सेल्फीचा मोह टाळा
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रत्येकाच्या वर्तनामध्ये बदल झाले आहेत. स्वतःची ओळख महत्त्वाची वाटू लागली आहे. या स्वकेंद्रीत्वाच्या लाटेचे परिणाम सर्वच बाबींवर झाले आहेत. आता माझे नाव आणि मीच ओळख ठरली आहे. अशात व्यक्त होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगात सेल्फी जवळचा पर्याय म्हणून स्वीकारला जातोय. तंत्रज्ञानावर आरूढ झालेल्या आजच्या समाजामध्ये सेल्फीचं वेड हे झपाट्यानं वाढत चाललं आहे. सेल्फी काढण्याचा अतिरेक झाल्यावर आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
नुकतेच डहाणू येथील एका कॉलेजमधील सुमारे ४० विद्यार्थी विकेंडचा मुहूर्त साधत समुद्रात बोटिंगला गेले होते. मात्र, सेल्फी काढण्याच्या बेजबाबदार मोहापायी बोट उलटून झालेली अपघातात त्यापैकी तीन मुलींना पाण्यात पडल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. त्याआधी नागपूरमध्ये वेण्णा जलाशयामध्ये जलविहारासाठी गेलेल्या ११ तरुणांची बोट बुडून आठ जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना घडली होती. सेल्फी काढण्याच्या मोहापायी त्यांना बोटीचा तोल राखता आला नाही आणि बोट उलटली.
सागरी किनाऱ्यांवर पिकनिकसाठी गेल्यानंतर सेल्फीचा अट्टाहास, पाण्यात खोलवर जाण्याची दांडगाई या उन्मादामुळे यापूर्वीही बऱ्याचदा सागरी किनाऱ्यांवर अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यात तरुणांचा आकडा सर्वाधिक आहे. सेल्फीचे खुळ हा स्मार्ट फोन वापरकर्त्यांना जडलेला आजार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सेल्फीमुळे जीव जाण्याच्या घटना या पर्यटनस्थळी सर्वाधिक घडल्या आहेत. पर्यटनाला घराबाहेर पडलेल्या तरुण मंडळींचा उत्साह , जग जिकायला चालल्याचा अविर्भाव या सर्वांमुळे ग्रुप सेल्फीचा आग्रह, खरेतर हा आग्रह न राहता तो एक प्रकारचा धनगडधिंगानाच म्हणावा लागेल. मात्र, आपल्याच विश्वात दंग असणाऱ्या पर्यटकांना कुणी सुरक्षेचे सल्ले दिले तर त्या व्यक्तिला मूर्ख ठरविण्यापर्यंत आपला उन्माद सुरू ठेवण्याची मानसिकता अधिक व्याप्त होते आहे.
आशा प्रकारच्या घटनांमध्ये मी केवळ स्वतःचा नसून स्वतःच्या प्रतिमेला उजाळा आणण्यासाठी खटाटोप केला जातो.सेल्फी काढणे, फेसबुक, व्हट्सअप सारख्या नेटवर्कींग साइट्सवर पोस्ट करणे आणि त्यावरील प्रतिक्रियांचे निरीक्षण करत राहणे, त्यानुसार विचार ठरवणे असे प्रकार सध्या तरुणांमधून दिसून येत आहेत. यासाठी उपलब्ध माध्यमांचा पुरेपूर वापर केला जातोय. यासाठी नगण्य पैसे खर्च करावे लागत असल्यामुळे हा चंगळवाद तरुणांना फुकटात मिळतोय. त्यातूनच त्याचा उपभोग घेतला जात आहे आणि त्यातूनच आशा दुर्घटना घडत आहेत.
सेल्फी, सोशल मीडिया या माध्यमातून प्रतिमा वृद्धीकरण करण्याच्या या मानसिकतेत काय दडलंय याचा विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात. आज स्वकर्तुत्व गाजवण्यापेक्षा चटकन-पटकन काही तरी पोस्ट करून एखाद्या इन्स्टंट कॉफीप्रमाणे इन्स्टंट प्रसिद्धी किंवा क्षणिक तृप्ती मिळविण्याचा हव्यास वाढत चालला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी थांबण्याची तयारी आजच्या पिढीकडे राहिलेली नाही. तरुण वयामध्ये संवेदनशीलता वाढली पाहिजे. त्यासातजी तशा प्रकारची साक्षरता येणं गरजेचं आहे.
अशा घटना घडल्या की सोशल मीडियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि त्याचा वापरच बंद करा असं ओरडत सुटायच. पण, सोशल मीडियाचा वापर सुयोग्य पद्धतीने कसा करायचा , त्यातील आपली जबाबदारी काय याचं ज्ञान देण्याचा विचार कुणीही करताना दिसत नाही. तंत्रज्ञानानं आपण एकमेकांच्या जवळ आलो आहोत; मात्र त्याचबरोबर तंत्रज्ञान आपल्याला विलगही करत आहे. हेही विसरून चालणारे नाही. एकंदरीतच आपण एक स्पर्धा निर्माण केली आहे. मी बोटीत बसून , बोटीच्या टोकावर उभं राहून फोटो काढू शकतो, लाइव्ह मोडमध्ये तुम्हाला व्हिडीओ दाखवू शकतो हीदेखील एक स्पर्धाच आहे. या स्पर्धेत स्वतःला वरचढ दाखविण्यासाठीचा अट्टाहास जीवघेणा बनण्याच्या दिशेने निघाला आहे. तो कुठेतरी थांबायला हवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.