Ticker

10/recent/ticker-posts

परिचारिकांना सलाम...

नर्स, परीचारिकांना सलाम...

- दादासाहेब येंधे

रुग्णाची सेवा कोण करतं...? असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टर आधी नाव येईल ते परिचारिकेचं, नर्सचं. रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारिका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वत:च्या सुखदुःखाची.  वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रुग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रुग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरुवात केली ती लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. 


१२ मे १८२० ला लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा केली. आणि संपूर्ण जगाला त्यांनी रुग्णसेवेचा पायंडा घालून दिला. यातूनच आपल्यातल्या काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल या उद्देशानं १८६० साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. दिवा घेतलेली स्त्री असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटलं जातं. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचांरिकांना महत्त्त्व प्राप्त झालं आहे. फक्त महाराष्ट्रातच सुमारे अडीच लाखांहून अधिक परिचारिका आहेत. मात्र सरकारी वैद्यकीय  महाविद्यालयं आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा केवळ २३ हजार नर्सेसच्या खांद्यावर आहे. ८९्टक्के खासगी रुग्णालयात रुग्णसेवेचं व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रशिक्षित नर्सेस पार पाडतात. 


समस्यांमध्ये वाढ

बदलत्या काळानुसार या नर्सेसना  भेडसावणाऱ्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावं लागतंय. नर्सेसना कायद्याचं संरक्षण अद्याप नाही. याशिवाय ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जातो. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दुःखाची झालर अधिक आहे. असं असतानाही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत.


दुर्दैवाने परिचारिका व परिचर्या या दोन्ही बाबतींत समाजाचा दृष्टिकोन फार विचित्र आहे. आपली आई, बायको, मुलगी व बहीण परिचारिका, नर्स नसावी, असे म्हणणारे शहाजोग परिचारिका व परिचर्या यांच्या बद्दल गहिवरून बोलतात. एकीकडे समाज परिचारिका व त्यांच्या व्यवसायाला योग्य तो मान देत नाहीत तर दुसरीकडे त्यांच्या कमतरतेबद्दल काळजी व्यक्त करतो. आता काळ बदलत आहे. नर्स होणं म्हणजे मोठं मानवतेचं काम आहे, सेवा या परमधर्माचं आचरण आहे अशा फक्त पुस्तकी अर्थाने नव्हे तर एकूणच नसिंगक्षेत्राच्या वाढत चाललेल्या आवाक्यामुळे. नर्सिंग किंवा परिचारिकांचं क्षेत्र दिवसेंदिवस जास्त प्रभावी बनत आहे. मेट्रन, सिस्टर, आया, दाया अश्या अनेक पातळ्यांवर रुग्णसेवा चालते आणि आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी तिची गरज भासते. 


आपल्या जन्माला एखाद्या नर्सचा हातभार लागलेला असतो आणि आपली अखेऱही कोणातरी नर्सच्या नजरेसमोर होईल, हे नाकारता येणार नाही. तेव्हा इतक्या अपरिहार्य कामाबद्दल मनात आळस बाळगणं, हे काही बरोबर नाही. हे झालं हॉस्पिटलच्या जगाचं वर्णन. दिवसेंदिवस वाढत्या आयुर्मानामुळे होमनर्सिंगची गरजही वाढत चालली आहे. अति वृद्धावस्थेसुळे घरीच अंथरुणाला खिळलेले अनेक लोक असतात, त्यांची निगा राखणं त्यांच्या घरच्यांना शक्य होत नसतं. अशावेळी प्रशिक्षित परिचारिकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची शुश्रूषा करावी लागते. मोठे अपघात, दीर्घकालीन अपंगत्व, रेंगाळणारे आजार यातही नर्सिगची खूप गरज भासते. तेव्हा नर्सिंगचा बदलता चेहरामोहरा ध्यानात घेऊन त्या व्यवसायाचं खुल्या मनानं स्वागत करण्याचा काळ आता आलेला आहे. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलच्या या परिचारिकांना सलाम!







टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.