-दादासाहेब येंधे
लग्नानंतर पत्नीला आपल्या पतीच्या काही सवयी न आवडणं आणि त्यावरून वाद होणं स्वाभाविक असतं. बरेचदा या साऱ्या गोष्टी पत्नी आपल्या आई-वडिलांना आणि भावंडांनाही सांगते. त्यामुळे यथावकाश पतीला सासू-सासऱ्यांचे कटू बोल ऐकावे लागतात. अशा वेळी पतीला राग येतो. बरेचदा तर तो पत्नीला न घेताच घरी परततो. जरी पत्नी सोबत आली, तरी भांडणाशिवाय काहीच होत नाही. अशा गोष्टी पती-पत्नीमधील संकटांना निमंत्रण देत असतात आणि संसार रथापुढे अडथळे निर्माण करणाऱ्या ठरतात. धैर्याने वागणं आणि संयम पाळणं, हे एका समजूतदार पत्नीचं कर्तव्य आहे. याचा अर्थ असा नव्हे की, आपण आपल्या पतीच्या प्रत्येक कुकर्माकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पतीशी भांडण्यापेक्षा आणि त्याची निंदा करण्यापेक्षा विवेकाने आपल्या पतीला विश्वासात घ्यावं आणि त्याच्या विषयीच्या तक्रारी दूर करण्यासाठी त्याला समजावून सांगावं. फजिती होईल?
काही वेळा असंही होतं की, सुखाने जगत असलेल्या दाम्पत्याच्या घरात आग लावण्याचं काम शेजारीपाजारी करत असतात. अशा वेळी विवेकी पत्नीचं हे काम असतं की, लोकांच्या सांगोवांगी बोलण्याकडे तिने दुर्लक्ष करावं. जोपर्यंत
आपण प्रत्यक्ष काही पाहत नाही, तोपर्यंत पती दुखावला जाईल असं काहीही बोलू नये. त्याप्रमाणे आपल्या पतीवर एखादा आरोप करून आपल्या आई-वडिलांच्या घरी जाऊन बसू नये. बरेचदा पत्नीने पतीवर केलेले सारे आरोप चुकीचेही असू शकतात आणि ती विनाकारण त्याला सर्वांच्या नजरेत कमी लेखण्याचा प्रयत्न करत राहते. जेव्हा सत्य समोर येईल आणि आपले सारे आरोप बिनबुडाचे ठरतील, तेव्हा आपली पतीच्या नजरेत कशी स्थिती होईल आणि पतीसोबत राहावं लागल्यानंतर आपली फजिती होईल, असा विचार पत्नीने करावा.
आपल्या जोडीदारासोबत तुम्ही जेवढा जास्त वेळ घालवाल तेवढं त्याला जास्त जाणू शकाल आणि त्याच्या मनाजोगं वागणं आपल्याला सोपं जाईल. पती-पत्नीने एकमेकांशी आपुलकीने वागणं हा सुखी दाम्पत्य जीवनाचा आधारच आहे. जे पती-पत्नी परस्परांना आपले प्रतिस्पर्धी मानत असतात, ते आपल्या दाम्पत्य जीवनासोबतच आपलीही प्रतारणा करत असतात.
मन जाणा
जोडीदारांच्या भावना जाणणं, मान देणं, मला तुझी चिंता आहे, हे सांगत असतं. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे आणि मला तुझ्या हिताची चिंता आहे, यासाठी आपल्या जोडीदाराचं मन जाणायला हवं. ते जाणण्यासाठी त्याची आवड, इच्छा आणि गरज ओळखायला हवी.
संसारात चीड, निराशा आणि रागाला थारा नसतो. एखादा राग असेल, तर तो दाबून धरणंही योग्य नव्हे. कारण केव्हा ना केव्हा तो स्फोटक बनून कुटुंबाची शांतता नष्ट करू शकतो. संसारात तडजोड महत्त्वाची असते. ती पती-पत्नीत मैत्री वाढवते आणि एकमेकांना परस्परांसाठी पूरक बनवत असते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.