आजकाल महिलांची समाजातील असुरक्षितता वाढत चालली आहे; पण याचा अर्थ महिलांनी स्वतःला घरात कोंडून घ्यावं आणि बाहेर पडताना बुरखा घालावा, असा होत नाही. या उलट महिलांनी स्वत:चं संरक्षण करायला शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी महिलांनी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. अगदी अपरिहार्य कारण असल्याशिवाय रात्री-अपरात्री एकटीने बाहेर पडू नये.
-दादासाहेब येंधे
वाहनानं प्रवास करावा लागणार असेल, तर गर्दी असलेल्या वाहनांतूनच प्रवास करावा. कारण गर्दीत तुम्हाला मदत करण्यास कोणीतरी नक्कीच पुढे येईल. जराही असुरक्षित वाटलं, तर आरडाओरड करावी. माणसं गोळा करावीत.
एकट्याने जाताना शॉर्टकट वापरू नये. रोजचा मोठा रस्ता एक वेळ लांबचा असेल; पण त्यावर चार माणसं तरी असतील.
कोणी आपला पाठलाग करतंय, असं वाटलं तर लगेच रस्ता बदलावा किंवा ओरडायला सुरुवात करावी.
निर्जन ठिकाणी आपली मोटार बंद करून थांबवू नये.
आपण कुठे जातोय, कुठल्या रस्त्याने जातोय, याची कल्पना शक्यतो आपल्या घरच्यांना द्यावी.
कराटेसारखी स्वसरक्षणाची कला जरूर शिकून घ्यावी.
आपल्यावर हल्ला करणाऱ्याला कुठल्या वर्माच्या ठिकाणी मारलं की तो माघार घेईल, याची माहिती कधीही वाया जात नाही.
अनोळखी व्यक्तीची सोबत शक्यतो घेऊ नये. त्याला आपल्या गाडीने लिफ्ट देऊ नये. आपली व्यक्तिगत माहिती सांगू नये. बोलणंच मुळामध्ये वाढवू नये. बोलण्याच्या ओघात नसते तपशील बाहेर पडले, तर पुढेमागे त्यांचा दुरुपयोग व्हायचा धोका असतो.
अवेळी घराबाहेर राहावं लागणार असेल, तर अंगावर ठळक असे दागिने नसावेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपलं प्रसंगावधान टिकवून ठेवावं.
इकडचे -तिकडचे मुद्दे लक्षात यावेत, चटकन कृती करता यावी इतपत बुद्धी सतर्क हवी. बऱ्याचदा संकटांमध्ये शक्तीपेक्षा युक्ती जास्त उपयोगी पडते. काही स्त्रियांकडे शक्तीची कमतरता असू शकते, मात्र युक्ती प्रत्येकाकडेच असते. मात्र ती वापरण्यासाठी बुद्धी सतर्क असायला हवी.
एखादा प्रसंग ओढवलाच तर, हातपाय गाळून, दुसरा कोणीतरी अवतार घेऊन आपल्याला वाचवेल, असा विचार करत वेळ दवडण्यात अर्थ नाही. आपलं रक्षण आपल्यालाच करायचं आहे, हे नेहमी लक्षात असू द्या.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.