लाल दिव्याची ऐट दाखवत, खोळंबलेल्या वाहतुकीला न जुमानता भरधाव वेगात जाणारे मंत्र्यांच्या गाड्यांचे ताफे आपण बरीच वर्षे पाहत आलो आहोत. मागेपुढे पायलट गाड्या, पोलिसांच्या शिट्ट्यांच्या आवाजात लाल दिवा सगळ्यांना जणू वाकुल्या दाखवत मंत्रीसाहेबांची गाडी सुसाट निघून जाते. राजकारणात असताना अमर्याद सत्ता आणि अधिकार हाताशी येतात. मग तो सगळा रुबाब आणि मोठेपणा दाखवण्याकरिता कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि लाल दिव्यांच्या गाडया असा लवाजमा मिरवला जात आहे. आपण अतिमहत्त्वाची व्यक्ती आहोत हे दाखविण्याचा त्यामागचा उद्देश, पण ज्या लाल दिव्यासाठी नेतेमंडळींच्या कित्येक पिढ्या झुरल्या, तो लाल दिवाच काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे .
केंद्र सरकारने सरसकट लाल दिवा हद्दपार करून टाकला आहे. त्याला कोणी अपवाद नाही. मोटर वाहन कायद्यातील लाल दिव्याच्या वापराविषयक असलेले कलमच आता रद्द करण्यात आले आहे. खरे तर लाल दिव्याच्या गाडीबद्दल सर्वसामांन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नाराजी होती हे सरकारने मान्य केले हे बरे झाले. मंत्र्यांच्या या पॉलिटिकल थाटाचे यथेच्छ जनतेने गेल्या सत्तर वर्षांत घेतले आहे. हा सारा रुबाब आपल्याच कररूपी पैशांवर असतो हे जनताही विसरली आणि मंत्रीही. याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची गरज होती.
मंत्र्यांच्या अशा शोबाजीमुळे लोकप्रतिनिधी आणि देशाचे नागरिक यांच्यांत अंतर पडत जाते. ज्याच्याकडे आपली मागणी तोच लाल दिव्याच्या गाडीतून उतरायला तयार होत नव्हता. लाल दिवा हा पुरातन सरंजामशाहीचे प्रतीक होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याआधी देशात राजेशाही होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना असे वाटायला लागले की, आता राजे गेले आणि त्यांच्याऐवजी हे निवडून दिलेलेच, पण राजे आले आहेत. आपले प्रतिनिधी आणि आपली लोकशाही यांची संकल्पनाच त्यांच्या डोक्यात नव्हती. आमदारांचा मुलगा आमदार होतो, तर खासदारांचा एखादा नातलग खासदार होतो. हे समीकरण आपल्या देशातील लोकांनी जणू मान्यच केले होते. मंत्रीही आपण जर आपण राजेच आहोत तर मग आपले हे राजेपण टिकले पाहिजे. आपण लोकांसारखे दिसून उपयोगाचे नाही. आपली गाडीही लोकांसारखी दिसून उपयोगाची नाही हि कल्पना निर्माण होते आणि गाड्यांवर लाल दिवे यायला लागतात. त्यावेळी राजे हे नेहमी लोकांपासून दूर राहत होते. प्रजेपेक्षा मोठया थाटामाटात राहत होते. तसेच आपण राहिले पाहिजे असा भाव या लोकप्रेतिनिधींच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी हे कुणी राजे नसून जनतेचे नोकर आहेत हे समजावून सांगण्याची गरज होती. ती लाल दिव्याला गच्छंती मिळाल्यामुळे काही प्रमाणात कमी झाली हे बरे झाले.
लाल दिव्याची गाडी किंवा मंत्र्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून घेण्यामागचा उद्देश नीट समजून घेतला पाहिजे. मंत्रीसाहेबांनी कोणताही बडेजाव न करता सामान्य नागरिकाप्रमाणे राहिले पाहिजे. आपला व्यवहार तसा ठेवला पाहिजे. लोकांनी आपल्याला निवडून दिले याचा अर्थ आपण सत्तेचा मनमानी उपभोग घ्यायचा आहे असा घेतला जातो. खरे तर आपण आपल्यातूनच एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो तो आपल्यासारखाच असला पाहिजे अशी साधी अपेक्षा नागरिकांची असते. पण, एकदा निवडून आल्याबरोबर या सगळ्या राजकारण्यांच्या वर्तणुकीत इतका फरक पडतो की, ते वारंवार आपण किती आणि कसे अतिमहत्त्वाचे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची ही प्रवृत्ती लोकशाहीच्या दृष्टीने घातक ठरते. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या अध्यक्षांच्या गाडीवरसुद्धा लाल दिवा नसतो. ब्रिटनचे पंतप्रधान तर कधी कधी भुयारी रेल्वेने प्रवास करत असतानाच्या बातम्याही येत होत्या. आपल्या पुढाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत एवढे जरी लक्षात ठेवले तरी पुरे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.