जंकफूडमुळेच अल्पवयातच मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या भावी आयुष्याचा आणि आरोग्याचा गंभीर विचार करून जंकफूडच्या सवयीतून आपली सुटका तर करून घ्यावीच, पण आपल्या मुलांनाही हे पदार्थ खाऊ घालू नयेत.
-दादासाहेब येंधे
आजकाल शाळेच्या आजूबाजूला व शाळांच्या उपगृहांतही जंकफूड विकण्याचे प्रमाण वाढले आहे. जंकफूडमध्ये जीवनसत्वे व खनिजांची कमतरता असते. मीठ, साखर आणि मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा व अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये जंकफूड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो स्वागतार्हच म्हणावा लागेल. त्यासोबतच आजूबांजूच्या दुकानात मिळणाऱ्या चिप्स, चायनीज भेळ, नूडल्स, पेस्ट्री, चॉकलेट, बटाटा भजी, बर्फाचा गोळा यांच्यावरही बंदी घालायला हवी.
मॅगी, बर्गर, पिझ्झा, पास्ता हे पाश्चत्य पदार्थ चवीला चटकदार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतही हे पदार्थ खाण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांचे फाजील लाड तर करतातच, पण त्यांच्या हट्टासाठी असे चटकदार पदार्थ उपहारगृहात आपल्या मुलांना नेऊन खाऊही घालतात. बॅंगलोर, कोलकाता या शहरांतील खासगी शाळांतील मुला-मुलींना असे पदार्थ देऊच नयेत, असा आदेश काही वर्षांपूर्वीच काढले आहेत. शहरी भागातील बहुतांश शालेय विद्यार्थ्यांना हे चटकदार पदार्थ खाणे आवडते आणि यांच्या पालकांनाही असे पदार्थ मुलांना देणे प्रतिष्ठेचे वाटते. राजधानी दिल्लीतील प्राथमिक शाळांतील चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या आरोग्याच्या केलेल्या सर्वेक्षणात आठ ते दहा वयोगटांतील सरासरी २५ टक्के मुले मुली लठ्ठ झाल्याचे निष्पन्न झाले आहे
जंकफूडमुळेच अल्पवयातच मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या भावी आयुष्याचा आणि आरोग्याचा गंभीर विचार करून जंकफूडच्या सवयीतून आपली सुटका तर करून घ्यावीच, पण आपल्या मुलांनाही हे पदार्थ खाऊ घालू नयेत. अगदी पाच-सहा वर्षे वयातच काही मुला-मुलींचे वजन त्यांच्या वयानुसार दीडपट असल्याचेही राष्ट्रीय सर्वेक्षणात आढळून आले आहे. हिंदुस्थानी परंपरेनुसार चौरस आहार सध्या मुले घेत नाहीत. परिणामी, मेदयुक्त पदार्थांच्या अतीखाण्याने मुलांना लठ्ठपणाच्या रोगाने झपाटले आहे.
शाळा भरण्यापासून ते शाळा सुटल्यांनंतरही शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानातून चिप्स, बर्गर, पिझ्झा, चायनीज भेळसारखे जंकफूड पालक आपल्या मुलांना विकत घेऊन देताना दिसतात. आई-वडील किंवा शाळेत घेण्यासाठी आजी-आजोबांकडे अशा खाऊसाठी भररस्त्यात रडारड करणारी ही मुले जंकफूडची शिकार झालेली असतात. पालकांच्या अतिलाडामुळे अशा मुलांची सवय मयादेपुढे गेलेली असते. काहीवेळा आपलं मूल एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो. सध्या तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना या चायनीज भेळने वेड लावले आहे. खुल्या जागेत स्वच्छतेची कोणतीही विशेष काळजी न घेता तयार करण्यात येणारे आणि विक्री होणारे हे पदार्थ गॅस्ट्रो, कावीळ सारख्या आजारांच्या साथी वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. या जंकफूडचा पहिला ग्राहक हा नेहमी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी ठरले आहेत. त्यामुळे गल्लीपासून, हॉटेलपर्यंत ते शाळेच्या आजूबाजूला विक्री होत असलेले हे खाद्यपदार्थ हे मुलांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे.
शाळेच्या टिफिनमधील मेन्यूही आता पालकांनी बदलायला हवा. चणे, उपमा, खिचडी, भाज्यांचे सॅण्डविच असे पदार्थ द्यावेत. आदिवासी आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाने अपंग होताहेत. तर शहरी भागातील मुलांना जंकफूडच्या सेवनामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशभर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, हे वेगवेगळ्या संस्थांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबाबतच्या समस्या कोणत्याही देशाला परवडणाऱ्या नाहीत.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.