धावपळीच्या जीवनात पालकांचा मुलांसोबत संपर्क तुटत चलला आहे. त्यामुळे मुले व्यक्त होत नाहीत. पालकांनी त्यांच्या सतत संपर्कात असणे गरजेचे आहे. त्यांना लैंगिक शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांसोबत पालकांनी मैत्रीचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर एकदा अन्याय, अत्याचार घडला असेल, अशावेळी नेहमी त्यांच्यासोबत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी. जेणेकरून, मुले वेळीच सतर्क होतील. अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणारी विकृती रोखण्यासाठी पॉक्सो कायदा अस्तित्वात आहे. या हैवानाला रोखण्यासाठी पोलीस आणि समाजातील सुज्ञ नागरिकांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. 'गुड टच आणि 'बॅड टच' हे कसे ओळखायचे याचे शिक्षण मुलांना शाळेतच दिले पाहिजे.
एखादा अनुचित प्रकार
घडला तर मुलांनी घरी सांगणे, हा
संस्कार होण्यासाठी
आई-वडिलांनी संवादाची दारे सदैव उघडी
ठेवली पाहिजेत. वयासोबत शारीरिक बदल होत असल्याने मुलींना
खूप खबरदार आणि सावधान राहण्याची आवश्यकता आहे. मुले वयात येताना
आपले मूल काय करते, कोणासोबत जास्त वेळ असते याकडे पालकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.
मुलांच्या आणि मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत वेळेनुसार त्यांना अगोदरच सुचित करणे ही शिक्षकांसह
पालकांचीही जबाबदारी
आहे. मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे मुक्त संवाद साधून त्याच्यातील कला गुणांसह त्यांच्यासोबत असणारे मित्र मैत्रिणी आणि शारीरिक बदलाचीही माहिती पालकांनी घेणे आवश्यक आहे. वयात येताना मित्र असो व मैत्रीण त्यांच्याशी असे वागावे, याची जाण करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे समाजात इतरांशी मुलांनी कसे वागले पाहिजे, याचीही त्यांना जाणीव होईल. जेणेकरून, वेळप्रसंगी तुमच्याशी संवाद साधताना कोणतीही अडचण वाटणार नाही.
मनमोकळेपणाने त्यांच्याही शंकांचे निरसन झाल्यास मुलांना इंटरनेटवरील चुकीची माहिती जाणून घेण्याची गरज पडणार नाही. म्हणूनच पालकांनी घर, नोकरीतून आपल्या मुलांसाठी थोडा वेळ काढायला हवा. कच्च्या वयात आपली थोडीशी सतर्कता मुलांना फसवेगिरीपासून वाचवू शकते. जेव्हा पालक मुलाच्या आयुष्यात असतात. तेव्हा, स्वाभाविकपणे त्यांचा मुलांबरोबर अधिक वेळ जातो. मुलांमध्ये महत्त्वाची कौशल्ये विकसित होण्यास पालकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मुलामुलींच्या सोबत राहिल्याने मुलांच्या मनात एकप्रकारे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. जे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते. मुलांबरोबर त्यांच्या आवडत्या विषयावर गप्पा मारा. तुमचे एखादे सिक्रेट अथवा कुटुंबातील अडचणी याविषयी त्यांच्याशी बोला म्हणजे पालक आपल्याला महत्त्व देत आहेत, आपण त्यांना आवडतो, असे त्यांना वाटते व तीसुद्धा तुमच्याबरोबर अधिक चांगली व्यक्त होतील. पालकांकडून मुलांना दिली जाणारी सर्वोत्कृष्ट भेट म्हणजे मुलांसाठी त्यांनी दिलेला वेळ आहे. सध्या वेगवान जगात बहुतेक पालक करिअरच्या मागे धावत असल्याने त्यांना मुलांबरोबर घालवायला वेळच नसतो. मुलांसोबत वेळ घालवायला ते प्राधान्य देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना असते. म्हणून महागड्या वस्तू व बारीकसारीक खेळणी त्यांना देऊन अपराधीपणावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. असे करण्यापेक्षा मुलांबरोबर खेळणे त्यांच्याबरोबर रात्री एकत्र जेवण करणे. मुलांशी दंगामस्ती करणे या गोष्टी मुलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात स्वामी विवेकानंद म्हणतात, मुलांचे मित्र व्हा. केवळ पालक'नको, त्यांना जेव्हा वाटत असेल तेव्हा त्यांचा हात धरा व जेव्हा गरज नसेल तेव्हाही त्याचा हात धरा योग्य मार्गावर नेण्यासाठी...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.