माणूस जंगलापासून होता तोपर्यंत ठीक होते. पण, त्याने जंगलावरच आक्रमण सुरू केले आणि परिस्थितीच बदलली. उद्यान, जंगल आणि मानवी वस्ती एकच झाली आहे. अशावेळी बिबटया मानवी वस्तीत घुसतोय, असे म्हणायला काय अर्थ आहे. माणसानेच बिबट्यांच्या वस्तीवर आक्रमण केल्यावर बिबट्याने जायचे कुठे? अशावेळी बिबट्याने मानवी वस्तीत नव्हे तर माणसानेच बिबट्याच्या वस्तीत घुसखोरी केली आहे. माणसाचा जंगलातील हस्तक्षेप वाढत चालला आहे. राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने माणूस जंगलावरच अतिक्रमण करीत आहे. त्याचे दुष्परिणाम मात्र आजवर जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या प्राण्यांना भोगावे लागत आहेत.
- दादासाहेब येंधे
निसर्ग नियमाप्रमाणे एक प्राणी दुसऱ्याला गिळतो. प्रत्येक वन्य प्राणी एकमेकांवर अवलंबून असतो. मांसाहारी प्राणी गवत खाऊ शकत नाहीत. ते आपल्यापेक्षा लहान प्राण्यांना
खाऊन आपले पोट भरतात. कधी-कधी गाय, म्हैस, हरण, झेब्रा, कुत्रे यांना तो आपले भक्ष्य बनवतो. परंतु आज जंगलच नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे वन्य प्राणी तसेच सरपटणारे प्राणी मानव वस्तीत येऊ लागले आहेत. पूर्वी वाघ, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर व इतर सरपटणारे विषारी जीव मोठया संख्येने जंगलात होते. जंगलातच वाघ, बिबट्यांचा संचार असायचा. ते कधी मानव वस्तीत यायचे नाहीत.
त्याकाळी खेडेगावांमध्ये विद्युतप्रवाह नव्हता. घनदाट जंगलात रात्रीचे शेतकरी शेताची राखण करायला जायचे. परंतु वाघ किंवा बिबट्याने त्यांच्यावर
हल्ला केलेला ऐकले नव्हते. पण सध्या वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या
आणि माणसावर हल्ला केल्याच्या बातम्या वाचावयास मिळतात. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पवईनजीकच्या परिसरातील मोरोशपाडा या आदिवासीपाडयावर बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. रात्रीच्या
अंधाराचा फायदा घेत बिबट्याने महिलेचा फडशा पाडला आणि तो जंगलात पळून गेला. नुकताच मुंबईतील मुलुंड भागातही बिबट्या फिरत असताना कित्येकांनी पहिला होता. मानवी वस्तीतील बिबट्याचा वाढता वावर आणि माणसावर होणारे त्याचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याने मानवावर किंवा मानवी वस्तीत घुसून दहशत माजविण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.
केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरापासून
नाशिक, नेवाश्याच्या भेंड्यापर्यंत
आणि तेथून संगमनेर, आळेफाटा, जुन्नर, गणपतीचे ओझर, ओतूर अशा ठिकाणीही बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोरिवलीतील
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात असलेल्या टेकडी भागात सुनीता थोरात नावाच्या चिमुरडीला बिबट्याने तिच्या आईच्या डोळ्यादेखत झडप घालून पळवून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी या भागाला लागूनच असलेल्या जंगलात सुनीताचा मृतदेह सापडला होता. जुन्नर तालुक्यातील ओझर, ओतूर, हिवरे खुर्द, नारायणगाव, आळेफाटा येथील कित्येक जणांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. ऊस, केळी यांसारख्या
शेतात बिबटे लपून बसत असून शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर
ते हल्ले करीत आहेत. बाईक वरून जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करूनही कित्येक जणांना येथील बिबट्यांनी जखमी केले आहे. त्यांची जनावरे मारून खाल्ली आहेत. जखमी झालेल्या नागरिकांनी
पुणे येथे जाऊन औषधोपचार केले आहेत. सातत्याने याठिकाणी नागरिकांना
बिबट्याचे दर्शन होत आहे.
