कुठल्याही ताकदीला घाबरू नये...
गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांनी अख्ख्या महाराष्ट्राचं नाक पुरतं कापलं गेलंय. संपूर्ण सामाजिक जीवनच हादरून गेलंय. कुणालाही कुणाचा धाक उरला नाही असं म्हटल्यास वावगं ठरु नये. शाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार, १० वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार, आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असणाऱ्या एका ६ वर्षीय बालिकेला खाऊचे अमिष दाखवून तिच्यावर शौचालयात नेऊन बलात्कार, बाबा-बुवांनी बलात्कार केला, तर एका ठिकाणी अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिचा खून तर शेजाऱ्यानेच केला बलात्कार. बलात्कार! बलात्कार! बलात्कार! कान सुन्न होतात.
याला कारण म्हणजे विकृत बुद्धी. तसेच काही झोपडपट्ट्यांमध्ये तर व्हिडीओ पार्लरमध्ये चित्रपटांच्या नावाखाली अश्लील चित्रपट दाखवले जातात जे चोरुन लपून पाहिल्याने साहजिकच विद्यार्थी, तरुण व वृद्धांमध्ये वासना जागृत होऊन संकटे येतात. काही ठिकाणी तर अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच कुटुंबातील मंडळींतर्फे अत्याचार केले जातात शिवाय गल्ली, बोळातील काका, मामाही सावज हेरण्यास टपलेलेच असतात.
अशी विनयभंग व बलात्काराची असंख्य प्रकरणे राजरोस वर्तमानपत्रात अथवा विविध प्रसारमाध्यमांद्रारे आपणास पहावयास मिळतात परंतु आपण दुर्दैवाने त्यांना आळा घालण्यास कुचकामी ठरतो. या घटनांमध्ये अनेक अल्पवयीन म्हणा अथवा विद्यार्थी किंवा स्त्रिया यांना आपला काही दोष नसताना देखील अनेक नराधमांच्या वासनेला बळी पडावे लागते. या बळी पडलेल्या व्यक्तींना नंतर समाजामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते व आपले पुढील आयुष्य कसे जगायचे हा जटील प्रश्न त्यांच्या समोर 'आ' वासून उभा राहतो.
लहान अल्पवयीन मुलींना तर गोड बोलून, खाऊचे आमिष दाखवून, फसवून बलात्काराची शिकार बनविले जाते. त्यामुळे लहान मुलींना अशा वासनांधांच्या नजरेतून वाचविण्यासाठी कधी नाही म्हणावे, कोणती गोष्टी करु नये व प्रतिकार कसा करावा याचे ज्ञान त्यांच्या पालकांनी वेळीच द्यायला पाहिजे. मुलींच्या वागण्या बोलण्यात काही प्रेमप्रकरणासारखा' फरक जाणवला. तर मुलींना वेळीच विश्वासात घेऊन परिस्थितीचे भान लक्षात घेऊन पालकांनी समजावून सांगितले पाहिजे. बलात्कारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांनी जबाबदार व्यक्तीने किंवा नवऱ्याने आपआपल्या पत्नीला, मुलीला किंवा इतर तरुण स्त्रीला हे समजावून सांगितले पाहिजे. सुंदर दिसण्यासाठी तोकडे कपडे घालून अर्धवस्त्रात फिरणे योग्य नाही, शरीर प्रदर्शन करून स्वत:च संकट निर्माण करणे योग्य नाही. वेळेत घरी येणे, मित्र-मैत्रिणींसह रात्री उशिरापर्यंत कोठेही फिरावयास जाऊ नये. मित्र-मैत्रिणींनी मित्र कसा असावा, याचा योग्य अभ्यास करुनच जोडीदार निवडावा. रंगेल मित्राला किंवा मैत्रिणीला चार हात लांब ठेवावे. अशा सूचना देऊन ठेवल्यास व त्यांचे मुलांनी काटेकोरपणे पालन केल्यास बलात्काराचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
खरेतर अशा घटनांना आपल्याला मनापासून रोखायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम शासनावर एक दबावगट" तयार करण्यासाठी आजच कामाला लागलं पाहिजे. दबावगट म्हणून काम करीत असताना बळी पडलेल्या स्त्रीला सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे. तिला सुरक्षिततेची हमी देण्याची गरज आहे. केवळ पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही. पोलिसांनी “स्त्रिया आणि मुलांवरील” अत्याचाराच्या घटनांमध्ये कोणकोणती काळजी घ्यावी जेणेकरुन आरोपी सुटणार नाहीत, यासाठी एक समान सूत्र तयार करण्याची गरज आहे. तरीसुद्धा प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षिततेविषयी जागरुक राहणे ही काळाची गरज आहे. पोलिस दल आपलं कार्य बजावतीलच, पण विकसित झालेल्या आणि विकसित होत असलेल्या महानगरांमध्ये अनेक टप्प्यांवर अनेक बदमाश विकृतींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपण अधिक सजग आणि डोळस असणं गरजेचं आहे.
कायद्याचा धाक नसणाऱ्यांना समाजाचा धाक कसा बसेल यावर प्रथमत: काम करण्याची गरज आहे. कायद्याला बासनात गुंडाळून ठेवणाऱ्या बेजबाबदार, बदमाशांना पोलिसांनी वेळीच जेरबंद करणे गरजेचे आहे. नाही तर हीच मंडळी उद्या सगळ्यांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता सर्व संवेदनशील नागरिकांनी त्याबाबतीत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. गृहखात्यानेही जबाबदारीनं वागत समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी नको तर ठोस कृतीची गरज आहे. तरच या दिकृत मनाच्या बदमाशांवर कायद्याचा धाक राहिल. बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीने न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार गाठीशी बांधला पाहिजे. कुठल्याही ताकदीला घाबरू नये. मग तो पैसा असो की सत्ता, अन्यायाच्या विरुद्ध खंबीर उभे राहिले पाहिजे. संघटीत झाले पाहिजे. बघा न्याय तुमच्या पायापाशी लोळण घेईल हे कधीही विसरु नका.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.