब्यांची छोटी-मोठी दुकानं थाटलेली दिसत आहेत. ज्या त्या दुकानात गवतात मांडून ठेवलेले पिवळे धम्मक आंबे दिसू लागले आहेत. फळांच्या बाजारावर या राजानं जणू राज्य केलंय असंच दिसून येतंय. तसं होणारही म्हणा, कारण शेवटी तो फळांचा राजा आहे. फळांच्या राजाबरोबरच आपलं राष्ट्रीय फळ देखील आहे. पण हाच आंबा आता ग्लोबल होत चालला आहे.
नुसतं चवीपुरताच नाही तर आणखी वेगवेगळ्या ठिकाणी या आंब्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. भारतातल्या एखाद्या फळाला आंब्याइतकी प्रसिद्धी कूचितच लाभली असेल. म्हणजे लोकगीत, गोष्टी, टीव्हीवरच्या मालिका, जाहिरात, सोशल मीडिया, फॅशन इंडस्ट्री, बॉलिवूडचे कलाकार, चित्रकार अशा सगळ्याच ठिकाणी आंबा पोहोचला आहे.
जाहिराती, मालिकेतला आंबा
आंब्याचा मौसम सुरू झाला आणि टीव्हीवरच्या, खाद्यपदार्थांच्या मालिकेत त्याचं दर्शन झालं नाही तर नवलच म्हणावं लागेल. आंबा, आमरस कुटुंबातील मंडळींसोबत खातानाचे एपिसोड मालिकांमध्ये दिसू लागले आहेत. त्यातून आंब्याची पोहोच कुठपर्यंत आहे ते दिसून येतं. शाहरूख, करीना, कतरीना यासारखे सेलिब्रिटी आंब्यापासून बनवलेल्या उत्पादनाच्या जाहिरातीत देखील दिसून येत आहेत. काही जाहिरातीत तर, एक वेळ काम नंतर करता येईलही पण आंब्याच्या मौसमात आंबा खाल्ला नाही तर वर्षभर त्याची वाट बघावी लागेल. अशा जाहिराती मनावर बिंबवताना दिसून येतात. अप्रत्यक्षरित्या या जाहिराती आणि त्यातले बॉलिवूडचे बडे कलाकार आंब्याचंच एकप्रकारे प्रमोशन करताहेत.
साहित्यात आंबा
आंब्याचा मोहोर आणि वसंत क्रतू यांची सांगड घातली गेलीय. त्यामुळे वसंत कालीन रागात, चैती सारख्या उपशास्त्रीय रचनात आंब्याच्या झाडाचा, फळांचा उल्लेख असतोच. कोकीळ पक्षाला देखील हे झाड प्रिय, त्यामुळेही शास्त्रीय चीजांत या झाडाचा उल्लेख येतो. रागांवर आधारित जी चित्रे असतात, त्यातही अनेकवेळा हे झाड दिसते. आपल्या मेंदीमधे, रांगोळ्यात, कपड्यावरील भरतकामात, कुंकवाच्या करंड्यात, कुयरीत हा आकार अगदी लोकप्रिय आहे. चित्रपटातही अनेक वेळा आंब्याचे झाड दिसते. नायिकेला डोहाळे लागले म्हणजे ती एकतर कैरी खाणार किंवा चिंचा.
“शोले” मधे पण बसंतीचा, कैरी पाडण्याचा मजेशीर प्रसंग आहे.
आंबा आरोग्यदायी
फळांचा राजा आंबा, याची चव चाखायला सर्वजण उत्सुक असतात. फक्त उन्हाळ्यात येणारे हे फळ शरीरासाठीदेखील आरोग्यदायी आहे. शक्तीवर्धक असलेला आंबा अनेक शारिरीक समस्यांवरदेखील रामबाण उपाय आहे. शरीराची आग होत असल्यास आंब्याचे सेवन उपयुक्त ठरते. भूक वाढवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. याशिवाय अतिसार यासारख्या व्याधींवर आंब्याची साल आणि कोय उपयुक्त ठरते. आंब्याच्या सालीचा काढा केल्यास किंवा कोय भाजून तिचे चूर्ण करून सेवन केल्यास अतिसारात फायदा होतो. आंब्याच्या कोयीतील गर चावून खाल्यास अजीर्ण, पोटदुखी, आमांश आणि जुलाबाचा त्रास कमी होतो.
सौंदर्य प्रसाधनातही आंबा
आंबा स्वयंपाकघरात जसा लोकप्रिय झाला तसाच स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातही प्रसिद्ध होत आहे. यामुळे त्वचा तजेलदार राहते व चेहऱ्यावरचा कोरडेपणा जातो. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जाऊन चेहरा स्वच्छ होतो. अकालिन वृद्धापकाळामुळे झालेल्या निस्तेज त्वचेसाठी आंब्याचा वापर केला जातोय. उन्हामुळे त्वचेमध्ये गरजेपेक्षा जास्त ओलावा व चिकचिकीपणा निर्माण होतो व तजेलदारपणा नष्ट होतो. अशा वेळेस नेहमीच पार्लर ट्रिटमेंट करणं सोयीचं होत नाही. नैसर्गिकरीत्या केलेले उपचार हे फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे असतात. आंब्यापासून तयार करण्यात आलेले सौंदर्यप्रसाधन नेहमीच उपयुक्त व फायदेशीर ठरणारे आहे. सौंदर्यविषयक काही समस्यांवरदेखील आंबा उपयुक्त ठरतो. आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडे पाणी उकळून तेल सिद्ध करावे. हे तेल केसात कोंडा झाल्यास किंवा खाज येत असल्यास प्रभावी ठरते. आंब्याची पाने सकाळी चघळल्यास हिरड्या मजबूत होतात. शिवाय दातातून रक्त येणे, यांसारख्या समस्यादेखील दूर होतात. डोळ्यांच्या समस्येवरदेखील आंबा उपयुक्त ठरतो. आंब्याची ताजी पाने चार कप पाण्यात उकळावी. ते पाणी गाळून थंड करावे. गार झाल्यानंतर त्या पाण्याचा वापर डोळ्याच्या समस्यांसाठी करावा.
या पाण्याच्या थेंबांमुळे डोळ्यांना सूज येणे. वारंवार पाणी येणे, धूसर दिसणे, रांजणवाडी यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तीवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत. तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेचून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास- विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.
खरेच, आंब्याच्या मौसमात आंबा खाल्ला नाही तर वर्षभर त्याची वाट बघावी लागेल, मग तुम्ही करताय ना आंबा खायला सुरुवात...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.