खरेतर बिबट्या राहतो ते ठिकाण म्हणजे जंगल. आजपर्यंत जंगलात आणि उद्यानांत दिसणारे हे बिबटे मानवी वस्तीत घुसून दहशत माजवू लागल्याने सर्वांना वाटणारी चिंता साहजिकच आहे. पण, ही चिंता माणसानेच स्वतः वर ओढवून घेतली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण माणूस जंगलापासून होता तोपर्यंत ठीक होते. पण, त्याने जंगलावरच आक्रमण सुरू केले आणि परिस्थितीच बदलली. उद्यान, जंगल आणि मानवी वस्ती एकच झाली आहे. अशावेळी बिबटया मानवी वस्तीत घुसतोय, असे म्हणायला काय अर्थ आहे. माणसानेच बिबट्यांच्या
वस्तीवर आक्रमण केल्यावर बिबट्याने जायचे कुठे? अशावेळी बिबट्याने मानवी वस्तीत नव्हे तर माणसानेच बिबट्याच्या
वस्तीत घुसखोरी केली आहे. माणसाचा जंगलातील हस्तक्षेप वाढत चालला आहे. राहण्यासाठी
जागा उपलब्ध होत नसल्याने माणूस जंगलावरच अतिक्रमण करीत आहे. त्याचे दुष्परिणाम मात्र आजवर जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या प्राण्यांना
भोगावे लागत आहेत. बिबट्याने जर नागरी वस्तीत घुसखोरी करु नये असे
आपल्याला वाटत असेल तर बिबट्यांना पुन्हा त्याचा नैसर्गिक अधिवास मिळवून द्यायला
हवा. बिबट्यांना जर त्याचा अधिवास लाभला तर बिबटे नागरी वस्तीत घुसखोरी करणार
नाही.
ज्या भागात बिबटे आहेत तेथे त्यांची गणती होणे अपेक्षित आहे. म्हणजे त्या भागातील बिबट्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी काय करायचे त्याचे नियोजन करता येईल. त्या भागातील वनक्षेत्र घटत असेल तर ते वाढवायचे कसे यावर भर दिला जाईल आणि ते संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही करता येतील. एखाद्या भागात तुरळक बिबटे असतील आणि एखाद्या भागात अधिक तर त्यातील काही बिबट्यांचे स्थलांतर करायचे का, तेही निश्चित करता येईल. बिबट्यांना लागणारे भक्ष्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करता येतील. यामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण घटवता येईल. तसेच, बिबट्यांसाठी एखादे संरक्षित क्षेत्र घोषित करायचे का, याचा निर्णयही घेणे आवश्यक आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर बिबट्यांचे क्षेत्र प्रभावी ठरू शकते. दुसऱ्या बाजूला जनप्रबोधनही होणे आवश्यक आहे. गावांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असल्याने बिबट्यांचा त्रास जाणवतो. याचे मूळ अस्वच्छतेशी आहे. शहरे असो की गावे अस्वच्छता, कचरा, मांसाचे तुकडे, शिळे अन्नपदार्थ आदींवर भटके कुत्रे जगतात. आपले भक्ष्य मिळाले नाही तर याच कुत्र्यांचा फडशा बिबट्यांकडून पाडला जातो. शेतीला पूरक उद्योग म्हणून पोल्ट्री फार्मकडे पाहिले जाते. पण, याच फार्ममधील मृत कोंबड्या, त्यांची पिल्लेसुद्धा उघड्यावरच फेकले जातात. ही बाब सुद्धा बिबट्याला मानवी वस्तीकडे येण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे बिबट्याच्या धोरणाअंतर्गत या साऱ्याच बाबींवर प्रकाश पडेल. यासाठी विविध बिगर सरकारी संघटना, बिबट्या व वन्यप्रेमी या साऱ्यांची मदत घेता येईल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.