Ticker

10/recent/ticker-posts

मुलांवर योग्य वयातच संस्कार करा

 पालकांनी आपली मते मुलांवर लादू नयेत 

-दादासाहेब येंधे

 मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे पालकांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करताना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टिकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा. त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्र उभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. 


प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवा

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकत असतात. म्हणूनच मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. 'मग करू' म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. अनेकांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबून भरलेले असतात किंवा अस्ताव्यस्त पडलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक पाहुणे आले की, धांदल उडते. एकदा का हाताला 'असे वळण लागले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नसावा. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे.


मते मुलांवर लादू नका

अडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्वास ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना योग्य प्रकारे सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे, जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे. मात्र, पालकांनी आपली मते मुलांवर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी. पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्यच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबवायला हव्यात की मुलानं गैरवर्तन करताच कामा नये. थोडक्यात काय तर पालकांनी आदर्श जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवं.

 

शिस्त आणि संस्कृती महत्त्वाची

शुल्लक कारणासाठी हल्ली शालेय मुलं टोकाची भूमिका घेताना दिसून येतात. त्यांच्या परिणामाची त्यांना मुळीच पर्वा नसते. ही बाब निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. मात्र, मुलांची मानसिकता समजून घेऊन आईवडिलांनी त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. बरेचदा ती वेळ निघून गेली की मूल हट्ट करण्याचे सोडून देते. मुलांची आक्रमकता लक्षात घेऊन त्याला इतर मित्रांकरवी समज देणंही फायद्याचं ठरतं. एकदम मुलाला रागावणं किंवा मारणं आणखी धोक्याचं ठरू शकतं. आपण स्वत: मान्य होण्यासारख्या मागण्या असतील तर पूर्ण करतोच; पण मान्य होण्यासारख्या नसतील तर त्याच्या आईला मुलाची समजूत घालण्यास सांगतो. बहुंधा आईचं म्हणणं मुलं ऐकतात, असा अनुभव आहे. तिनं “अबोला” धरला तर मुलं वठणीवर येतात. पण, वडिलांनी हात उगारला तरी मुलं चिडून अविचारी काम करतात. पालकांनी मुलांसमोर घरात भांडणं करू नयेत. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे टाळावेच. शेवटी आपल्या घरची शिस्त व संस्कृतीच लहान मुलांना वळण लावण्यास कारणीभूत ठरते.


 अति लाड नकोच,

नकार पचवायला शिकवा एखाद्या गोष्टीसाठी नवी पिढी  “नकार” ऐकूच शकत नाही. आपल्या मनाविरुद्ध काहीही झालं तरी त्यांना चालत नाही. मुलांचे लाड जरूर करावेत; पण त्याचा अतिरेक नको. लहानपणापासून मुलांनी एखादी गोष्ट मला हवीच असा हट्ट धरला, तर ती गोष्ट त्यांना न देता नंतर काही दिवसांनी द्यावी. आपण मागितल्यावर लगेचच मिळतं, ही प्रवृत्ती त्यामुळे राहात नाही, मुलांनी मागितलेली वस्तू घ्यायची नसेल तर ती का घेत नाही, हे त्यांना समजावून सांगावं. प्रेमानं सांगावं, त्यामुळे मुलांमध्ये समजूतदारपणा येतो. मोठी व्यक्ती सांगतात ते बरोबरच आहे, हे त्यांना पटतं. तेव्हा रागावून, मारून, धाकदपटशाने काही साध्य होत नाही. नकार पचवण्याची सवय त्यांना आपसूकच लागते. पालकांपासूनच नकाराची सुरुवात व्हावी आणि ती पाल्यापर्यंत पोहचवावी, हीच आजची गरज आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या