मुलींना एकच सांगणे आहे की त्यांनी स्वयंसिद्ध व मनाने भक्कम व्हायला हवे
-दादासाहेब येंधे
रोडरोमियोंच्या छेडाछेडीला कंटाळून पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर जीवन संपवण्याची वेळ आली. मुलींवरील व स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारीनाबद्दल सर्वत्र जागरूकता आणणे आवश्यक आहे. बसेस, रेल्वे स्थानक, कॉलेजचे गेट या मोक्याच्या ठिकाणी अक्षरशः खिंडीत गाठून मुलींना, युवतींना त्रास दिला जातो. कुठे त्यांच्या हातातील पुस्तकेच हिसकावली जातात. कुठे जाणून बुजून अडवणूक केली जाते.
युवकांच्या अशा वर्तणुकीला बऱ्याच अंशी सिनेमा जबाबदार असतात. वाहनांवरून स्टंट्स करीत मुलींचे लक्ष वेधण्यात कदाचित काही युवकांना आतून आनंद मिळत असेल. पण, आपल्या मित्रमंडळींमध्ये देखील 'देख यार हम भी, कुछ कम नही' अशी प्रौढी त्यांना मारायची असते. दहावीपर्यंत शिस्तीच्या वातावरणात वाढलेली ही मुले कॉलेजमध्ये येताच जणू स्वैर होतात. नवनवीन जीन्स ते टी शर्ट्स, हजारांच्या वर किंमत असलेले शूज, डोळ्यांवर गॉगल, तोंडात गुटखा आणि बुडाखाली बाईक. जग जणू आपल्या पायापाशीच लोळण घालत आहे, असे त्यांना वाटते. त्यात अगदीच जी मुलं लाजरी बुजरी, कमी बोलणारी असतात त्यांनाही कंपूत घेतले कि ती ही या तथाकथित हिरोचे भक्त होतात. खिदळून त्यांच्या चाळ्यांना साथ देतात. मग कधी त्यांची पैज लागते. अमुक पोरीला हाक मारून दाखव, अमकीचा मोबाईल नंबर मिळवून दाखव, अमकीला पटवून दाखव. कधी कधी अशा कंपूत आवारागर्दी करणाऱ्या मुलीसुद्धा असतात. त्याचा उपयोगही मुलं करतात.
भय संपत वाही
एखाद्या मुलीला सारखे फोन करून करून अमक्याशी दोस्ती कर, किमान त्याच्याशी बोल तरी, अशी सारखी गळ त्या घालतात. अनेकदा कॉलेजमध्ये एखाद्या निरागस मुलीचे नाव या हिरो बरोबर मुद्दाम लिहिले जाते. नुकतीच कॉलेजला प्रवेश घेतलेली मुलगी सर्व प्रकारांनी आतून भयंकर घाबरते. नर्व्हस होते. ती बाईकवर येत-जात असेल तर तिची बाईक पंक्चर केली जाते. जेणेकरून तिने आपल्यापाशी मदत मागावी म्हणून कंपू वाट पाहत असतो. इमानदारीने क्लासमध्ये जाणाऱ्या मुलींना मात्र हिणवले जाते. याचा सखोल परिणाम पापभिरू, भित्र्या, निरागस मुलींवर होतो. आई वडिलांचा धाक, नाव बदनाम होण्याची मिती, नापास होण्याची भिती, खरेच भय इथले संपत नाही अशी अवस्था होते पण...
माझे या मुलींना एकच सांगणे आहे की त्यांनी स्वयंसिद्ध व मनाने भक्कम व्हायला हवे.
समाजकंटक, टवाळखोर मुलांना घाबरून आपले सुंदर आयुष्य त्यांनी उगाचच बिघडवून घेऊ नये.
उलट अत्यंत हिंमतीने या वात्रट मुलांच्या समोर उभे राहून पायातली वहाण काढून हाणण्याची तयारी ठेवावी. ही अशी टोळकी अनेकदा समजतात की, ही पोरगी काय करेल? पण समोर उभी ठाकलेली हिम्मतवान पोरगी पाहताच एक-एक जण खाली मान घालून निघून जाऊ शकतात. काही नाही तर डोळे वटारून अशांकडे थोडा वेळ बघत राहा. आपल्या नजरेत जरब असली तरच धटिंगण घाबरणार नाही का? कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण केल्यावर तिने श्रीकृणाचा धावा केला आणि बंधू म्हणून श्रीकृणाने वस्त्र पुरवठा करून तिची अब्रू वाचविली. पण, ही सर्व पुराणातील उदाहरणे आहेत. आज असा बंधू सापडण्याचा चमत्कार होणार नाही. म्हणून आपणच सिद्ध असावं!
पुढील गोष्टी आत्मसात केल्यास बऱ्यापैकी मुली/महिला स्वत:चे संरक्षण स्वत:च करू शकतील.
संरक्षणाचे उपाय
१) बसमधून प्रवास करत असताना एखादा लंपट स्पर्श करतो. त्यावर उपाय म्हणून पर्समध्ये लहानशी पिन ठेवावी. असल्या नराधमांना गुपचुप टोचावी. न बोलता दूर होतील.
२) पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवावेत. मोबाईलमध्ये इमर्जन्सी नंबर आधीच ठेवून स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा, असे व्हायला नको.
३) सर्वात आधी समोरच्या व्यक््तिंमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे लक्ष द्या. (काही सेकंदातच तो लक्षात येतो) आपलं लक्ष्य त्यालाच करा.
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते. तिथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत नाहीच पण त्यानंतर काही काळ पायही टेकता येत नाही.
५) डोळे हा अतिमहत्त्वाचा भाग. त्याला लक्ष्य करा.
६) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत. त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान यांना लक्ष्य करा.
७) दातांचा वापर चावा घेण्यासाठी करा. मात्र, हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान अथवा मानेवर करा.
८) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा.
९) हे सगळं करण्यासाठी मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे. त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन प्रॅक्टीस करा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.